Home > मॅक्स रिपोर्ट > भूसंपादनावरुन पालीचे शेतकरी आक्रमक

भूसंपादनावरुन पालीचे शेतकरी आक्रमक

विकासासाठी भूसंपादन आवश्यक असले तरी पुनर्वसनाचा प्रश्‍न प्रलंबित राहतो. त्यामुळेच पाली, रायगडमधील शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण होत नाही तोपर्यंत शेतात पाय ठेऊ देणार नाही, स्थानिक शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना ठणकावले आहे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा ग्राउंड रिपोर्ट..

भूसंपादनावरुन पालीचे शेतकरी आक्रमक
X

महाराष्ट्रातील अष्टविनायक तीर्थ क्षेत्रापैकी प्रख्यात धार्मिक स्थळ व सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पालीतील सातत्याने वाहतूक कोंडीचा तिढा सोडवण्यासाठी बायपास मार्गाचा पर्याय उभा केला जात आहे . मात्र नव्याने होऊ घातलेल्या पाली झाप बलाप बायपास मार्ग हा आमच्या बापजाद्यांच्या दुबार पिकी शेतजमिनी उध्वस्त करणार असल्याचा संताप येथील स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय . शेतकऱ्यांच्या तक्रारींचे जोपर्यंत निवारण होत नाही तोपर्यंत शेतात कुणालाही पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा देत स्थानिक शेतकऱ्यांनी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी ठणकावले , यावेळी मोजणीसाठी आलेल्या ठेकेदार व भूमिअभिलेख कार्यालयाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना बुरमाळी येथील शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. विकासाच्या नावाखाली शेतकरी देशोधडीला लागणार असेल तर प्राण गेले तरी चालेल आम्ही मागे हटणार नाही, असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

आम्हाला विश्वासात घेतल्याखेरीज भूसंपादनाची कोणतीही प्रक्रिया करू नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. बायपास होईल इथून मोठमोठ्या महागड्या आलिशान गाड्याही धावतील , पण आमच्या संसारावर नांगर फिरला जाईल, आमच्या पिढ्यानपीढ्या कसत असलेली शेती उध्वस्त होईल, मग आम्ही खाणार काय? आमचे कुटुंब जगणार कसे? आम्हाला पर्यायी रोजगाराची संधी काय मिळणार? असे अनेक सवाल शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केलेत. बायपास साठी इतर पर्यायी जागा शोधा, किंवा मुंबई, पनवेल व ठाणे आदी बड्या शहरात वाहतूक कोंडी फोडण्यासाठी जसे उड्डाण पूल निर्माण केलेत, तसे उड्डाण पूल बांधा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय. जोपर्यंत आम्हा शेतकऱ्यांना समाधानकारक मोबदला मिळत नाही तोपर्यंत आमच्या शेतात पाय ठेऊ देणार नाही असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिलाय. येथील पाली , झाप , बुरमाळी येथील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत सदर बायपास मार्गाला कडाडून विरोध दर्शविला .

याबरोबरच या प्रक्रियेत धनदांडगे , राजकीय पुढारी , बडे उद्योजक यांना सोयीस्कररित्या अभय दिला जात आहे तर पिढ्यानपिढ्या कसल्या जाणाऱ्या गोरगरीब कष्टकऱ्यांचे मुख्य उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या पिकत्या जमिनीवर बुलडोजर फिरविण्याचा घाट प्रशासनाकडून घातला जात असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी व नागरिकांनी केला . राज्यशासनाने सन २०१० या वर्षी या रस्त्याला मान्यता दिली आहे . तसेच रस्त्यास १८ कोटी तर भूसंपादनासाठी १० कोटींची मंजुरी मिळाली होती . सदरचा मार्ग हा पाली • पाटनुस राज्यमार्ग ९ ४ ला जोडला आहे . या मार्गालगत येणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनी नष्ट होणार असल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे . मनमानी प्रशासनाच्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी दंड थोपटलेत . यावेळी शेतकरी मंगेश कदम यांनी सांगितले की सदर बायपास मार्गाकरिता यापूर्वी टाटा पॉवर ची टॉवर लाईन गेलेल्या व शिक्कामोर्तब झालेल्या भूसंपादनाला स्थगिती देण्यात आली आहे . यापूर्वी मोजणी व सर्व्हे करण्यात आला होता . मात्र काही मोजक्या धनिक लोकांचे हितसंबंध जोपासण्यासाठी सदर मार्ग वळविण्यात आला आहे , हा डाव आम्ही उधळून लावू असा इशारा कदम यांनी दिला . आमच्या बापजाद्यांनी आजवर जपलेली शेतजमीन आम्ही प्राण गेला तरी देणार नाही , सरकारने शेतकऱ्यांच्या भावनेचा विचार करावा अन्यथा उग्र आंदोलन छेडू . असा इशारा सुजित काटकर यांनी दिला.





रमेश लखीमळे यांनी सांगितले की येथील शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती आहे . आमच्या अनेक पिढ्या शेतीवर जगल्या आहेत . आमची शेती नष्ट झाली तर आम्ही जगणार कसे , आमची मुले बाळे खाणार काय ? शेती टिकली तरच शेतकरी जगेल , सरकारने आमच्या पोटावर कुऱ्हाड मारू नये अशी विनंती काटकर यांनी केली . यावेळी जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा देण्यात आल्या . आजघडीला नव्याने बाह्य वळण मार्गासाठी समाविष्ट केल्या जाणाऱ्या दुबार पिकी शेतजमिनीला देण्यास संबंधित जमीन मालक शेतकऱ्यांनी विरोध दर्शविल्याने प्रशासन व सरकार यावर आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे . यावेळी येथील , मंगेश कदम, लक्ष्मण कांबळे, पांडू राऊत, श्रीरंग काटकर,सुजित काटकर, बाळकृष्ण लखीमले, वसंत गडगे, तुकाराम गडगे, विठ्ठल ठोंबरे, अनंत लांगी, बाळू काटकर, सुरेश गायकवाड,बाळा परब, यशवंत काटकर, उमाजी राऊत,जयंता गडगे, दत्तात्रेय गोळे, दीपक चव्हाण, सीताराम जाधव,निलेश जाधव, जितेंद्र गद्रे आदी शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रशासन स्तरावर बैठका घेऊन त्यांची बाजू समजून घेतली आहे, सदर भूसंपादना साठी लागणाऱ्या जागेच्या मोजनिकरिता भूमिअभिलेख कार्यालयात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत फी भरली आहे, त्यानुसार मोजणीची प्रक्रिया सुरू आहे, दरम्यान सध्या शेतकऱ्यांच्या तक्रारी येत असून तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रशासन स्थरावर आम्ही प्रयत्न करू असे शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पाली सुधागडचे दिलीप मदने यांनी सांगितले.

अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लावण्यासाठी पाली झाप बलाप यामार्गे बाह्यवळण मार्ग निर्माण होत आहे . यासाठी शासनाकडून आवश्यक ती मंजुरी मिळाली आहे, अशातच ज्या शेतकऱ्यांच्या जमीन भूसंपादन प्रक्रियेसंबंधी तक्रारी व अडचणी असतील त्यांनी तहसिल कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभाग पाली सुधागड यांच्याकडे तक्रारी सादर कराव्यात , असे आवाहन केले होते, उपलब्द तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित प्रशासन व शेतकरी यांच्यासमवेत बैठक देखील लावण्यात आली , व त्यांची बाजू समजून घेतली होती, आजही काही तक्रारी असतील तर बैठकीचे नियोजन करून योग्य तोडगा काढला जाईल, असे तहसीलदार पाली सुधागड दिलीप रायन्नावार यांनी सांगितले.

Updated : 15 Dec 2021 1:23 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top