Home > मॅक्स रिपोर्ट > जिरेनियमच्या शेतीतून शेतकरी वर्षाला कमावतोय बारा लाख रुपये

जिरेनियमच्या शेतीतून शेतकरी वर्षाला कमावतोय बारा लाख रुपये

शेती परवडत नाही हे पालपूद सर्वत्र सुरू आहे. भरपूर समस्या असलेल्या उसाच्या शेतीला आजकाल आळशी शेतकऱ्याचे पीक म्हटलं जातं, महेश काळे या तरुण शेतकऱ्याने उसाच्या शेतीतून दुसरी वाट धरत जिरेनियम शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी या यशोगाथेचा मांडलेला ग्राउंड रिपोर्ट..

जिरेनियमच्या शेतीतून शेतकरी वर्षाला कमावतोय बारा लाख रुपये
X

सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्याने ऊसाची शेती केले जात असून या जिल्ह्यात जवळपास 30 ते 32 च्या आसपास साखर कारखाने आहेत. उसाचे क्षेत्र वाढल्याने या शेतीसंबंधी सातत्याने प्रश्न निर्माण होत आहेत. ऊस वेळेवर कारखान्याला जात नाही. ऊस कारखान्याला वेळेवर गेला नसल्याने उसाचे वजन कमी भरते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. यावर्षी सोलापूर जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात होती. ऊस कारखान्याला जावून ही बिल्ल वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी उसाच्या पिकाला पर्यायी शेतीच्या शोधात असून त्यामुळे शेती क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहेत. ऊसाच्या बिलांसाठी शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलने ही केली.

शेती पिकाला हमीभाव देण्यात यावा,अशी शेतकऱ्यांची सातत्याने मागणी असते. पण ती पूर्ण होताना दिसत नाही. दिवसेंदिवस शेती क्षेत्र अडचणीत येत असल्याचे सांगितले जात असताना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील महेश काळे या उच्च शिक्षीत तरुणाने आपल्या शेतात अनोखा प्रयोग करीत चार एकर क्षेत्रात जिरेनियमची लागवड केली आहे. या चार एकर शेती क्षेत्रातून वर्षाला 120 किलोच्या आसपास जिरेनियमचे तेल काढले जात असून यातून या शेतकऱ्याला वर्षाला 12 लाख रुपयांचा फायदा होत आहे. या जिरेनियमच्या पिकापासून तेल काढले जात असून तेलाची निर्मिती करण्यासाठी त्यांनी 13 ते 14 लाख रुपये खर्च करून प्लांट उभा केला आहे. या प्लांट मधून इतर शेतकऱ्यांच्या जिरेनिम पिकांचे तेल काढले जात असताना त्यांच्याकडून एकरी 60 हजार रुपये घेतले जात आहेत. त्यामुळे या शेतीतून त्यांना फायदा होत असल्याचे दिसते. एका उच्च शिक्षित तरुणाने आपल्या शेतात नवीन प्रयोग करत शेती केल्याने त्याच्या या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


उजनी धरणामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत

सोलापूर जिल्हा एकेकाळी दुष्काळी जिल्हा म्हणून गणला जात होता. या जिल्ह्यात ज्वारी,बाजरी,सूर्यफूल,करडई यांचे उत्पादन घेतले जात होते. मुख्यतः येथे पावसाच्या पाण्यावर शेती केली जात होती. जिल्ह्यात एकेकाळी कोरडवाहू शेतीचे प्रमाण जास्त होते. शेतकरी या शेतीतून वर्षातून एकदाच पीक घेत असत. त्यामुळे अनेकांची शेती पडीक होती. या जिल्ह्यात सातत्याने दुष्काळ असल्याने या जिल्ह्यातील अनेक शेतकरी कुटुंबे कामानिमित्त पुणे,मुंबई येथे स्थलांतरित झाली असल्याचे दिसते. जिल्ह्यात उजनी धरण असून या धरणाच्या पाण्याचा उपयोग सुरुवातीच्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी केला जात होता. या धरणामुळे आसपास असणारे शेती क्षेत्र ओलिताखाली असून तेथिल शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. या जिल्ह्यातून भीमा आणि सीना नद्या वाहत असून या नद्या उजनी धरणाला बोगद्याद्वारे जोडण्यात आल्या. याच धरणातून डावा आणि उजवा कालवा काढण्यात आला. यामुळे बरेच शेती क्षेत्र ओलिताखाली आले असून नद्याना उजनी धरणातून बारा महिने पाणी सोडले जात आहे. या नद्या काठची लाखो हेक्टर जमीन ऊस पिकाच्या अधिपत्याखाली आल्याने या शेतीसंबंधी अनेक प्रश्न निर्माण झाल्याने याच ऊसाच्या शेतीच्याकडेने सध्या राजकारण फिरताना दिसत आहे.

ऊसाच्या शेतीमुळे ऊस पिकासंबधी निर्माण झालेत अनेक प्रश्न

पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने ऊसाची शेती केली जात असून कोल्हापूर, सोलापूर, सातारा,सांगली,पुणे या जिल्ह्यांचा यात समावेश होतो. पण अलीकडच्या काळात या उसावरून राजकारण पेटताना दिसतंय. ऊसाच्या दरावरून शेतकरी संघटना आक्रमक असतात. उसाला हमी भाव द्यावा अशी त्यांची सातत्याने मागणी असते. यासाठी शेतकरी संघटनांनी उग्र आंदोलनेही केली. पण त्याला म्हणावे तेवढे यश आले नसल्याचे दिसते. अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्याची एफआरपीची रक्कम थकवली आहे. त्यावरून सुद्धा राजकारण होताना दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने उसाला चांगला भाव देतात तर इतर जिल्ह्यातील कारखाने भाव देत नाहीत. त्यावरूनही शेतकऱ्यांत असंतोष होता. यासाठी अनेकवेळा शेतकरी संघटनांनी आवाज उठवला. पण म्हणाव्या तितक्या प्रमाणात भावात वाढ झाली नाही.


अलीकडच्या काळात ऊस पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यामुळे ऊस कारखान्याला जाण्यास विलंब होत आहे. असेच भरमसाठ उसाचे क्षेत्र वाढत राहिले तर शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल असा इशारा सोलापूर येथील सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना दिला होता. यावर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर झाला होता. काही शेतकऱ्यांचा ऊस 20 महिन्यापासून शेतात उभा होता. त्यामुळे शेतकरी संघटना आणि राज्य सरकार यांच्यात चांगलीच जुंपली होती. वास्तविक पाहता 15 व्या महिन्यातच ऊस कारखान्याला जाणे आवश्यक असते. पण ऊस कारखान्याला योग्य वेळेत गेला नसल्यास वजनाला कमी भरतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. एफआरपीची रक्कम ऊस कारखान्याला गेल्यानंतर 14 दिवसाच्या आत देणे बंधनकारक असताना साखर कारखानदारांकडून एफआरपीचा कायदा पायदळी तुडविला जातो. यासाठी शेतकरी संघटना सातत्याने आंदोलने,मोर्चे करत असतात. अलीकडच्या काळात गोड साखर कडू होताना दिसत आहे.

ऊसाच्या शेतीसंबंधी अडचणी निर्माण झाल्याने शेतकरी इतर पिकांकडे वळू लागला

ऊसाच्या शेतीमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी इतर पिकांकडे वळला असून शेतकऱ्यांनी सफरचंदाच्या बागा,जिरेनियमची शेती,केळीच्या बागा,अद्रकची पिके यासारख्या अनेक पिकांचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत आहे. अश्याच नवीन शेती पिकाची लागवड करून पंढरपूर तालुक्यातील शेतकरी महेश काळे यांनी जिरेनियमचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे.

कॉस्मेटिक उत्पादनात जिरेनियमच्या तेलाचा उपयोग केला जातो

मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना शेतकरी महेश काळे यांनी सांगितले,की जिरेनियमची शेती उसापेक्षा नक्कीच फायद्याची आहे. या शेतीला कीड आणि खतांचा खर्च कमी असल्याने ही शेती शेतकऱ्यांना परवडणारी आहे. जीरेनियमच्या शेतीला हमीभाव असल्याने ऊसाच्या बिलाप्रमाणे पैशासाठी थांबावे लागत नाही. लगेच रोख पैसे मिळतात. बाजारात या जीरेनियमच्या तेलाला जास्त प्रमाणात मागणी असून शेतकऱ्यांनी ही शेती करायला काही हरकत नाही. ऊसाप्रमाणे या पिकाचा प्रश्न निर्माण होत नाही. जिरेनियमची रोपे मित्राच्या माध्यमातून आणली असून याच्या लागवडीसाठी जास्त मेहनत घ्यावी लागली नाही. ऊसाच्या शेतीला ज्या प्रमाणे आपण मेहनत घेतो,त्याप्रमाणे या पिकाला मेहनत घ्यावी लागते.


ऊसाच्या शेतीला ड्रीप असो अथवा नसो त्या पिकाला पाणी देता येते. पण जिरेनियमच्या शेतीला ड्रीपनेच पाणी द्यावे लागते. त्यामुळे पाणी वाचून पीक चांगले येते. लागवड करत असताना 4 फुटावर बेड सोडून रोपांची सव्वा फुटावर लागण केली आहे. या पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी सध्या दीड फुटावर याची लागवड करण्याचे नियोजन सुरू असून जिरेनियम पिकापासून काढलेले तेल मुंबई येथील व्यापाऱ्यांना 11 हजार रुपये किलो दराने विकले जात आहे. या जिरेनियम पिकाचे एकरी तेल 30 किलोच्या आसपास निघते. माझ्याकडे 4 एकर जिरेनियम क्षेत्र असून यातून मला वर्षाकाठी 12 लाख रुपये मिळतात. सर्व खर्च जावून 8 ते 9 लाख रुपये फायदा होतो. या तेलाचा कॉस्मेटिक उत्पादनात सुवासिक म्हणून उपयोग केला जातो. यामध्ये साबण,शाम्पू,तेल,चेहऱ्यावर लावण्याच्या स्क्रिम यासारख्या उत्पादनाचा समावेश होतो.

Updated : 15 July 2022 2:34 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top