माथेरान: शाळेत जाण्यासाठी कोणतंही वाहन नसलेलं महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण
रायगड जिल्हातील माथेरान पर्यटनस्थळ पर्यटनासाठी प्रसिध्द असले तरी स्थानिक विद्यार्थी पायाभूत सुविधाअभावी शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे दिसत आहे, प्रतिनिधी चंद्रकांत काळे यांचा रिपोर्ट....
X
रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध दुर्गम पर्यटक स्थळ माथेरान आणि याच माथेरानमध्ये वर्षाकाठी लाखो पर्यटक माथेरानला सहलीचा आनंद घेण्यासाठी येत असतात आणि माथेरान हे जागतिक पर्यटक स्थळ म्हणून ओळखलं जातं. मात्र, माथेरान येथे अनेक समस्यांच्या विळख्यात अडकलेलं हे पर्यटनस्थळ आहे. यातील महत्त्वाची समस्या म्हणजेच येथील वाहतूक व्यवस्था आणि या वाहतूक व्यवस्थेच्या विळख्यात शाळकरी विद्यार्थी व शालेय सुविधा हे सुद्धा सुटलेले नाही. हा भाग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्यामुळं या ठिकाणी वाहनांना बंदी आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना देखील शाळेत पायपीट करत जावं लागतं.
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या प्रकोपामुळं शाळा बंद होत्या. मात्र, आता शाळा सुरु झाल्या आहेत. माथेरानमध्ये एकूण तीन शाळा आहेत आणि या तीन शाळांपैकी सेंट झेव्हियर हायस्कूल या शाळेची स्थापना 1971 चाली झाले असून आजच्या आकडेवारीत या शाळेमध्ये 235 विद्यार्थी शिकत आहेत. ही शाळा माथेरान ओलंपिया ग्राउंड म्हणजेच माथेरान मध्यवर्ती ठिकाणापासून किमान साडेतीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे.
या शाळेत ज्य़ुनिअर केजी पासून दहावी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात. म्हणजेच दररोजच्या पाई किंवा घोड्यावरुन शाळेत जावे लागते आणि पायी चालत गेल्याने विद्यार्थ्यांना पहिला एक तास थकून जाण्यामुळे शिक्षणात मनच लागत नाही. ज्युनिअर केजी व पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परिस्थिती तर यापेक्षा बिकट होते. पालक त्यांना साडेतीन ते चार किलोमीटर खांद्यावर उचलून घेऊन जातात.
ज्या ठिकाणी शिक्षणाचा श्रीगणेशा म्हणजेच होतो. त्या ठिकाणी म्हणजे ज्युनिअर आणि सिनियर केजी मध्ये ही तीन चार वर्षाची मुलं कंटाळून आणि थकून शाळेत येतात. थकलेल्या या चिमुकल्यांना शाळेत काय समजत असेल? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.
माथेरानची सर्वात जुनी शाळा म्हणून ज्या शाळेची ओळख आहे ती शाळा म्हणजे सध्याची माथेरान गिरिस्थान नगरपरिषद प्राथमिक शाळा. या शाळेची स्थापना २४ डिसेंबर १८७४ साली झाली. सध्या ही शाळा माथेरान नगरपरिषदेकडे वर्ग करण्यात आली आहे. आज या शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत एकूण १८८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
आणि या ठिकाणची तिसरी शाळा म्हणजे वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळा... १९६९ साली सरस्वती विद्या मंदिर ही शाळा शांताराम गव्हाणकर यांनी स्थापन केली. पाचवी ते दहावीपर्यंत वर्ग या शाळेत आहेत. ज्या प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर यांनी ही शाळा स्थापन केली त्याच शांताराम यशवंत गव्हाणकर यांचं या शाळेला नाव देण्यात आलं आहे. सध्या शाळेत एकूण 96 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत . एकंदरीत या तिन्ही शाळेतल्या विद्यार्थ्यांची समस्या मात्र, एकच की पायपीट. वाहन नसल्याने चालत शाळेत यावे जावे लागते.
या संदर्भात आम्ही पालकांशी विद्यार्थ्यांशी आणि इथल्या शिक्षकांशी चर्चा केली. ते म्हणाले... या संदर्भात सेंट झेव्हिअर्स मध्ये शिक्षिका स्वाती यांनी मॅक्समहाराष्ट्रला सांगितले स्वाती यांनी याच सेंट झेव्हिअर्स हायस्कूल मध्ये शिक्षण घेतलं आहे. त्या आज आज स्वतः या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेली 18 वर्षे या शाळेत त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा नववीला या शाळेत आता शिकत आहे. त्या म्हणतात...
दररोज चार ते पाच किलोमीटर आम्ही चालत शाळेत येतो आणि चालत आल्या नंतर आमच्यामध्ये काहीच शिकवण्याची एनर्जी राहत नाही. म्हणून आमची टीचर म्हणून राज्य शासनाकडे विनंती आहे की, माथेरान मध्ये शाळकरी मुलांसाठी शाळेत येण्या-जाण्यासाठी काहीतरी पर्यावरणाला हानी न करणारं वाहन उपलब्ध करून द्यावं.
माथेरान गावातील कित्येक नागरिक माथेरान च्या लगत जी शहरे आहेत. पुणे मुंबई व इतर शहरांमध्ये आपल्या मुलांना शाळेत टाकत आहेत. यापुढे जर अशीच परिस्थिती राहिली तर शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या खूप कमी प्रमाणात राहील. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटावा म्हणून आम्ही सरकारला विनंती करत आहोत असे त्यांनी सांगितले. या शाळेत परदेशातील व महाराष्ट्राच्या बाहेरील इतर बोर्डाचे विद्यार्थी शिकण्यासाठी असायचे. परंतु वाहतुकीच्या समस्यांना कंटाळून आज इतर बोर्डाचे विद्यार्थी या शाळेत शिकत नाही. अशी खंतही स्वाती यांनी यावेळी व्यक्त केली.
या संदर्भात सेंट झेव्हिअर्सच्या मुख्याध्यापिका सिस्टर पाऊलीन सांगतात... गेल्या 50 वर्षापासून शाळा माथेरानला विद्यादानाचे काम करीत आहे. वाहतूक ही येथील प्रमुख समस्या आहे. केजी पासूनच्या मुलांना रोज 4 ते 5 किलोमीटर पायी चालत यावे लागते. मुले थकून जातात. पालक शिक्षक सर्वांची दमछाक होते. एखादा विद्यार्थी जखमी झाल्यास तात्काळ Ambulance मिळत नाही.
येथील सिस्टर्स वयस्कर आहेत. हात रिक्षा मिळणे मुश्कील जाते. कारण कॉन्व्हेंट फार लांब आहे. त्यामुळे चालक त्यांना अर्ध्या रस्त्यात सोडून जातात. येथील रस्ते प्रचंड चढ उताराचे आहेत. सामानाची ने आन करण्यास हमाल भेटत नाहीत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने पर्यावरण पोषक वाहतूक सुरू करावी. आणि विद्यार्थ्यांसोबतच इथल्या लोकांच्या प्रश्नांचा देखील विचार करावा. असं मत पाऊलीन यांनी व्यक्त केलं आहे.
पालक शिल्पा जाबरे यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भात मत व्यक्त करताना सांगितले. माझी मुलगी आज इयत्ता दहावी मध्ये शिकत असून मी तिला केजीपासून शाळेत खांद्यावर उचलून घेऊन जाते. तिचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. तरी पालक म्हणून शिक्षणासाठी निश्चित पर्यावरणपूरक शाळेतील मुलांना वाहन मिळावं आणि पुढे शिकणार्या मुलांचे शिक्षण सुरळीत व्हावं. अशी मागणी त्या करतात.
प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिर शाळेच्या शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील सांगतात मी या शाळेची माजी विद्यार्थी असून आज मी या शाळेची मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे. शांताराम गव्हाणकर यांनी खूप कठीण परिस्थितीत शाळा माथेरानमध्ये सुरू केली.
आज या गावात नगर परिषदेमध्ये असणारे सर्वच नगरसेवक या शाळेचे विद्यार्थी आहेत तसेच परदेशात सुद्धा या शाळेतून शिकून डॉक्टर इंजिनीअर वकील या पदावर कार्यरत असणारे सर्व या शाळेचे विद्यार्थी आहे आणि मी या शाळेचे विद्यार्थी आणि आज मुख्याध्यापक म्हणून या शाळेत कार्यरत असल्याचा मला अभिमान आहे.
आम्ही शिकलो आणि आज मुलांना शिकवत आहोत. परंतु जी वाहतूकीची सुविधा आणि पायपीट आहे. याचा आम्ही खूप त्रास काढलेला आहे. परंतु आजची ही पिढी चालण्याचा त्रास सहन करत नाही. म्हणून मुंबई-पुण्यासारख्या शहरात आता गावातील मुलं शिकण्यासाठी जात आहेत. या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या कमी प्रमाणात दिसत आहे. तरी शासनाकडे आम्ही विनंती करीत आहोत की, पर्यावरणाला पूरक असे वाहन या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी मिळावं.
माथेरान गिरिस्थान नगरपरिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ढेबे सर सांगतात... पहिली ते सातवी पर्यंत ची ही नगरपालिकेच्या माध्यमातून चालवणारी शाळा आहे. याचप्रमाणे माथेरानमध्ये एकूण तीन शाळा आहेत. तिनही शाळेच्या समस्या एकंदरीत समानच आहे आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच प्रवासाचा पायी चालत येण्याजाण्याचा शाळेपर्यंत येण्या-जाण्यासाठी किमान साडेतीन ते चार किलोमीटरचा अंतर पायी जावं लागतं. किमान साडेतीन चार किलोमीटरचा अंतरामुळे मुलांमध्ये थकवा जाणवतो. व अभ्यासावर याचा परिणाम होतो. तरी नगरपालिकेच्या वतीने शासनाच्या वतीने या मुलांसाठी पर्यावरणाला हानी न करणारं वाहन उपलब्ध करून द्यावं. अशी मागणी मुख्याध्यापक ढेबे सर यांनी केलं आहे.
प्रा. शांताराम गवाणकर शाळेतील अतिरिक्त झालेले शिक्षक दिनकर चव्हाण, सामाजिकशास्त्र व क्रीडा शिक्षक, तसेच वैशाली ढोले बी.एस.सी. बी.एड यांची सहावी ते आठवी वर्गासाठी फेरनियुक्ती करावी, या मागणीसाठी गव्हाणकर एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त शशीभूषण गवाणकर आणि माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगितली होती. त्या वेळी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रायगड जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना त्या दोन्ही शिक्षकांची नेमणूक तत्काळ शाळेत करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, ठोस कार्यवाही न झाल्यास पुन्हा आपल्याला संपर्क साधण्याची सूचना शिक्षणमंत्री गायकवाड यांनी खेडकर यांना केली आहे.
माथेरान स्थानिक हात रिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदे यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली ते म्हणाले… माथेरानमध्ये अनेक अपंग मुलं आहेत. त्यांना शिकण्याची इच्छा आहे. परंतु वाहतुकीच्या संदर्भात खूप खडतर प्रवास असल्यामुळे या अपंग मुलांना शाळेत जाता येत नाही. तरी किमान वृद्ध व्यक्ती आणि अपंग विद्यार्थी यांना त्यांच्या हक्काचं जीवन जगता यावं. यासाठी आमच्या मागणीप्रमाणे माथेरानमध्ये ई रिक्षा लवकरात लवकर सुरू करावी असं मत सुनिल शिंदे यांनी व्यक्त केलं आहे.
शालेय विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे दप्तराचे ओझे पाठीवर वाहून शिक्षण घेण्यासाठी जवळपास चार ते पाच किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. त्यात अद्यापही बदल घडवून आलेला नाही. यासाठी पर्यावरण पूरक ई रिक्षा ही एकमेव पर्यायी व्यवस्था उपलब्ध असावी, अशी मागणी श्रमिक रिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदे यांच्याकडून सातत्याने होत आहे.
सरकारने पर्यावरणपूरक वाहतूक सुरू करण्यासाठी राज्य सरकार केंद सरकारकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचे सांगून फेब्रुवारी २०१८ ला तसा प्रस्ताव पाठवला. श्रमिक रिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. न्या. इंदिरा बॅनर्जी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी याचिका दाखल केली आहे. या सर्व कायदेशीर प्रक्रियेमुळे आजतागायत इथल्या शालेय विद्यार्थ्यांची ससेहोलपट होत आहे. दररोज त्यांना चार ते पाच किलोमीटर पाठीवर दप्तराचे ओझे घेऊन चालत जावे लागते. सर्व प्रक्रियेमुळे विद्यार्थी शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार त्यांना वाहतुकीचा जो अधिकार दिला आहे, त्यापासून वंचित राहावे लागते.
आम्ही या संदर्भात काही विद्यार्थ्यांशी देखील बातचीत केली... इयत्ता 10 वीत शिकणारी प्राची शैलेश बापर्डेकर सांगते... विद्यार्थिनींना सुद्धा शाळेत येण्या-जाण्याचा त्रास होतो. कित्येक किलोमीटरवरून मुलं दरीखोर्यातून शाळेत येतात. त्यामुळं या मुलांचं शिक्षणात पहिल्या दुसऱ्या तासाला मन लागत नाही व काहीच शिकवलेलं कळत नाही. आणि समजतही नाही अशी प्रतिक्रिया प्राचीने दिली,
अनामिका नागेश कदम सांगते... मी पहिलीपासून या शाळेत शिकणारी विद्यार्थी आहे. येण्याजाण्याच्या त्रासामुळे आमच्या अभ्यासावर मोठा परिणाम होतो. मन लावून शिकता येत नाही. आरोग्याच्या दृष्टीकोनातून खूप त्रास होतो. तरी आम्हाला व आमच्या पुढच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत येण्या-जाण्यासाठी वाहनाची सोय व्हावी. अशी मागणी अनामिका करते.
रस्त्यावरून चालणारे विद्यार्थ्यांना आम्ही त्यांच्या प्रवासाचा अनुभव विचारला ते म्हणाले... शाळेत येण्या-जाण्यासाठी पायपीट करावे लागते. त्यामुळं शाळेत अभ्यासात मन लागत नाही आणि त्याचा परिणाम परीक्षेत होतो. परीक्षेत रिझल्ट आम्हाला जो हवा तशा पद्धतीने येत नाही. तरी कृपया लवकरात लवकर शाळेत येण्या-जाण्यासाठी पर्यावरण पूरक वाहन मिळावं अशी मागणी हे विद्यार्थी करतात.
युसरा समीर मुजावर ही शाळेतील विद्यार्थीनी सांगते...माथेरान: शाळेत जाण्यासाठी कोणतंही वाहन नसलेलं महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाणअसल्याचं मत प्रेरणा सावंत यांनी व्यक्त केलं आहे.
माथेरान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्याबरोबर आम्ही यासंदर्भात चर्चा केली असता त्यांनी माथेरान च्या शिक्षणाच्या वाहतुकीसंदर्भात ला हा विषय अतिशय जटिल असून पर्यावरणाला हानी न होणारं मूलभूत वाहन या विद्यार्थ्यांना मिळावं अशी मागणी सरकारकडे केली आहे. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणावरचं एखाद्या देशाचं भवितव्य ठरवलं जातं. मात्र, या गावातील विद्यार्थ्याचं शिक्षणच वाहन नसल्यामुळं कठीण होत आहे. त्यामुळं पर्यावरणाचा विचार करुन विद्यार्थ्यांना वाहन उपलब्ध करुन द्यावं अशी मागणी गावातील नागरिकांसह शिक्षक विद्यार्थ्यांनी केली आहे.