निवडणुकीत मतदान केलं नाही म्हणून कुटुंबाला केलं बहिष्कृत
Max Maharashtra | 11 May 2019 10:27 AM IST
जळगाव - ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पॅनलला मतदान केले नाही म्हणून एका कुटुंबाला जात पंचायतीच्या बाहेर काढल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे तळवाडे येथील सरपंचासह 17 जणांवर जातपंचायतीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळवाडे येथील शरद उखा पाटील यांनी मारवड पोलीस स्टेशनला या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. 25 मार्च 2019 रोजी तळवाडे ग्रामपंचायतीची निवडणूक झाली तेव्हा मी रामकृष्ण पाटील यांच्या पॅनलला मदत न करता युवराज फकीरा पाटील यांच्या पॅनलला मदत केली म्हणून माझ्या नातेवाईकांना राग आल्यानं सर्वांनी संमती करून मला जात समूहातून बाहेर काढले आहे. तसंच आमच्या मानवी हक्क व नैसर्गिक तत्वानुसार असलेले सर्व रोटी व बेटी व्यवहार बंद केल्याचं शरद पाटील यांनी म्हटलं आहे.
नातेवाईक आपल्या कुटुबांची सामाजिक व आर्थिक पिळवणूक करत असून शाळा, सामाजिक कार्यक्रम स्मशानभूमी, धार्मिक कार्यक्रम मिरवणूक आदी ठिकाणी सहभागी होण्यास प्रतिबंध केला असल्याचं शरद यांनी म्हटलं आहे. या नातेवाईकांचं समाजविघातक वर्तन कुटुंबाच्या जीविताला व सामाजिक राहणीमानाला घातक ठरले असल्याचं या तक्रारदाराचं मत आहे.
शरद पाटील यांना भाऊबंदकीतील 6 मे रोजी झालेल्या विवाहात व 7 मे रोजी अक्षय्य तृतीयेला बहिष्कृत केल्याचा अनुभव आला. तसंच रामकृष्ण पाटील याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी 17 जंणाविरुद्ध महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार पासून व्यक्तीचे संरक्षण अधिनियम 2016 चे कलम 3, 4, 5 ,6 , 7 प्रमाणे जातपंचायत कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Updated : 11 May 2019 10:27 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire