Facebook चे अल्गोरिदम भारतात द्वेष पसरवण्याचं काम करतं?
X
फेसबूक वर द्वेष पसरवण्या संदर्भात धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहेत. द्वेषपूर्ण पोस्ट रोखण्यात फेसबूकला अपयश आल्याचे आरोप या अगोदर देखील झाले आहेत. मात्र, फेसबूकच्या सिस्टमवरच (फेसबुक चे एल्गोरिदम) आता प्रश्न उपस्थित केले जात आहे. फेसबुकची अंतर्गत यंत्रणा द्वेष (फेसबुक चे एल्गोरिदम) पसरवणाऱ्या पोस्टला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप फेसबूकवर करण्यात आला आहे. म्हणजेच, तुम्हाला काय पहायचं आहे? किंवा काय नाही? हे महत्त्वाचं नाही. मात्र, Facebook ची अंतर्गत यंत्रणा तुम्हाला द्वेषयुक्त आणि प्रक्षोभक माहिती देऊ शकते.
तुम्ही म्हणाल फेसबूकची अंतर्गत प्रणाली म्हणजे काय? तर फेसबुकचे अल्गोरिदम. सोप्या भाषेत सांगायचे तर, फेसबुक किंवा कोणत्याही सर्च इंजिनवरुन लोकांपर्यंत कोणत्या प्रकारची माहिती द्यायची. हे ठरवण्याचं काम फेसबुक चे एल्गोरिदम करते.
उदाहरणार्थ, तुम्ही तुमचं फेसबूक लॉग इन केलं तक Facebook तुम्हाला कोणत्या प्रकारचे पेजेस किंवा सामग्री फॉलो करायची आणि कोणती सामग्री पाहायची. याबद्दल सूचना देतं.
दरम्यान, फेसबुकच्या काही कर्मचाऱ्यांनी यावर एक संशोधन केलं. मात्र, या संशोधनाचे निष्कर्ष आल्यावर त्यांना धक्काच बसला. संशोधनात त्यांनी तुमच्या माझ्या सारख्या वापरकर्त्याप्रमाणे फेसबूक अकाउंट तयार केली होती. त्यात असं आढळून आलं की, तयार करण्यात आलेल्या नवीन फेसबुक अकाउंटवर द्वेष, हिंसा आणि खोट्या बातम्यांवर आधारित सामग्री पाहण्यासाठी किंवा फॉलो करण्यासाठी फेसबूककडून सुचवण्यात आलं होतं.
दरम्यान, यातील बहुतांश साहित्य हे पाकिस्तान आणि मुस्लिमविरोधी द्वेष पसरवणारे होते.
एका रिपोर्टनुसार, केरळमधील फेसबुक संशोधकाने दोन वर्षांपूर्वी एक युजर अकाउंट तयार केले होते. तेव्हा संशोधनात फेसबुकद्वारे, द्वेषयुक्त भाषणं आणि चुकीची माहिती असलेली सामग्री सुचवण्यात आली होती.
'द इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, फेसबुकच्या प्रवक्त्याने सांगितले आहे की, अहवालाचे पूर्ण विश्लेषण करण्यात आले आहे. त्यातून सुधारणा करण्यास मदत देखील होणार आहे. त्यांनी असंही म्हंटल आहे की, फेसबुकने अल्गोरिदमच्या यंत्रणेतून राजकीय गट काढून टाकले आहेत. यावरुन द्वेष, प्रक्षोभक आणि हिंसाचाराचे साहित्य पुरवण्यात राजकीय गटांचा सहभाग असल्याचं स्पष्ट होतं.
प्रवक्त्याने सांगितले की, द्वेषयुक्त भाषणाला आळा घालण्याचे आमचे कार्य सुरूच आहे आणि द्वेषयुक्त सामग्री नष्ट करण्यासाठी आम्ही आमची प्रणाली आणखी मजबूत केली आहे. यामध्ये ४ भारतीय भाषांचा समावेश करण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
'न्यूयॉर्क टाईम्स'च्या रिपोर्ट संदर्भात फेसबुकने ही प्रतिक्रिया दिली आहे. हा अहवाल भारतातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या संदर्भात न्यूयॉर्क टाईम्स ने प्रसिद्ध केला होता.
न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या वृत्तात संशोधकाचा हा अहवाल फेसबूक कर्मचार्यांनी लिहिलेल्या डझनभर अभ्यासांपैकी एक होता. दरम्यान, न्यूयॉर्क टाईम्ससह इतर वृत्तसंस्थांनी मिळून एक दस्तऐवज तयार केला आहे. या दस्तऐवजाला 'द फेसबुक पेपर्स' असं नाव देण्यात आलं आहे.
फेसबुकचे माजी अधिकारी फ्रान्सिस हॉगेन यांचा हे दस्तऐवज तयार करण्यात मोठा वाटा आहे.
दरम्यान, फ्रान्सिस हॉगेन आता फेसबूकच्या चुका शोधत आहेत. फेसबुकच्या कर्मचार्यांनी संशोधन केलेल्या संशोधनाचा अहवाल फेब्रुवारी 2019 मध्ये ब्लूमबर्गमध्ये प्रकाशीत करण्यात आला होता. फेसबूक संदर्भात तीन महिने केलेल्या संशोधनातून मिळालेले निष्कर्ष धक्कादायक असल्याचे त्यात सांगण्यात आले होते.
नवीन फेसबूकचं अकाउंट काढणाऱ्या युजरच्या फीडला जणू काही बनावट बातम्या आणि प्रक्षोभक (भावना भडकावणाऱ्या) फोटोंचा जणू काही पूर आला असल्याचं दिसून आलं. त्यात शिरच्छेदाचे ग्राफिक्स, फोटो, पाकिस्तानवर भारताचे हवाई हल्ले, हिंसाचार आणि धर्मांधतेच्या फोटोंचा समावेश देखील होता.
"थिंग्ज दॅट मेक यू लाफ" नावाच्या ग्रुपमध्ये असलेल्या खोट्या बातम्यांपैकी एक म्हणजे पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 300 दहशतवादी मारले गेले. रिपोर्टनुसार, त्यानंतर एका कर्मचाऱ्याने लिहले होते की, 'गेल्या 3 आठवड्यात मी मृत लोकांची इतके जास्त फोटोज पाहिले आहेत जेवढे मी माझ्या संपूर्ण आयुष्यात पहिले नाहीत.'
अहवालात असं देखील सांगण्यात आलं आहे की, सोशल मीडियाच्या या दिग्गज कंपनीच्या अंतर्गत दस्तऐवजांवरून असं दिसून येतं की, कंपनीला अनेक वर्षांपासून या समस्यांची जाणीव आहे.
दरम्यान, हे लक्षात घेणं गरजेचं आहे की, फेसबुकवर यापूर्वी सुद्धा द्वेषयुक्त मजकूर रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेषत: मुस्लीमविरोधी द्वेषयुक्त पोस्ट हाताळताना पक्षपात केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
फेसबुकची माजी कर्मचारी सोफी झांगने अलीकडेच म्हटलं आहे की, फेसबुकने भाजप खासदाराशी संबंधित फेक अकाउंट काढले नव्हते. मात्र, निवडणुकांवर प्रभाव टाकणाऱ्या काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या बनावट खाते काढले होते.
दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 दरम्यान हे नेटवर्क फेसबुकसमोर आले होते. त्यांनी सांगितल्यानुसार 2019 च्या शेवटी खोट्या खात्यांसह या नेटवर्कची देखील माहिती मिळाली होती. तेव्हा झांग यांनी बनावट शेअर्स, लाईक्स, कमेंट्स आणि प्रतिक्रिया निर्माण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या बनावट खात्यांसह चार नेटवर्कचा मागोवा घेतला होता. यातील दोन नेटवर्क भाजप नेत्यांशी जोडलेले होते, त्यापैकी एक खासदार होता. याशिवाय काँग्रेसच्या एका नेत्याशी दोन बनावट नेटवर्क जोडण्यात आले होते.
अंखी दास प्रकरण...
फेसबुक इंडियाच्या वादग्रस्त संचालक अंखी दास यांना गेल्या वर्षी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्या राजीनाम्याचं मूळ कारण कळू शकलं नाही, परंतु फेसबुकने त्यांना पद सोडण्यास सांगितले असावे हे नाकारता येणार नाही.
दरम्यान, अंखी दास तेव्हा प्रसिद्धी झोतात आल्या होत्या. जेव्हा वॉल स्ट्रीट जर्नलने, त्यांच्या संदर्भात 'फेसबुकने तिच्या सांगण्यावरून भाजप आमदाराची मुस्लिम विरोधी पोस्ट हटवली नाही' असं वृत्त दिलं होतं. त्या वृत्तात असं देखील सांगण्यात आलं होतं की, तेलंगणाच्या आमदाराची द्वेष पसरवणारी पोस्ट फेसबुक इंडियाच्या टीमने शोधली होती. ती काढून टाकण्याचा सल्ला दिला होता. पण असं केल्याने कंपनीचे भारत सरकारसोबतचे संबंध बिघडतील आणि त्याचा परिणाम या देशातील फेसबुकच्या व्यवसायावर होईल, असे अंखी दासने म्हटले होते.