EXCLUSIVE - मुंबईकरांचं स्पिरीट की हतबलता ?
Max Maharashtra | 2 July 2019 9:29 AM IST
X
X
सुमारे दोन कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतल्या नागरिकांसाठी जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेचा दरवर्षी पावसाळ्यात बोजवारा उडतो. राज्यकर्ते आणि प्रशासनाकडून मान्सूनपूर्व कामं केल्याचे दावेही होतात. मात्र, सामान्य मुंबईकरांचा त्रास काही केल्या कमी होत नाही. २ जुलै (मंगळवार) रोजीही मुंबईत जोरदार पाऊस झाला. जोरदार पावसामुळं रात्री अकरा वाजेनंतर लोकलं रेल्वेची वाहतूक सेवा पूर्णतः कोलमडल्याचं चित्र पाहावयास मिळालं. त्यामुळं देशात सर्वाधिक कर भरणारे मुंबई’कर’ दरवर्षी स्वतःलाच हा प्रश्न विचारत असतील की पाणी तुंबण्यासाठीच आम्ही कर भरतो का ?
मॅक्स महाराष्ट्रच्या टीमनं रात्री अकरा ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत कुर्ला ते विद्याविहार हा अवघा पाच मिनिटांचा प्रवास (रेल्वेनं) सामान्य प्रवाशांसोबत केला. यावेळी अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवाशांनी कुर्ला ते विद्याविहार हा साधारणतः पंधरा ते वीस मिनिटांचा प्रवास रेल्वेच्या ट्रॅकवरून केला. प्रशासनाची आपत्कालीन यंत्रणा या प्रवासात कुठेही दिसली नाही. एकमेकांच्या मदतीला, धीर द्यायला प्रवाशीच तेवढे होते. रेल्वे प्रशासनाची कुठलीही यंत्रणा रेल्वेत अडकून बसलेल्या प्रवाशांना सूचना देत नव्हती की, त्यांना मदतीसाठी कुणी रेल्वेतही आलं नाही. सबकुछ रामभरोस असा कारभार रेल्वे प्रशासनाचा अनुभवायला मिळाला. त्यातल्या त्यात विद्याविहार रेल्वे स्टेशनला लागूनच प्लेटफॉर्मच्या जवळ दोन पोलिस कर्मचारी प्रवाशांना प्लेटफॉर्मवर चढण्यासाठी मदत करतांना दिसले, एवढच दिलासादायक चित्र तेवढं या प्रवासात दिसलं.
मुंबईचं स्वतःचं स्पिरीट आहे. अनेक संकटातून तात्काळ सावरण्याचं हेच स्पिरीट आजही कायम आहे. मात्र, याच स्पिरीटच्या गोंडस नावाखाली राज्यकर्त्यांनी आजवर आपलं अपयश लपवलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. एरव्ही मुंबईकरांविषयी सहानुभूती दाखवण्यासाठी राजकीय नेत्यांनी लोकल ट्रेनमधून माध्यमांच्या प्रतिनिधींना सोबत घेत प्रवास केल्याच्या अनेक बातम्या आपण आजवर पाहिल्या आहेत आणि भविष्यातही पाहूच. मात्र, मॅक्स महाराष्ट्रच्या टीमनं पावसामुळं ट्रेनमध्येच अडकून राहिलेल्या प्रवाशांचा स्टेशनपर्यंतचा प्रवास स्वतः अनुभवलाय तो याच साठी की ही दृश्य पाहून तरी यंत्रणांना प्रवाशांच्या त्रासाची कल्पना यावी. अन्यथा आहेच की मग मुंबईकरांचं ‘स्पिरीट’…आता हे मुंबईकरांचं स्पिरीट म्हणायचं की हतबलता हा प्रश्न उपस्थित करण्याची वेळ आलीय…
Updated : 2 July 2019 9:29 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire