मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर: आणखी एका शेतकऱ्यानं ऊसाचा फड पेटवला
X
बीड जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेवराई तालुक्यात ऊसाचा फड पेटवून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आता वडवणी तालुक्यात देखील एका संतप्त शेतकऱ्याने दीड एकर वरील ऊस पेटवून दिला आहे.
दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या बीड जिल्ह्यात, शेतकऱ्यांनी मागील तीन वर्षात समाधानकारक पाऊस झाल्याने उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली. परंतु यावर्षी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झालीय. गेवराईच्या हिंगणगाव येथील नामदेव जाधव या शेतकऱ्यांने उसाचा फड पेटवून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना, आता वडवणी तालुक्यात चिंचवड येथील शिवाजी गोंडे या शेतकऱ्याने कारखाना ऊस घेऊन जात नाही. म्हणून संतापाच्या भरात दीड एकर उसाच्या फडाला आग लावली आहे.
या शेतकऱ्यां प्रमाणेच जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांची परिस्थिती काही वेगळी नाही. बीड जवळील रंगराव तोडकर यांनी मोठ्या आशेने उसाची लागवड केली. अर्धा ऊस कारखान्याने तोडून देखील नेला, मात्र उर्वरित चार एकर वरील ऊस तसाच पडून आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने उसाची तोडणी हार्वेस्टर द्वारे करावी अशी मागणी हे शेतकरी करत आहेत.साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपत आला असताना अद्याप जिल्ह्यातील पाच लाख मेट्रिक टन पाऊस गाळपाविना पडून आहे. पुढील काही दिवसात या उसाची तोडणी होण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना हेक्टरी अडीच लाख रुपयांची मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी संघटनेमार्फत करण्यात आली आहे.मान्सून अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय, अशातच जिल्ह्यातील पाच लाख मेट्रिक टन उसाचा प्रश्न जैसे थेच आहे. त्यामुळे आता प्रशासनासमोर या उसाचे गाळप करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
सध्या विष घ्यायला पैसे नाहीत, त्यामुळं तोडायला पैसे द्यायचे कुठुन ? हा मोठा प्रश्न पडला होता. राग वैतागात सकाळी उठुन अखेर त्यांचा संयम सुटला, राग अनावर झाला डोळ्यात पाणी आणुन स्वतः ऊस पेटवून दिल्याचा व्हीडीओ त्यांनी सोशल मिडीयावर सोडला. यावरून जिल्ह्यातला ऊस उत्पादक शेतकरी किती हताश झालाय हे दिसत असल्याचे ऊस उत्पादक शेतकरी शिवाजीराव गोंडे यांनी सांगितले.