Home > Election 2020 > EVM मधील मतांची आणि मतमोजणीची आकडेवारीच जुळेना

EVM मधील मतांची आणि मतमोजणीची आकडेवारीच जुळेना

EVM मधील मतांची आणि मतमोजणीची आकडेवारीच जुळेना
X

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवड़णुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं. या निवडणुकीचं प्रत्येकानं आपापल्या परीनं विश्लेषण करायला सुरूवात केलीय. त्यातूनच एक धक्कादायक माहिती पुढे येत आहे, ती म्हणजे प्रत्यक्ष ईव्हीएममध्ये झालेलं मतदान आणि ईव्हीएममध्ये मोजलेल्या मतांच्या आकडेवारीमध्ये तफावत असल्याचं पुढं येतंय. लोकसभा निवडणुकीतल्या पाहिल्या चार टप्प्यांमध्येच हा प्रकार घडल्याचंही समोर येत आहे. निवडणूक आयोगानंही यावर अद्याप स्पष्टीकरण दिलेलं नाही, त्यामुळं शंका अधिकच वाढत आहे.

पहिल्या चार टप्प्यांमध्ये ३७३ मतदारसंघात मतदान झालं होतं. यापैकी २२० मतदारसंघात प्रत्यक्ष ईव्हीएममध्ये नोंदवलेलं मतदान आणि ईव्हीएममध्ये झालेल्या मतमोजणीत तफावत असल्याचं समोर येतंय. विशेष म्हणजे निवडणूक आयोगानं त्यांच्या eciresults.nic.in. या वेबसाईटवर मतदानाची ही आकडेवारी टाकली होती. २७ मे रोजी अंतिम आकडेवारी असं टिकर (माहिती पट्टी) या वेबसाईटवर चालवली जात होती. ती अचानकपणे बंदही करण्यात आली. यासंदर्भात जेव्हा पत्रकारांनी निवडणूक आयोगाला विचारलं की अंतिम आकडेवारीची पट्टी वेबसाईटवरून का काढण्यात आली त्यावर आयोगानं ही अंतिम आकडेवारी नसून सुधारित आकडेवारी लवकरच वेबसाईटवर टाकली जाईल, असं उत्तर दिलं.

तामिळनाडू

तामिळनाडू इथल्या कांचीपुरम लोकसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार १२ लाख १४ हजार ८६ इतकं मतदान ईव्हीएममध्ये नोंद झालं होतं. मात्र, ईव्हीएम मशीनमध्ये १२ लाख ३२ हजार ४१७ इतकी मतं मोजली गेली. म्हणजेच १८ हजार ३३१ अतिरिक्त मतं आली कुठून ? यावर निवडणूक आय़ोग गप्प आहे.

धर्मपुरी या लोकसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार ईव्हीएममध्ये ११ लाख ९४ हजार ४४० इतकं मतदान झालं होतं. मात्र, जेव्हा ईव्हीएममधील मतांची मोजणी झाली तेव्हा १२ लाख १२ हजार ३११ इतकी मतं मोजली गेली. म्हणजेच १७ हजार ८७१ इतकी मतं आली कुठून, या प्रश्नावर निवडणूक आयोगाचं मौन आहे.

श्रीपेरूंबदुर या लोकसभा मतदारसंघातही निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार ईव्हीएममध्ये १३ लाख ८८ हजार ६६६ इतकं मतदान झालं होतं. मात्र, जेव्हा ईव्हीएमची मतमोजणी झाली तेव्हा त्यात १४ लाख ३ हजार १७८ इतकं मतदान झाल्याचं समोर आलंय. त्यामुळं १४ हजार ५१२ एवढी अतिरिक्त मतं आली कुठून असा प्रश्न उपस्थित होतो.

उत्तरप्रदेश

मथुरा लोकसभा मतदारसंघातही ईव्हीएममध्ये १० लाख ८८ हजार २०६ इतकं मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं वेबसाईटवर दिलेल्या आकडेवारीत आहे. तर प्रत्यक्षात जेव्हा मतमोजणी झाली तेव्हा १० लाख ९८ हजार ११२ इतकं मतदान झाल्याचं समोर आलंय. म्हणजेच प्रत्यक्ष ईव्हीएममध्ये झालेलं मतदान आणि मतमोजणीमध्ये ९ हजार ९०६ मतं अतिरिक्त ठरलेली आहेत.

मथुरा लोकसभा मतदारसंघातून हेमा मालिनींना ६ लाख ६७ हजार ३४२ इतकी मतं मिळाली. तर प्रतिस्पर्धी राष्ट्रीय लोकदलाचे कुमार नरेंद्र सिंह यांना ३ लाख ७७ हजार ३१९ मतं मिळाली होती.

मतदानाची प्रक्रिया

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील प्रेसिडींग अधिकारी यांची जबाबदारी असते की, दर दोन तासांनी झालेलं मतदान हे वरिष्ठांना कळवणं, त्यामुळं झालेल्या मतदानाची आकडेवारी वेबसाईटवर लवकर अपलोड करता येते.

हे गंभीर आहे – ओ.पी.रावत, माजी निवडणूक आयुक्त

प्रथमदर्शनी हा सर्व प्रकार गंभीर दिसतोय. ईव्हीएममध्ये झालेलं मतदान आणि प्रत्यक्ष मोजण्यात आलेल्या मतांमध्ये तफावत असल्याबाबत मला फारशी माहिती नाही. माझ्या कार्यकाळात असं काही घडलेलं नव्हतं.

या मुद्द्यांमुळं शंका वाढतेय

१) पहिल्या चार टप्प्यातील मतदान झालं तेव्हा आयोगानं आपल्या वेबसाईटवर ही अंतिम आकडेवारी असल्याचं का म्हटलं होतं

२) पहिल्या चार टप्प्यातील मतदानाची आकडेवारी जी वेबसाईटवर टाकली होती, नंतर ती का काढण्यात आली

३) निवडणूक आयोग अजूनही या संपूर्ण प्रकरणावर मौन का बाळगून आहे, त्यांच्याकडे लपवण्यासारखं काय आहे...

४) या सावळ्या गोंधळामागे ईव्हीएमची छेडछाड लपवण्याचा प्रयत्न आहे का

Updated : 31 May 2019 6:04 PM IST
Next Story
Share it
Top