Home > मॅक्स रिपोर्ट > बंदुकीच्या सावटाखालची कविता, तळोजा कारागृहात राजकीय सेन्सॉरशीप?

बंदुकीच्या सावटाखालची कविता, तळोजा कारागृहात राजकीय सेन्सॉरशीप?

भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी रमेश गायचोर यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वीरा साथीदार यांच्या निधनानंतर आदरांजली वाहणारी कविता लिहिली आहे. पण तुरुंग प्रशासनाने या कवितेला 'नक्षली' ठरवत ती प्रसिद्ध न करण्याची भूमिका घेतली आहे. ही कविता खरंच नक्षली विचारसरणी पेरणारी आहे की तुरुंगात या आरोपींवर राजकीय सेन्सॉरशीप लादली जाते आहे, हे मांडणारा मुक्त पत्रकार पार्थ एम.एन. यांचा स्पेशल रिपोर्ट....

बंदुकीच्या सावटाखालची कविता, तळोजा कारागृहात राजकीय सेन्सॉरशीप?
X

"एक फकीर वि. रा. साथीदार सारखा...

आटपाट नगर असतं

गाव असतं शहर असतं

तालुका - जिल्हा - राज्य - देश असतो

त्यात एक व्यवस्था असते शोषण करणारी

शोषित असतात दबलेले, पिळलेले तळागाळातले

आटपाट नगरात चळवळ असते शोषणअंताची

आणि त्या चळवळीत एक फकीर असतो

वीरा साथीदार सारखा

सतरंज्या पासून प्रेसनोटपर्यंत

फोनाफोनीपासून फंडिंगपर्यंतचं

मैदानातलं अगदी सगळंच ओझं

आपल्या कमिटेड खांद्यावर

एकहाती वाहून नेणारा फकीर

इझम; थिअरीत कथा कादंबऱ्यात

गाणं, काव्य, शाहीरीत लेखांत

भाषणांत आंदोलन मोर्चात

सभा संम्मेलनात घमासान मिटींगात

संघटनेच्या कोणत्याही उचापतीत

सतत पुढच राहणारा फकीर

बेनिफिट्सपासून अलिप्त दूर

आयसोलेट ठेवला जाणारा

मात्र,

लॉसेस बाबतीत सतत पुढाकारा, घेणारा

समूहाशी तादात्म्य पावलेला फकीर

स्वत:चं अगदी सगळंच पणाला लाऊन

स्वत:चं अगदी सगळंच उधळून

स्वत:चं अगदी सगळंच बाजूला टाकून

घर संसारातल्या प्रचंड दु:ख, वेदना, समस्या

भांडणाचं रोजचंच मढं घरात ठेऊन

विचार तत्व आयडॉलॉजी

संघटना समूह जनसंघर्षाला

अजेंडयावर ठेवणारा

तनानं आणि मनानं

मासेसपर्यंत खोलखोल गेलेला

मासेसकडून जगायला लढायला शिकलेला फकीर

अस्सल मातीतलाच

भिमाच्या निळाईनं शिंपलेल्या मातीतून

जैविकरित्या उगवलेला

जातीअंताची मूलभूत परंपरा सांगणारा आंबेडकराईट

वर्गाताचा जग बदलणारा वारसा कोळून प्यालेला Marxist..

अर्ध्याला अर्ध चित्रं भेटून

भारतीय क्रांतीचं परिपूर्ण मूर्त चित्र

गवसल्याच्या कॉन्फिडन्समध्ये वावरणारा

जय भीम लाल सलामवाला

एखाद्या कसलेल्या एथलीटप्रमाणे

जात-वर्ग-स्त्री दास्यअंताच्या मैदानात धावणारा फकीर

बुद्ध-कबीर-तुकाराम-भगतसिंगाच्या फकिरीचा

आदर्श जगणारा फकीर

भवतालच्या सेटल होत जाणाऱ्या

सेटल झालेल्या

सोसंल तेवढं वर्कच्या गोतावळ्यात

स्वत:च्या अनसेटलपणाची खंत

मनात दाबून दडवून जगणारा

उच्च जात वर्गीयांच्या जाणिवा-नेणीवांची

अघोषित मक्तेदारी झेलत

आतल्या आत स्वत:ला आकसून घेत जगणारा

अस्वस्थ अशांत फकीर

लाईट्स एक्शन कॅमेऱ्याच्या गदारोळात

पिढ्या न पिढ्याच्या दलित गरीब जिंदगीवर

आकस्मात पडलेल्या भांडवली प्रकाशझोतानं

दिपून गेलेला फकीर

प्रचंड बॅकलॉगचा जन्मापासूनचा साठा

बाळगणारं मन नावाचं तुडुंब धरण फुटून

काहीसा सैरभैर झालेला फकीर"

ही कविता आहे रमेश गायचोर यांची....एल्गार परिषद प्रकरणात रमेश गायचोर सध्या तळोजा गृहात आहेत. रमेश गायचोर यांनी जातीअंताची लढाई लढणारे आणि आंबेडकरवादी मित्र वीरा साथीदार यांच्या कोरोनामुळे झालेल्या निधनानंतर ही कविता लिहिली आहे....वर दिलेली कविता मोठी आहे...पण त्याची पहिली दोनच पानं वर दिली आहेत....आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पूर्ण कविता न देता कवितेची दोनच पानं का....तर याचे कारण आहे, तळोजा कारागृहाच्या अक्षीक्षकांना कवितेची ही पहिली दोन पानं 'आक्षेपार्ह' वाटतात. तळोजा कारागृहाचे अधीक्षक कौस्तुभ कुर्लेकर यांनी मुंबईत सत्र न्यायालयाकडे ३० जून २०२१ रोजी रमेश गायचोर यांच्याबद्दल तक्रार केली आहे.

"न्या. बंदी रमेश गायचोर याने वीरा साथीदार यांच्यावर लिहीलेल्या कवितेचे पान क्र.१ व २ मधील मजकूर आक्षेपार्ह असल्याचे मा.पोलीस आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक (न.वि.अ.), नागपूर यांनी गोपनीय पत्रान्वये या कार्यालयास कळविले आहे. त्यानुसार महाराष्ट्र कारागृह नियमावली प्रकरण ३१ -FACILITIES TO PRISONERS मधील नियम १७ व २० अन्वये, न्या. बंदी रमेश गायचोर याने त्याचे पत्रातील वर नमूद कवितेचे पान क्र. १ व २ आक्षेपार्ह असल्याची लेखी समज संदर्भीय पत्रान्वये देण्यात आलेली आहे. वरीलप्रमाणे न्या. बंदी रमेश गायचोर जाने प्रसार माध्यमांव्दारे सदर कविता/मजकूर प्रकाशित केल्यास समाजामध्ये विशिष्ट परिणाम होवून शासनाची व कारागृह प्रशासनाची नाहक बदनामी प्रतिमा मलीन होण्याची शक्यता नाकराता येत नाही." असे कुर्लेकर यांनी या पत्रात म्हटले आहे.

रमेश गायचोर यांची बहिण प्रणाली परब यांनी ही कविता पार्थ एमएन यांना उपलब्ध करुन दिली. पण नागपूरच्या पोलिस आयुक्तांना या कवितेबाबत माहिती मिळालीच कशी असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ही कविता आपल्याकडे आहे, पण आपण ती सोशल मीडियावर देखील अजून प्रसिद्ध केलेली नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान ११ ऑगस्ट रोजी रमेश गायचोर यांनी कुर्लेकर यांच्याविरुद्ध मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहून कोर्टाच्या अवमानाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. कैद्यांनी लिहिलेल्या पत्राच्या मजुकरासंदर्भातल्या नियम २० मधील तरतुदींचा हा भंग असल्याने कारवाईची मागणी गायचोर यांनी केली आहे. तसेच हायकोर्टाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन होत असल्याने रद्द केलेल्या नियमांअंतर्गत कुर्लेकर यांनी गायचोर यांच्या कवितेला आक्षेप घेतला असल्याने त्यांच्यावर कोर्टाच्या अवमानाची कारवाई करावी, अशी मागणी गायचोर यांनी केली आहे.

या पत्रात ते लिहितात की,

"मी लिहलेली कविता ही वीरा साथीदार यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांना अभिवादन करण्यासाठी होती. वीरा साथीदार हे प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व होते. फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीत संपूर्ण आयुष्य झोकून दिलेले वीरा साथीदार शेवटच्या श्वासापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या लोकशाही आणि संविधान मूल्यांसाठी कार्यरत राहिले. ऑस्करसाठी निवडल्या गेलेल्या 'कोर्ट' चित्रपटातील प्रमुख भूमिका वीरा साथीदार यांनी भूषवली होती जी संपूर्ण देशभरात नावाजली गेली. वीरा साथीदार हे मला मार्गदर्शक गुरुसमान राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी खूप जास्त दुख देणारी राहिली, अस्वस्थ करणारी राहिली. या अस्वस्थतेचा निचरा म्हणून आणि वीरा यांचं कर्तुत्व, जीवन जनतेला समजावं म्हणून मी ही कविता लिहीली. इथे या तुरुंगात कविता हे माझ्या जगण्याचे माध्यम आहे. मात्र माझ्या आदरणीय असणाऱ्या वीरा साथीदार यांच्या वरील या कवितेला नक्षली शिक्का मारून तळोजा करागृह अधीक्षकांनी केलेली कार्यवाही ही प्रचंड मनस्ताप देणारी आहे."

कुर्लेकर यांनी केवळ गायचोर यांच्याच कवितेला नक्षली ठरवलेले आहे असे नाही तर भीमा-कोरेगाव प्रकरणातील इतर आरोपींच्या पत्रांवरही असाच आक्षेप घेतला असल्याचे समोर आले आहे. यातील १० आरोपींनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून त्यांच्या वैयक्तिक पत्रांवर सेन्सॉरशीप लादली जात असल्याची तक्रार केली आहे. डॉ. आनंद तेलतुंबडे यांचे दोन लेख, रमेश गायचोर यांनी लिहिलेली आदरांजलीची कविता आणि अरूण फरेरा यांचा फादर स्टॅन स्वामी यांच्यावरील स्मृतीलेख हे आक्षेपार्ह आहेत, तसेच भीमा कोरेगाव प्रकरणाच्या तपासाला बाधा ठरु शकणारे आणि नक्षली विचारसरणी पसरवणारे असल्याचे म्हणत कुर्लेकर यांनी त्यांना नोटीस बजावली आहे. एवढेच नाही तर आपल्या पत्रांवर राजकीय सेन्सॉरशीप लादली जात आहे आणि तसेच मित्र, कुटुंबीय, वकील यांना लिहिलेली आपली पत्र वाचली जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

यासंदर्भात पार्थ एम एन यांनी तुरुंग अधीक्षक कुर्लेकर यांना संपर्क साधला पण त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. या एकूणच प्रकरणामुळे भीमा-कोरेगावमधील आरोपींच्या मानवी हक्कांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

रमेश गायचोर यांच्या कवितेचा उरलेला भाग खाली दिला आहे.

महागडी दारू पिणारा फकीर

विमानानं फिरणारा फकीर

बड्या - बड्या हस्तीसोबत बड्या बड्या बाता करत

उठबस करणारा फकीर

प्रमुख पाहुणे अध्यक्ष म्हणूनच्या आमंत्रणासाठीची

भाड्याच्या खोलीच्या मोडक्या दारासमोरची रांग पाहून

मोडक्या दारासह स्वत:ही हुरळून गेलेला फकीर

एक पाय ग्लॅमरच्या तळ्यात

अन् एक पाय जनआंदोलनाच्या मळ्यात

या द्वंद्वाचं वादळ घेऊन

जगण्याची कसरत करणारा जिवंत फकीर

आटपाट नगरातल्या

आंतरविरोधांनी भरलेल्या या अनागोंदी जिंदगीत

जन्मापासून मरणापर्यंतच्या

इतक्या बहुरंगी प्रवासात

अगदी शेवटच्या क्षणापर्यंत

फकीरच राहणारा फकीर

रोटी-आरोग्य-मकानची विवंचना

त्याची कधी पाठ सोडत नाही.

मानधनाची रक्कम त्याच्या जिल्हास्तरीय बँकेत

कधी जमा होत नाही

त्याच्या तुटलेल्या चपलेचा बंध

शेवटपर्यंत तुटलेलाच राहतो

असा परमनंट आश्वस्त टाका

त्याच्या तुटक्या चपलेला कधी लागतच नाही

आणि

सेटल झालेल्या उच्च जात वर्गीय भवतालात

त्याची दलित शोकांतिका कधीच

सेटल होत नाही

हे असे फकीर हवे असतात सगळ्यांनाच

आदर्श घेण्यासाठी नव्हे

आदर्श देण्यासाठी, दाखवण्यासाठी, मिरवण्यासाठी

समतेचा रथ पूढी पूढी ढकलण्यासाठी

भाषणाला ऐकणाऱ्यांची, लिखाण वाचणाऱ्यांची

अन्यायग्रस्त याचकांची

आयती भाऊ गर्दी जमा करण्यासाठी

महान इतिहासाला वर्तमानात ढाळण्यासाठी

पुस्तकातलं, विचारातलं, स्वप्नातलं, चर्चेतलं

प्रत्यक्षात मैदानात उभारण्यासाठी

जसा भगतसिंग जन्माला यावा दुसऱ्याच्या घरात

तसा फकीर नसावा माझ्यात

तो असावा इतर कुणाच्यात....

फकीराच्या आत घुसमटणारी खंत

फकीराची उत्कट इच्छा

फकीराच्या मनात खदखदणारं दुःख

संघर्ष, संघटनेच्या गदारोळातून

कधीतरी त्याच्या वाटेला आलेलं

ओंजळभर व्यक्तीगत सुख

याचा घेतलाय का आढावा कधी कुणी ?

त्याच्या अस्वस्थ गाभाऱ्यात शिरून

या प्रश्नावर नजरा चोरून

माना खाली जातात मान्यवरांच्या

आटपाट नगरातली चळवळ

चळवळीतल्या फकीराची ही कैफियत !

ज्यावर तो जीवंत असताना कुणी 'ब्र' काढत नाही

फकीराच्या दुःख वेदनेला आपलं समजून

कुणी कवेत घेत नाही

ही कैफियत अशीच राहते सालोसाल

एक फकीर मेल्यावर

दुसऱ्या फकीराकडेच ती हस्तांतरित होते

ती नव्या फकीराची नवी कैफियत बनून जाते

आम्ही मात्र,

गिरवत राहतो ते शब्द पिढ्या न पिढ्या

'उन फकीरों ने

इतिहास रचा है यहाँ

जिन पे लिखने को

इतिहास को वक्त न था..."

-रमेश गायचोर

तळोजा मध्यवर्ती कारागृह

सदर रिपोर्ट न्यूजक्लिक या वेबपोर्टलवर ९ सप्टेंबर रोजी प्रकाशित झाला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे.

https://www.newsclick.in/They-Don’t-Want-us-to-Sing-our-Songs-Read-our-Poems?amp=&__twitter_impression=true

Updated : 11 Sept 2021 1:02 PM IST
Next Story
Share it
Top