Home > Election 2020 > 'या' तीन दिग्गज नेत्यांची राजकीय कारकिर्द आज होणार मतदान यंत्रात बंद

'या' तीन दिग्गज नेत्यांची राजकीय कारकिर्द आज होणार मतदान यंत्रात बंद

या तीन दिग्गज नेत्यांची राजकीय कारकिर्द आज होणार मतदान यंत्रात बंद
X

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यातील जालना, बारामती, अहमदनगर, रत्नागिरी- सिंधुदुर्ग यासह १४ मतदारसंघात आज अर्थात 23 एप्रिलला मतदान होत आहे. यामध्ये तब्बल २४९ उमेदवार आपले राजकीय भाग्य आजमावणार असून उत्तर महाराष्ट्रातील तीन नेत्यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जळगाव, रावेर तसंच अहमदनगर मध्ये आज मतदान होतंय. लोकसभेच्या या तिनही जागा राखण्यास भाजप बरोबरच एकनाथ खडसे तसंच गिरीश महाजन, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील या तीन दिग्गज नेत्यांचं राजकीय भविष्य देखील पणाला लागले आहे.

उत्तर महाराष्ट्रातील आठ जागांची जबादारी घेणारे गिरीश महाजन यांचा कस लागणार आहे. तर एकेकाळी उत्तर महाराष्ट्रावर पकड असलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे रावेर मधून उमेदवार असल्याने खडसेंनी पूर्ण लक्ष रावेर मध्येच केंद्रीत केलं आहे.. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी भाजपचा झेंडा हातात घेत थेट शरद पवारांनाच आवाहन देत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.

भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या जळगावधून भाजपने ए टी नाना पाटील यांचं तिकीट कापल्यानंतर स्मिता वाघ यांचंही तिकीट कापून आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिलीय तर राष्ट्रवादीनं माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना उमेदवारी देत भाजप समोर तगडं आव्हान निर्माण केलं आहे. रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसे विरुद्ध काँग्रेसचे माजी खासदार डॉ उल्हास पाटील, तर अहमदनगर मधून भाजपचे सुजय विखे पाटील विरुद्ध राष्ट्रवादीनं संग्राम पाटील उभे आहेत. या तिनही मतदार संघात भाजप समोर तगडं आव्हाण आहे. बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार दिले असले तरी खरी लढत भाजप आणि काँग्रेस आघाडी अशीच होत आहे.

त्यामुळे एकनाथ खडसे, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील या तिघांचीही मतदार संघात पक्षाबरोबरच ही निवडणूक वैयक्तिक प्रतिष्ठा तसंच पुढील राजकीय कारकीर्दीला दिशा देणारी ठरवणारी आहे.

जळगाव जिल्ह्याचा नेता एकनाथ खडसे, की गिरीश महाजन हे या निवडणूकीतून स्पष्ट होणार आहे. सुजय विखे पाटील यांचा जय पराजयावरुन विखे आणि पवार परिवारातील श्रेष्ठता ठरणार आहे.

एकंदरीत उत्तर महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील उद्या होणारी निवडणूक या दिग्गज नेत्यांचं पुढील राजकीय कारकिर्द ठरवणारी आहे.

Updated : 22 April 2019 9:57 PM IST
Next Story
Share it
Top