ट्रिपल तलाकपेक्षाही शिक्षण महत्त्वाचं
Max Maharashtra | 17 April 2019 6:52 PM IST
X
X
मुस्लिम समाजामध्ये अजूनही शिक्षणाचं प्रमाण कमीच आहे. त्यामुळं समस्यांच्या दृष्टचक्रात हा समाज अडकलाय. अशा परिस्थितीत मुस्लिमांचे इतर प्रश्न सोडवण्याचे शिक्षणाचे प्रश्न सोडवले तरी बऱ्याच समस्या आपोआपच सुटतील, असा आशावाद मुस्लिम समाजात शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या शिक्षिकांनी केलाय.
मॅक्स महाराष्ट्रच्या प्रतिनिधी प्रियदर्शिनी हिंगे यांनी उस्मानाबादच्या मुस्लिम महिला शिक्षकांशी ‘जनतेचा जाहीरनामा’ या कार्यक्रमात चर्चा केलीय.
उस्मानाबाद सारख्या शहरात उर्दू माध्यमाची शाळा इयत्ता १० पर्यंतच आहे. त्यामुळं १० वी नंतर मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांचं गळतीचं प्रमाण जास्त आहे. त्यातही मुलींची संख्या अधिकच आहे. कारण पुढील शिक्षणासाठी पालक परिस्थिती आणि मानसिकतेमुळं मुलींना शहरापासून दूर शिक्षणासाठी पाठवत नाहीत. त्यामुळं लहान वयातच मुलींची लग्न लावून दिली जातात. अशा अल्पवयीन लग्नांमुळं मुस्लिम समाजात दारिद्रय झपाट्यानं वाढतंय, असं निरीक्षण या शिक्षिकांनी नोंदवलंय. याशिवाय उस्मानाबादच्या उर्दू शाळांमध्ये पात्र शिक्षकही मिळत नाहीत. एकूणच उर्दू माध्यमांच्या शाळांसमोरही अनेक अडचणी आहेत.
मुस्लिम समाजातील पालकांमध्येही शिक्षणाचा मोठ्याप्रमाणावर अभाव असल्यानं त्याचा परिणाम पाल्यांच्या पुढील वाटचालीवर होतो. त्यामुळं पालकांमध्येच शिक्षणाविषयी जागृती कऱण्याची गरज असल्याचं मत या शिक्षिकांनी व्यक्त केलंय. मुस्लिम समाजाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही, त्यामुळं आरक्षण िदलं पाहिजे, असं मतही या शिक्षिकांनी व्यक्त केलंय. हे आरक्षण धर्मावर आधारित नसलं तरी चालेल पण किमान आर्थिक निकषांवर तरी एका पिढीला आरक्षण द्या, अशी मागणी या शिक्षिकांनी केलीय.
ट्रिपल तलाक सारखे विषय आमच्यासाठी आजघडीला तेवढे महत्त्वाचे नाहीत. त्यापेक्षा आमच्या मुला-मुलींना शिक्षणाच्या चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, अशी माफक अपेक्षा या शिक्षिकांनी व्यक्त केलीय.
Updated : 17 April 2019 6:52 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire