Home > मॅक्स रिपोर्ट > Ground Report : गुलाब चक्रीवादळ आणि अतिवृष्टीने भातशेतीचे प्रचंड नुकसान

Ground Report : गुलाब चक्रीवादळ आणि अतिवृष्टीने भातशेतीचे प्रचंड नुकसान

Ground Report : गुलाब चक्रीवादळ आणि अतिवृष्टीने भातशेतीचे प्रचंड  नुकसान
X

निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना पुन्हा फटका बसला आहे. गुलाब चक्रीवादळाचा कोकणातील शेतकऱ्यांना फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या तोंडातून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कोकणात या पावसामुळे भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुधागड मधील शेतकऱ्यांच्या भातपिकांची नासाडी झाली असून प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कोकणात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे, याचाही मायबाप सरकारने विचार करावा अशी विनंती करण्यात आली आहे. पालीतील शेतकरी बाळा काटकर सांगतात की, सतत येणाऱ्या वादळाने आमच्या जीवनात वादळे निर्माण होतात, अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास गळून पडला आहे, शेतकरी जगला तर देश जगेल, यापूर्वी आपण अभिमानाने जय जवान जय किसन बोलायचो, पण आता शेतकरी या आपत्तीने जमिनीत गाडला जातोय, अशी परिस्थिती आहे. मायबाप सरकारने शेतकऱ्याला जगविण्यासाठी आर्थिक पाठबळ देणे गरजेचे आहे, सरकारने वस्तुस्थिती प्रमाणे पंचनामे करून नुकसानीची भरपाई देणे अपेक्षित आहे."



यावेळी रायगड जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हरीचंद्र शिंदे म्हणाले की, "वादळ व अतिवृष्टीने शेतकरी पूर्णपणे देशोधडीला लागत आहे. कोकणातील या आपत्तीला सामोरे जाताना शेतकरी मेटाकुटीला येतो आहे. गुडघाभर पाण्यात चिखलात पीक गेल्याने ते उचलणे कठीण आहे. शेतकऱ्याला सावरण्यासाठी सरकारने योग्य ती धोरणे राबविणे अपेक्षित आहे, भिजलेला भात आधारभूत केंद्रावर विकला जात नाही, भाव मिळत नाही, शिवाय शेतकऱ्याला विकलेल्या भाताचा मोबदला देखील वेळेत मिळत नाही, सरकारी नोकरांचे पगार वाढले, सोने व इतर सर्व वस्तूंचे भाव वाढले मात्र, शेतमालाला भाव नाही, ही चिंतेची बाब आहे, शेतकऱ्याला जगविण्यासाठी शासनाने औद्योगिक तत्वावर कृषी धोरणे व उपाय योजना करणे गरजेचे आहे,".


आदिवासी नेते रमेश पवार यांनी देखील शेतकऱ्यांची व्यथा मांडली, "सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भागात मोठया प्रमाणावर अतिवृष्टी होते, आदिवासी बांधव माळरान पठारावर, नाचणी, वरई, बाजरीचे पीक घेतात. पण सततच्या पावसाने पिके उध्वस्त होतात, सरकारने शेतकऱ्याला सावरण्यासाठी आवश्यक प्रयत्न व मदत केली पाहिजे." महेश पोंगडे म्हणाले की "नैसर्गिक आपत्तीमुळे कोकणातील शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. सरकारची धोरणे कृषिप्रधान व शेतकऱ्याला पूरक नाहीत, शेतकरी दुर्लक्षित राहत आहे, हे देशासाठी मोठी चिंतेची बाब आहे. सरकारने शेतकऱ्याला पाठबळ देण्यासाठी कसोशीने प्रयत्न व उपाय केले पाहिजेत" असे पोंगडे म्हणाले.


निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते वादळ, फयान वादळ, अतिवृष्टीने शेतकरी उध्वस्त झाला आहे. सलग दोन वर्षांपासून शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवले आहे, भात पीक, घर, शेती, बागा यांचे प्रचंड नुकसान झाले, या संकटातून सावरत नाही तोच अवकाळी व अतिवृष्टीच्या पावसाने भातशेतीचा पुन्हा घात केला. आठवडाभर झालेल्या पावसाने पीक मातीमोल झाले आहे. पेरणी व कापणीचा खर्चही निघणार नाही अशी अत्यंत बिकट अवस्था शेतकरी वर्गाची झाली आहे. या संकटाच्या काळात बळीराजाला सरकारकडून मदत मिळावी अशी मागणी जोर धरत आहे.



Updated : 30 Sept 2021 8:00 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top