कोकणातील हापूस हंगाम तौक्ते वादळाने संपुष्टात
X
कोकण म्हटलं की कोकणाचा हिरवागार परिसर, काजू, हापूस आंबा, फणस आपल्या डोळ्यासमोर उभं राहिल्याशिवाय राहत नाही. मात्र, गेल्या वर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळानं आणि आत्ता आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे.
अगोदरच कोरोनाच्या महामारीने अडचणीत सापडलेल्या शेतकरी या तौक्ते वादळाने तोंडी आलेला घास गमावून बसला आहे.
एप्रिल, मे हे महिने कोकणातील आंबा बागायतदारांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. मात्र, नुकत्याच आलेल्या तोक्ते चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील आंबा बागायत दारांच्या तोंडातील घास हिरावून घेतला आहे.
निसर्ग चक्रीवादळातून सावरत असलेल्या बागायतदारांना वादळाचा मोठा फटका बसला आहे. आंबा बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऐन काढणीला आलेला आंबा जमीनदोस्त झाला आहे. बागांमध्ये अक्षरश: आंब्यांचा सडा पडला आहे. तर काही ठिकाणी पावसाने आंबा पीक खराब झाले आहे. पावसात आंबा भिजल्याने आंबा विक्री वर थेट परिणाम झाला आहे.
परिणामी बागायतदरांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.
प्राथमिक पाहणीनंतर तब्बल 1550 हेक्टरवरील आंब्याच्या नुकसानीची शक्यता झाली असल्याची माहिती जिल्हा कृषी कार्यालयाने दिली आहे.
मागीलवर्षी निसर्ग चक्रीवादळामुळे आंब्याची झाडे उन्मळून पडली. त्यानंतर खराब हवामान, परतीच्या व अवकाळी पावासामुळे शिल्लक असलेल्या झाडांना जेमतेम 50 टक्के फळधारणा झाली. आणि आता तोक्ते वादळाने हे उत्पादन देखील हिरावून नेले असल्याने जिल्ह्यातील बागायतदार पुरते हतबल झाले आहेत.
तौक्ते वादळाने कोकणातला शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कोंकणची वादळाने वाताहात झाली आहे. आंबा, नारळ, सुपारी, काजुच्या उजाड बागा अशी कोंकणाची अवस्था आहे. यावर्षी कडक उन्हाळा असल्याने 42 अंश सेल्सिअस तापमानात मोहर गळून पडला होता.
आंब्याचे पीक कमी होते. मात्र, बाजारात भाव मिळत होता. कोरोनाच्या काळात शेतीक्षेत्राला सूट दिल्याने उत्पादन विक्रीचा मार्ग देखील मोकळा होता. पण निसर्गाने सारेच हिरावून घेतले.
आर्थिक परिस्थिती बरोबर झुंजणाऱ्या कोंकणच्या शेतकऱ्यांचे गतवर्षी व नुकत्याच येऊन गेलेल्या तौत्के वादळाने पुरती वाताहात लावली असून कोंकणातला शेतकरी अधिक आर्थिक संकटात सापडला आहे.
भरपूर पर्जन्यवृष्टी असुनही पाण्यासाठी वणवण करणारी जनता सिंचनाच्या पाण्याची वर्षो न वर्षे वाट पाहणारा कोकणातला शेतकरी या अडचणीतून वाट काढत आंबा, नारळ, काजू, सुपारी इत्यादी फळझाडांच्या बागा प्रचंड कष्टाने फुलवायच्या, पावसाच्या पाण्यावर एकमेव भाताचे पीक इथला शेतकरी घेतो. भातपिकानंतर आंबा, काजू फळ पीक व पाणी असेल तर कोकणात भाजीपाला पीके घेतली जातात. फक्त शेती व्यवसायावर कोंकणातला शेतकरी अवलंबून असता तर विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या करण्याची वेळ कोकणातल्या शेतकऱ्यावर आली असती.
कोकणातील शेतकरी राबराब राबणारा कष्टकरी आहे. बेरोजगारीचं प्रमाण मोठं आहे. कुटुंबातील तरूण शिक्षीत असून देखील आई वडीलां बरोबर शेतात राबतो. पण गेली दोन वर्ष कोकणातला शेतकरी दुहेरी कात्रीत सापडला आहे.
गेली काही वर्ष भातशेती नुकसानीत आहे. खर्चही सुटत नाहीत. त्यातच गतवर्षी आंबा पीक चांगले आले होते. चार पैसे गाठीला पडतील अशी स्वप्ने पाहणाऱ्या कोकणातल्या शेतकऱ्यांची स्वप्ने निसर्ग वादळाने धुळीला मिळवली.
निसर्ग वादळ अनुभवलेल्या शेतकऱ्यांच्या उरात पुन्हा वादळ येत असल्याने धडकी भरली आहे. कारण उरल्या सुरल्या बागा नष्ट होणार नाहीत ना? या चिंतेने त्याला घेरले आहे. आंबा, काजू पिकांचे नुकसान होईल अखेर तसेच घडले. तौक्ते वादळाने कोकणातील बागांचे नुकसान केले. यावर्षी आंबा पिकाला भाव चांगला होता. पण वादळात पिकांच्या, घरांचे, गुरांच्या गोठ्यांचे मोठे नुकसान झाले. कोरोनाचे संकट, त्यातच वादळा मागून दुसरे वादळ यामुळे कोकणातली शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बागायत दारांना पुन्हा उभे राहण्यासाठी अर्थसहाय्याची गरज आहे.
राज्य व केंद्र सरकारने कोंकणातील शेतकऱ्यांला आर्थिक संकटातून बाहेर काढावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. अलिबाग तालुक्यातील बागायतदार संदेश पाटील मॅक्स महाराष्ट्र शी बोलताना म्हणाले मी 20 वर्षा पासून आंबा बागायतीत काम करतोय, गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळ आलं आणि त्या वादळात आमची 161 झाड तुटून पडली. तसेच त्यावर व इतर झाडांवर असलेली फळे देखील तुटून पडली. यावर्षी देखील मे च्या मध्यावर्ती तौक्ते वादळ आलं आणि पुन्हा मोठा फटका देऊन गेले.
सध्या आंब्याचा मोसम सुरू झाला होता, यावर्षी झाडावर ऐन काढणीत आलेला आंबा गळून पडला, काही झाड उन्मळून पडलेत, काही झाडांच्या फांद्या मोडल्यात, सध्या साधारणतः दोन ते तीन हजार बॉक्स म्हणजे चार ते सहा हजार डझन आंबा पडून मोठं नुकसान झालंय.
कोरोना काळात हातातोंडाशी आलेला घास गळून पडला, निसर्गाने दिलं आणि निसर्गानेच हिरावलं अस म्हणण्याची वेळ आली.
अलिबाग येथील जांभूळ पाडा गावातील प्रकाश पाटील या शेतकऱ्यांने देखील मॅक्स महाराष्ट्र शी बोलताना आपली व्यथा मांडली, ते म्हणाले की गेल्या वर्षी देखील निसर्ग चक्रीवादळाने माझे खूप नुकसान झाले होते, 40 झाड मोडली, काही बुडातून गेली. काही फांद्या तुटल्या, यावर्षी देखील वादळ आले आणि बागेत सर्वत्र आंब्याचा सडा पडला. झाडेही तुटून पडली.
जास्त फळे देणारी झाडे तुटली याचं मोठं दुःख झालंय. शेतकऱ्यांच दुःख जाणून सरकारने मदत करावी ही अपेक्षा आहे.
सलग 2 हंगाम नुकसान...
रायगड जिल्ह्यात साधारणतः 14 ते 15 हजार हेक्टर आंब्याचे क्षेत्र आहे. हेक्टरी एक ते दीड टन आंब्याचे उत्पादन येते. योग्य मशागत, खबरदारी व काळजी घेतल्यास आणि हवामानाने चांगली साथ दिल्यास आंबा बागायतदारांच्या हाती चांगले उत्पादन लागते.
साधारण 15 मे पासून अगदी जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील आंब्याची काढणी केली जाते. हा आंबा स्थानिक बाजारपेठेत विकून व त्याची निर्यात करून त्यांना चांगला पैसा देखील मिळतो. मात्र, मागील वर्षी लॉकडाऊनमूळे आंब्याची विक्री फारशी झाली नाही. व निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला. त्यानंतर यंदा तोक्ते वादळाने नुकसान केले. अशा प्रकारे सलग 2 हंगाम नुकसानीचा फटका या आंबा बागायतदारांना बसला आहे.
या संदर्भात आंबा बागायतदार शेतकरी विनायक शेडगे सांगतात...
वादळ म्हटलं की थरकाप उडतो, निसर्गाच्या आठवणी जाग्या होतात. मोठ्या कष्टाने वाढवलेली, जपलेली झाडे डोळ्यादेखत तुटून पडतात, जीव व्याकुळ होतो.
यंदा अवघे पन्नास टक्के उत्पादन आले. त्यात काढणीला आलेल्या आंबा वादळामुळे पूर्णपणे पीक वाया गेले. साधारण 3 लाखांचे नुकसान झाले आहे. शासनाने लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.
अशी मागणी शेतकरी विनायक शेंडगे करतात.
शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत आम्ही अलिबाग विभागाचे कृषी उपसंचालक दत्तात्रय काळभोर यांच्याशी बातचीत केली... ते म्हणाले
नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. अद्याप अंतीम अहवाल प्राप्त नाही. परंतु प्राथमिक नजर अंदाजानुसार 1550 हेक्टर इतके क्षेत्र बाधित झाल्याचे दिसून येते. पंचनाम्यानंतर यामध्ये कदाचीत वाढ किंवा घट होऊ शकते.