कोरोनामुळं शेतकरी पुन्हा एकदा खाजगी सावकरांच्या विळख्यात…
कोरोनामुळं शेतकरी खाजगी सावकारांच्या विळख्यात, कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी शेतकऱ्यांवर आली सावकरांच्या दारात जाण्याची वेळ, शेतकरी उपचारासाठी लाख लाख रुपये कुठून आणणार? शेतीतून मिळालेल्या उत्पादनात कसा होणार कोरोना रुग्णांचा खर्च पाहा मॅक्समहाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट
X
कोरोना च्या महामारीत जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. एक तर लॉकडाऊनमुळं शेतकऱ्यांचा भाजीपाल्यासारखा माल शेतात सडत आहे. त्यात पहिल्या पावसामुळं झालेली नुकसान भरपाई मिळालेली नसतानाच दुसऱ्या झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत घरात कोणी कोरोनाने आजारी पडलं तर? सरकारी दवाखाने कोरोना रुग्णांनी भरुन गेले आहेत. खाजगी दवाखान्यात जायचं म्हटलं तर लाख लाख रुपये आणायचे कुठून?
शेतकरी कुटुंबातील एक सदस्य जरी कोरोना बाधित झाला तर कोरोना चा उपचार न परवडणारा आहे. त्यात जर खाजगी रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली तर शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते, उपचारासाठी खाजगी सावकाराकडून व्याजाने नाहीतर हात उसनवारी पैसे घेण्याची वेळ शेतकरी कुटुंबावर आली आहे. त्यामुळे अगोदरच कर्जाच्या खाईत असलेला शेतकरी पुन्हा नव्या कर्जाच्या विळख्यात अडकला आहे. मॅक्समहाराष्ट्रच्या टीम ने ग्रामीण भागातील एका कोरोना बाधीत शेतकरी कुटुंबाची परिस्थिती जाणून घेतली यातून धक्कादायक माहिती समोर आली.
कोरोना मुळे खाजगी सावकारी कर्ज घेण्याची वेळ-
जळगाव जिल्ह्यातील भादली शिवारात पाच एकर शेती कसणाऱ्या असोदा येथील केतन रामचंद्र भोळे या शेतकऱ्याच्या कुटुंबाला आम्ही भेट दिली. अत्यंत साधारण घर असणाऱ्या केतन यांची आई इंदूबाई भोळे ह्या खाटेवर च झोपून होत्या. त्या नुकत्याच कोरोनातून बऱ्या झाल्या होत्या. मात्र, प्रचंड अशक्त झाल्या होत्या. ज्या वेळी त्या कोरोना बाधीत झाल्या त्यावेळी सुरवातीला त्यांना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या. मात्र कोरोना आजारावर सुधारणा न झाल्यानं खाजगी दवाखान्यात हलवण्याची त्यांच्यावर वेळ आली.
मात्र, कुटूंब शेतकरी असल्यानं त्यात कोणताही विमा नाही, की बँक बॅलन्स नाही. मग कसा होणार उपचार? अशा विवंचनेत भोळे परिवार होता. अगोदरच पीक कर्जाचे चार लाखांचं थकलेले कर्ज, बँकेचं व्याजावर व्याज अश्या विचारात असतानाच घराचा आणि शेतीचा कणा असलेल्या इंदूबाईला कोरोनातून मुक्त करण्यासाठी खाजगी दवाखान्यात दाखल करण्याचा भोळे परिवाराने ठरवलं. पण पैसे कोठून आणणार? अशा विवंचनेत असतांना खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेण्याशिवाय पर्याय नव्हता. शेवटी सावकाराकडून व्याजाचे पैसे घेतले.
आई तू चिंता नको, कर्ज काढेल पण तुला बरं करेल -
रोज नित्य नियमाने सकाळी सकाळीच शेतात जाऊन काम करणाऱ्या इंदूबाईंना कोरोनाचं नाव काढलं तरी अंगावर काटा येतो. सध्या कोरोनातून त्या बऱ्या झाल्या आहेत. पण कशा परिस्थितीत त्या बऱ्या झाल्या आहेत. हे सांगताना त्यांना आपल्या भावना आवाराता आल्या नाहीत.
सरकारी रुग्णालयात दाखल केल्यावर आजार बरा होत नव्हता. खाजगी दवाखान्यात जास्तीचे पैसे लागणार होते आपण कसं करायचं? हा विचार सतावत होता. पण मुलाने सांगितलं की, आई तू चिंता नको करू. इकडून तिकडून पैसे आणेल. पण तुला बरं करेल. असं सांगत मुलाने धीर दिला. कोरोनातून बरं झाल्या आहेत, मात्र, आता जरा अशक्तपणा वाटत असल्यामुळं शेतात काम करता येत नसल्याचं इंदूबाईना जास्त दु:ख आहे.
बँकांचे पीक कर्ज, आता सावकाराचे कर्ज कसं फेडायचे?
कोरोनातून बऱ्या झालेल्या इंदूबाईंचा मुलगा तरुण शेतकरी केतन भोळे सांगतात की… 'आम्ही सर्वसाधारण शेतकरी लोक आहोत. आधीचेच शेतीसाठी घेतलेले कर्ज भरले जात नव्हतं. त्यात कोरोनाचा काळ कसा तरी काढला आणि आईला कोरोना झाला. सरकारी रुग्णालयात आईचा आजार बरा होत नव्हता म्हणून खाजगी रुग्णालयात दाखल केलेले 75 ते 80 हजार रुपये खर्च येणार होता. यासाठी सावकाराकडून तसेच ओळखीच्या लोकांकडून व्याजाने पैसे उचलले.
अगोदरच कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शेतीचा माल व्यापाऱ्यांनी कमी भावाने द्यावा लागला. त्यातच पीक कर्जासाठी चार लाखांचं कर्ज घेतले आहे. त्याच व्याज वाढत पाच लाखांवर गेलं आहे. कर्ज कसं फेडणार हा मोठा प्रश्न समोर आहे. घर भागणार कसं? तसेच मुलांच्या शिक्षणाची फी ला 1000 रुपयेही भरायला नाहीत. सरकार काहीच करत नाही. पुढे कसं होईल? हा विचार मनात येतो. काही दिवसात खरीप हंगाम येतोय पेरणी कशी करायची? पेरणीलाच पैसे नाहीत तर शेती कशी करणार? अगोदरच पीक कर्ज भरा. मगच नव्या हंगामाला कर्ज भेटेल असं बँका सांगतात. आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं असा सवाल ते उपस्थित करतात. ही जी परिस्थिती भोळे या शेतकरी परिवाराची आहे तशीच परिस्थिती राज्यातील हजारो शेतकऱ्यांची आहे.
शेतकरी कोरोनां नंतर सावकाराच्या विळख्यात -
राज्यातील ग्रामीण भागातील गावागावात मोठया प्रमाणात कोरोना चा फैलाव झाला आहे. अनेक शेतकरी कुटुंबातील सदस्यांना कोरोना लागण झाली आहे. घराचा आधारस्तंभ असलेले हजारो शेतकरी कोरोना मूळ मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळं अनेक शेतकरी कुटूंब उघड्यावर आलं आहे. त्यातच घरात एका व्यक्तीला कोरोना झाला तर इतर व्यक्तीला देखील होतो. या कुटुंबाला कोरोनापासून वाचवण्यासाठी लाखोंचा खर्च करावा लागत आहे.
बहुतांश शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. यामुळं त्यांना खाजगी सावकाराकडून चढ्या व्याज दराने नाईलाजस्तव कर्ज काढावे लागत असल्याने शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकत चालला आहे.
शेतकऱ्यांच्या कुटुंबाची कुटूंब आर्थिक अडचणीत सापडली आहे. लॉकडाऊन मुळे गेल्या दोन वर्षाच्या हंगामात पाहिजे तसं उत्पादन झालेलं नाही. त्यातच गेल्या हंगामात बोगस बियाणे , नैसर्गिक आपत्तीत एकदा नव्हे तर दोन ते तीन वेळा शेतकऱ्यांना सामना करावा लागला आहे. त्यातच वाया गेलेले पिकांचे पंचनामे तर झाले मात्र सरकार कडून भरपाई मिळाली नाही. अशी परिस्थिती राज्यातील शेतकऱ्यांची आहे. हातात पैसा नाही अगोदरच पीक कर्जासाठी सरकारी तसंच खाजगी बँकांकडून कर्ज डोक्यावर आणखीन कोरोना महामारीच भूत मानगुटीवर आहे.
शेतकरी समन्वय समितीची भूमिका काय -
शेतकरी संघर्ष समन्वय समितीचे एस बी नाना सांगतात की , गेल्या वर्षभरातील काळात शेतकऱ्यांनी प्रत्येक पिकासाठी जीवापाड मेहनत केली. काही तरी मिळेल या आशेवर गेल्यावर्षी फक्त ३०%पीक कर्ज वाटणाऱ्या बँकांच्या मानसिकतेमुळे त्यांना खाजगी सावकाराकडून कर्ज उचलून शेती करावी लागली. त्यानंतर कोणत्याही पिकाला भाव मिळाला नाही. त्यात भर म्हणून कुठे दुष्काळ तर कुठे अतिवृष्टी अजून विमा कंपन्यांनी पैसे दिले नाहीत किंवा काही अपवाद वगळता सरकारी मदत देखील मिळाली नाही. त्यात संपूर्ण शेती तोट्यात गेली.
सगळ्यात दुर्दैव म्हणजे शेतात राहणाऱ्या आमच्या शेतकऱ्यांचं सगळं कोरोनाच्या विलख्यात अडकलं. त्यामुळे जास्तीत जास्त कुटूंब कोरोना बाधित झाले आहेत. काहींना सरकारी दवाखान्यात जागा मिळाल्या. मात्र, जास्तीत जास्त लोक भरडले गेले ते खाजगी दवाखान्यात... एकेका घरात तीन चार रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी पुन्हा सावकारांच्या दाराशी जावून शेतकऱ्यांना कर्ज घ्यावं लागले. दिवाळीला हंगाम आल्यावर परत करण्याच्या बोलीवर शेतकऱ्यांनी कर्ज घेतली आहेत.
पुढे बोलताना नाना पाटील म्हणतात... देशातील व राज्यातील सरकारने व शीर्ष संस्था रिझर्व बँक ने इतरांसाठी योजना जाहीर केल्या शेतकऱ्यांना काय दिलं? आमची विनंती आहे की? सरकारांनी मागील सारे कर्ज माफ करून किंवा त्यासाठी वेळ लागणार असेल तर ते स्थगित करून साऱ्या शेतकऱ्यांना विनाविलंब पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी पाऊले उचलली पाहिजेत. मागील हंगामातील उर्वरित शेतमाल किमान आधारभूत किंमत ने खरेदी करून, पुढील शेतमाल खरेदी ची योजना आताच जाहीर केल्यास खूप मोठा मानसिक आधार त्यांना मिळेल.