Home > मॅक्स रिपोर्ट > आंबेडकरांनी सुरु केलेलं सोलापुरातील बॅकवर्ड क्लास हॉस्टेल आजही अविरतपणे सुरू

आंबेडकरांनी सुरु केलेलं सोलापुरातील बॅकवर्ड क्लास हॉस्टेल आजही अविरतपणे सुरू

आंबेडकरांनी सुरु केलेलं सोलापुरातील बॅकवर्ड क्लास हॉस्टेल आजही अविरतपणे सुरू
X

अस्पृश्य, मागासवर्गीय मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली 1932 साली सोलापुरात बॅकवर्ड क्लास नावाने मुलांचे हॉस्टेल तत्कालीन नगराध्यक्ष डॉ.विनायकराव मुळे यांच्या मदतीने सुरू केले होते. तर मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी 1936 साली बॅकवर्ड क्लास गर्ल्स हॉस्टेल सुरू केले होते. ही दोन्ही हॉस्टेल्स डिप्रेस्ड क्लास या संस्थेच्या माध्यमातून चालवली जात होती. आजही 90 वर्षाच्या कालावधीनंतरही दोन्ही हॉस्टेल्स अविरतपणे चालू आहेत. या कालावधीत हजारो विद्यार्थी शिकून या वसतिगृहातून बाहेर पडले आहेत. त्यांनी उच्च पदस्थ नोकऱ्या प्राप्त केल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे शिक्षण घेता आले. चांगले जीवन जगता आले म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजही माजी विद्यार्थी या हॉस्टेलला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेकरांचा सहवास लाभलेल्या हॉस्टेलच्या भूमीला नतमस्तक होतात. अशी माहिती आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक आणि संपादक किरण बनसोडे यांनी दिली.

देशातील पहिल्या वसतिगृहाची सोलापूरात सुरुवात

1 जानेवारी 1925 रोजी सोलापुर शहरातील सध्याचे मिलिंद नगर आणि तत्कालीन थोरला राजवाडा याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील पहिले वसतिगृह बहिष्कृत हितकारणी सभेच्या वतीने सुरू केले होते. देशातील पहिल्या वसतिगृहाचा पहिला मान सोलापूरला मिळाला होता. या वसतिगृहात तत्कालीन अस्पृश्य,मागासवर्गीय,उपेक्षित घटकातील विद्यार्थी शिक्षण घेत असत. त्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी या उदात्त हेतूने वसतिगृह सुरू केले होते. दरम्यानच्या काळात तत्कालीन नगराध्यक्ष रावबहादूर डॉ. विनायकराव मुळे यांची आणि विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर या दोघांमध्ये घनिष्ट मैत्री निर्माण झाली होती. थोरल्या राजवाड्यातील वसतिगृहाच्या माध्यमातून अस्पृश्य, मागासवर्गीय मुलांना प्रगतीचे द्वार खुले झाले होते.

1932 साली बॅकवर्ड क्लास मुलांच्या हॉस्टेलची सोलापुरात सुरुवात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. विनायकराव मुळे यांना प्रभावित करणारे ठरले होते. अस्पृश्य, मागासवर्गीय मुलांच्या शिक्षणाची सोय अधिक चांगल्या प्रकारे व्हावी,यासाठी डॉ. विनायकराव मुळे यांनी हरिभाई देवकरण प्रशालेच्या पाठीमागील बाजूस दीड एकर जागा घेतली होती. याच जागेत 1932 साली बॅकवर्ड क्लास नावाने मुलांचे हॉस्टेल सुरू करण्यात आले. हॉस्टेल डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशनल सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून चालवले जात होते. या ठिकाणी मुलांना राहण्यासाठी प्रशस्त इमारती उभारल्या गेल्या होत्या. स्वयंपाक गृह व इतर सोयीसुविधा चांगल्या प्रकारे विकसित करण्यात आल्या होत्या. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनायक मुळे होते. उपाध्यक्ष तत्कालीन नगरसेवक पापय्या बेलपवार होते.

या संस्थेवर जिवाप्पा ऐदाळे तज्ञ संचालक म्हणून कार्यरत होते. यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. विनायकराव मुळे आणि त्यांचे बंधू भालचंद्र उर्फ काकासाहेब मुळे यांनी मोठे सहकार्य केले होते. या बॅकवर्ड क्लास होस्टेलमध्ये शहर आणि जिल्ह्यातील अस्पृश्य,मागासवर्गीय, उपेक्षित,वंचित घटकातील मुले रहायला होती. या हॉस्टेलमध्ये राहून मुले सोलापूर शहरात असणाऱ्या शाळांमध्ये शिक्षण घेत असत. या मुलांना कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी नगराध्यक्ष डॉ. विनायकराव मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सोयीसुविधा पुरवल्या जात होत्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारप्रेरणेने हे वसतिगृह त्याकाळी नेटकेपणाने सुरू करण्यात आले होते. अनेक विद्यार्थ्यांना त्याठिकाणी शिक्षणाची गंगोत्री मिळाली आणि आजही 90 वर्षाच्या कालावधीनंतर त्याठिकाणी बॅकवर्ड क्लास हॉस्टेल अविरतपणे सुरु आहे.

हॉस्टेलमध्ये राहून विद्यार्थी झाले उच्च पदस्थ अधिकारी

अस्पृश्य,मागासवर्गीय मुले शिकावित त्यांचे जीवन प्रकाशमान व्हावे या उदात्त हेतूने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या या हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेतलेले विद्यार्थी उच्च पदस्थ अधिकारी झाले आहेत. त्यामध्ये काही वैमानिक झाले तर काहीजण उच्च पदस्थ पोलीस अधिकारी झाले. काहीजण तहसीलदार,मंडल अधिकारी,इंजिनिअर झाले आहेत. या हॉस्टेल मधील विद्यार्थ्यांनी अनेक मोक्याच्या जागा पटकवल्या आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रेरणेतून सुरू झालेले हे हॉस्टेल आज वटवृक्षाची भूमिका पार पाडत आहे. ही गौरवाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.


dr.ambedkar started backword class hostel still working

मागासवर्गीय मुलींच्या शिक्षणासाठी राहण्याची सोय व्हावी या हेतूने डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि नगराध्यक्ष डॉ.विनायकराव मुळे यांनी मागासवर्गीय मुलींचे हॉस्टेल सुरू केले होते. त्याला बॅकवर्ड क्लास गर्ल्स हॉस्टेल असे नाव देण्यात आले होते. वाडिया हॉस्पिटलच्या बाजूस असलेल्या जागेत 1936 साली मागासवर्गीय मुलींचे हॉस्टेल सुरू करण्यात आले होते. आजही गेल्या 86 वर्षांपासून हे हॉस्टेल अविरतपणे सुरू आहे. याठिकाणी मुली राहून शहरातील शाळेत शिक्षण घेत आहेत. येथे विविध प्रकारचे कोर्सेस शिकवले जात आहेत. काही मोफत आहेत तर काहींसाठी थोडेफार पैसे मोजावे लागत आहेत. येथे नर्सिंग कोर्स मोफत शिकवला जातो. त्याचबरोबर योगा,शिवणकाम हे कोर्स शिकवले जात आहेत. बालगृह आहे.येथे अनाथ मुलींना वयाच्या 18 वर्षापर्यंत राहण्याची आणि त्यांच्या शिक्षणाची मोफत सोय केली जात आहे. येथे मुली शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभारत आहेत.. ही प्रेरणादायी बाब आहे...

Updated : 13 April 2022 6:21 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top