Home > मॅक्स रिपोर्ट > बंधाऱ्यावरील भिंत वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचा गावाशी संपर्क तुटला, दोरीच्या सहाय्याने जेवणाची देवाण-घेवाण

बंधाऱ्यावरील भिंत वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचा गावाशी संपर्क तुटला, दोरीच्या सहाय्याने जेवणाची देवाण-घेवाण

बंधाऱ्यावरील भिंत वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचा गावाशी संपर्क तुटला, दोरीच्या सहाय्याने जेवणाची देवाण-घेवाण
X

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ओढे-नाले ओसंडून वाहिले असून शेतकऱ्यांच्या पिकांतील पाण्याचा आणखीन विसर्ग झालेला नाही. जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पाणी असून नदी काठच्या शेतीला या पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. मागील महिन्यात भोगावती नदीला पूर आल्याने देगाव, ता.मोहोळ, जि. सोलापूर येथील नदीवर असलेल्या बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्याने नदीपलिकडील शेतकऱ्यांचा गेल्या महिनाभरापासून गावाशी असलेला संपर्क तुटला असून दोरीच्या सहाय्याने शेतकऱ्यांना जेवण व जनावरांच्या दुधाची देवाण-घेवाण केली जात आहे.

नदीपलीकडे अडकले शेतकरी...

नदीला अचानक पूर आल्याने बंधाऱ्याचा भराव वाहून गेला व त्यामुळे सुमारे ५०० ते ७०० शेतकरी नदीपलिकडे अडकले असल्याचे शेतकरी समाधान आतकरे यांनी सांगितले. नदीपलिकडे जनावरे, बागा, ऊस, सोयाबीन, उडीद ही पिके असून शेतकऱ्यांनी ती पिके काढायची कशी? असा प्रश्न त्यांना पडला आहे. कुणालाच शेतात जाता येत नाही. या बंधाऱ्याच्या खाली डिकसळचा बंधारा असून तेथून शेतात जायचे म्हटले तर ओढ्याला पाणी असल्याने शेताकडे शेतकऱ्यांना जाता येत नाही.

त्यामुळे नदीपलिकडील शेतकऱ्यांना दोरीच्या सहाय्याने जेवण दिले जात असून गावात डेअरीला घातल्या जाणाऱ्या दुधाची केंडे दोरीच्या सहाय्याने घेतली जातात व परत दिली जातात. असा हा उपक्रम दिवसभर सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

गेल्या तीन वर्षांपासून वाहून जातोय बंधाऱ्याचा भराव; ठेकेदार निकृष्ठ दर्जाचे काम करीत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

शेतकरी समाधान आतकरे यांनी सांगितले की, देगाव येथील भोगावती नदीवर गावाच्या पूर्व दिशेला कोल्हापूर पध्दतीचा बंधारा असून आरसीसी बांधकाम केले आहे. या बांधकामाच्या पुढे मुरुमीकरण केले असून गेल्या ३ वर्षांपासून हा भराव वाहून जात आहे. ठेकेदाराने निकृष्ठ दर्जाचे काम केल्याने त्याचा फटका शेकऱ्यांना बसला आहे.बं धाऱ्याच्या पुढे केलेले मुरुमीकरण साधारण असल्याने ते काढून टाका व दुसरा चांगल्या प्रतीचा मुरूम भरा असे बंधाऱ्याच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते. परंतु त्यांनी काही ऐकले नाही. या पुरामुळे बंधाऱ्याचा भराव वाहून गेला असून यामध्ये पोपट बाबू तेली, दादाराव नाईक, विष्णू तेली या शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

भरावासाठी बंधाऱ्याच्या जवळची उचलली माती शेतकऱ्यांचा आरोप

ठेकेदाराने भराव भरण्याचे काम करीत असताना बंधाऱ्याच्या जवळची माती उचलली असून त्यामुळे आणखीन अडचणीत वाढ झाली व त्यामुळे बंधारा फुटला आहे. ठेकेदाराने वास्तविक मुरूम चांगल्या प्रतीचा व दुरून आणणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही असे शेतकऱ्यांनी सांगितले.

नदीपलिकडील पिकांची थांबली काढणी, मळणी

बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली असून नदी पलीकडील काढणीला आलेले सोयाबीन व इतर पिकांची काढणी व मळणी थांबली आहे. असे शेतकरी सुभाष दगडे यांनी सांगितले. नदीपलिकडे वाहतूक कोणत्याच मार्गानी होईना गेली आहे. नदी पलिकडील शेतकऱ्यांना दोरी बांधून जेवणाचे डब्बे पाठवत आहोत. नदी पलिकडील शेतकऱ्यांना जाता व येता येत नाही. मजूर नेण्यासाठी मार्ग नाही. त्यामुळे पिकांचे नुकसान अटळ असल्याचे दगडे यांनी सांगितले.

बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्याने शेताकडे पोहत जात असताना शेतकऱ्यांचा पाण्यात बुडून झाला मृत्यू

पाणी कमी झाल्याने शेताकडे पोहून जात असताना शेतकरी विनायक कृष्णात आतकरे या शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. बंधाऱ्याचा भराव वाहून गेला असल्याने ही घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे. पाणी पातळी कमी झाल्याने नदीपलीकडील शेतात असलेल्या जनावरांना शेतकरी चारा पाणी करण्यासाठी नदीतून पोहून जात होते .मृत पावलेल्या शेतकऱ्याचे शेत ही नदीपलीकडे होते. त्यामुळे इतर शेतकऱ्यांप्रमाणे जनावरांना चारा पाणी करण्यासाठी पोहून नदी पार करीत असताना पाण्याचा अंदाज आला नसल्याने त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर शेतकऱ्यांतुन प्रश्न उपस्थित केले जात असून भरावाचे निकृष्ठ काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

पाण्याच्या प्रवाहाने शेतजमीन गेली वाहून

पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने नदी काठी असलेली शेती पुराच्या पाण्यात वाहून गेली असून आता तेथे शेती नसून ओढा तयार झाल्याचे दिसत आहे असे शेतकऱ्यांनी सांगितले. पुराच्या पूर्वी या शेतजमिनीत काळीभोर माती होती. त्यामध्ये पिके घेतली जात होती. परंतु पुराच्या पाण्याने या शेतीचे होत्याचे नव्हते केले आहे.

ही शेती व्यवस्थित करण्यासाठी हजारो रुपये खर्च येणार आहे.शासनाकडून शेतजमिनीची पूर्ण नुकसान भरपाई मिळेल असे वाटत नाही असे बंधाऱ्यावर उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले.

मॅक्स महाराष्ट्र शी बोलताना शेतकरी लहू नाईक या शेतकऱ्याने सांगितले की, मी गट नंबर ३५ चा शेतकरी असून नदीपलीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. बंधाऱ्याचे काम निकृष्ठ दर्जाचे केले आहे. या भरावाच्या मुरुमीकरणाकडे गावकऱ्यांनी लक्ष दिले नाही. अधिकाऱ्यांनी ही लक्ष दिले नाही.भं गार मुरूम या भरावासाठी वापरला आहे. त्यामुळे बंधारा फुटलेला आहे.गे ल्या वर्षी ही बंधारा फुटला होता आणि यावर्षी ही फुटला आहे. याची दखल शासनाने घेतली नाही. आम्हाला १ रुपया सुद्धा नुकसान भरपाई मिळाली नाही. यामध्ये माझी २५ गुंठे शेती वाहून गेली होती. काही लोकांना त्यांचे काही वाहून गेले नसतानाही पैसे मिळाले आहेत परंतु माझी जमीन वाहून जाऊन सुद्धा त्याचा मोबदला मिळाला नाही.

नदीपलीकडं लेकरं-बायका आहेत. त्यांची उपासमार होत आहे. पण इथपर्यंत यायला कोणी तयार नाही. कुटुंबे कशी राहतात ,त्यांचे काय चालले आहे. हे राजकीय पुढाऱ्यांच्या लक्षात येत नाही. पाटबंधारे विभागाचे अधिकारी इकडे आले नाहीत. पिचिंग भिंत वाहून गेली आहे. पुराच्या पाण्यात पाटबंधारे विभागाचे साहित्य वाहून गेले आहे. शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले असताना ही अधिकारी इकडे यायला तयार नाहीत. यावर्षी तिसऱ्यांदा बंधारा फुटलेला आहे. गेल्या वर्षी बंधारा फुटल्यानंतर पुरात वाहून गेलो होतो. गावातील लोकांनी व शासनाने बंधाऱ्याच्या भरावाचे काम व्यवस्थित करण्याची गरज आहे.

या संदर्भात आम्ही आमदार यशवंत माने यांच्याशी बातचीत केली ते म्हणाले... मोहोळ मतदार संघाचे आमदार यशवंत माने यांनी मॅक्स महाराष्ट्र शी बोलताना सांगितले की, देगाव येथील बंधाऱ्याची पाहणी केली असून सध्या ३१ मीटर काँक्रीट भिंतीचे काम मंजूर आहे. आणखीन १२ ते १५ मीटर भिंतीचे काम वाढवणे आवश्यक असल्याने तशा सूचना पाटबंधारे विभागाला दिल्या असून लवकरच जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवला जाईल.अशी माहिती आमदार माने यांनी दिली.

तसेच नदी पार करीत असताना मृत्युमुखी पडलेल्या संबंधित शेतकऱ्याच्या कुटूंबाला उद्या कागदपत्रे आणायला सांगितली असून त्या शेतकऱ्याच्या कुटूंबाला १००% मदत दिली जाणार आहे.

लवकरच बंधाऱ्याच्या काँक्रीट भिंतीच्या कामाला सुरवात - रवींद्र कुलकर्णी, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग देगाव येथील बंधारा सुमारे ३ वर्षांपूर्वी २०१७-२०१८ साली फुटला होता. त्यावेळेस पाटबंधारे विभागाने टेंडर काढले होते. या बंधाऱ्याचे काम त्या साली मंगळवेढ्याचे ठेकेदार शिवानंद पाटील यांनी घेतले होते. त्यावेळेस त्यांनी बंधाऱ्याच्या पुढे भिंत बांधली होती. त्या भिंतीपासून मोहोळ-वैराग रस्त्यापर्यंत त्यांनी भरावाचे काम केले होते. मी ज्या वेळेस दीड वर्षांपूर्वी या बंधाऱ्याला भेट दिली होती. त्यावेळेस भराव होता. पण मागच्या वर्षी ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टी झाली व एका दिवसात १४० मिली मीटर पाऊस पडला होता.

हा पाऊस हिंगणी, जवळगाव या भागात झाल्याने भोगावती नदीला पूर आला होता. त्यावेळेस पुराचे पाणी देगाव गावाला चिटकले होते. हे पुराचे पाणी मोहोळ-वैराग रस्ता पार करून पलीकडे गेले होते. त्यावेळेस टाकलेला भराव वाहून गेला होता.त्यावेळेस वाहून गेलेल्या भरावाचा १ रुपया सुध्दा संबंधित ठेकेदाराला दिला दिला नव्हता. पाटबंधारे विभागाने संबंधित ठेकेदाराला काँक्रीटीकरण भिंतीचे ५० ते ६० लाख रुपयांचे बिल दिले होते.

सद्य स्थितीत असलेल्या काँक्रीटीकरण भिंतीच्या पुढे ३१ मीटर भिंत वाढवण्यात येणार असून त्याकामासाठी १ कोटी ८० लाख रुपये मंजूर आहेत. या भिंतीच्या पुढे आणखीन १२ ते १५ मीटर भिंतीचे काम वाढवण्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाकडून जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात येणार आहे. तसेच मंजूर असलेल्या ३१ मीटर काँक्रीटीकरण भिंतीचे काम लवकरच चालू करण्यात येणार आहे. असे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र कुलकर्णी यांनी मॅक्स महाराष्ट्र शी बोलताना सांगितले.

Updated : 17 Oct 2021 3:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top