माटु भारततोर लोकूर, संविधान थेट आदिवासींच्या भाषेत
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात 94 टक्के आदिवासी बांधवांना संविधान हा शब्दच माहिती नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यामुळे आदिवासींना त्यांच्या भाषेत संविधान वाचता यावं, यासाठी आदिवासी नेते Adv.लालसू नोगोटी, आदिवासी संकृतीचे अभ्यासक चिन्ना महाका आणि सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोईनकर यांनी आदिवासी समाजाची भाषा असलेल्या माडिया भाषेत संविधानाची प्रस्ताविका लिहीली.
X
भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाले आहेत. मात्र अजूनही महाराष्ट्रातील गडचिरोली (Gadchiroli) सारख्या आदिवासी भागात 94 टक्के आदिवासींना संविधान (Samvidhan) शब्दच माहिती नव्हता. त्यामुळे आदिवासी नेते अॅड. लालसू नोगोटी, आदिवासी संकृतीचे अभ्यासक चिन्ना महाका आणि सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोईनकर या तिघांनी या विषयावर काम करण्याचा निर्णय घेतला. सर्वप्रथम संविधानाची उद्देशिकेची जनजागृती करावी हे त्यांनी ठरवले. पण यामध्ये सर्वात मोठा अडथळा आला तो भाषेचा. पण त्यावरही मात करत संविधानाच्या प्रस्ताविकेचा माडिया भाषेत अनुवाद केला.
नक्षलप्रभावित क्षेत्रात संविधान पेरण्याचे ऐतिहासिक काम या तरुणांनी केले आहे. यामुळे वर्षानुवर्षे आपल्या हक्कांपासून वंचित असलेला हा समूह आपल्या अधिकाराबाबत जागृत होऊन मुख्य प्रवाहात येण्यास मदत होणार आहे.
देशभरात एकूण ७५ आदिम जमाती आहेत. त्या सर्वांची वेगळी भाषा आहे. त्यांच्या भाषेमध्ये त्यांना संविधानाची ओळख करून दिल्यास हा समुदाय त्यांच्या हक्काबाबत जागृत होईल, असा विश्वास या कार्यकर्त्यांना वाटत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम असलेल्या नक्षल प्रभावित क्षेत्रात संविधान रुजविण्याचे ऐतिहासिक काम या तरुण कार्यकर्त्यांनी हातात घेतले आहे. त्यांच्या या कामास सरकारने, विविध संस्थांनी बळ दिल्यास या दुर्गम आदिवासी भागातील नागरिक मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल.