जिल्हा बँकेंवर वर्चस्वासाठी लढाई, पण कारभार सुधारणार का?
X
राज्यातील 12 जिल्हा सहकारी बँकांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची श्यक्यता आहे. यामुळं सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला लागले आहेत. जळगाव जिल्हा सहकारी बँकेत सर्व पक्षीय पॅनलची बोलणी सुरू आहे. पण असे असतानाच काँग्रेसने स्वबळावर जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्याची भूमिका जाहीर करून धक्का दिला आहे. तर सर्वपक्षीय पॅनल चर्चा फिस्कटली तर शिवसेनेची ताकद वाढली असल्याने स्वबळावर लंगोट बांधायला तयार असल्याचा इशाराच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. भाजपही ऐनवेळी स्वतंत्र पॅनल देऊन सर्वांना धक्का देऊ शकतं. यामुळे जळगाव जिल्हा सहकारी बँक निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.
महाराष्ट्रातील क्वचितच असे गाव असेल जिथे सहकार चळवळ पोहोचलेली नाही. सहकारातून विकास या ध्येयाने सुरू झालेल्या सहकारी चळवळीत जिल्हा सहकारी बँकांचा वाटा मोठा आहे ग्रामीण भागामध्ये आर्थिक सोयी - सुविधा पुरवण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संजीवनी ठरलेल्या आहेत. पण गेल्या काही वर्षात या बँकांवर राजकाऱण्यांनी मिळवलेले वर्चस्व आणि भ्रष्टाचार यामुळे जिल्हा बँकांचा मुख्य उद्देश बाजूलाच पडल्याचे चित्र आहे. आताही जळगाव जिल्ह्यात जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण पेटलं आहे.
जिल्हा बँक निवडणुकीवर ईडीचं सावट
एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये 12 खात्यांचे मंत्री असतांना स्वतःच्या नेतृत्वात सर्वपक्षीय पॅनल उभं करून बँकेवर सत्ता मिळवली. त्यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांना जिल्हा बँकेच्या पहिल्या महिला चेअरमन पदी बसवलं. मात्र खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत गेल्यानंतर खडसें परिवारामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यातच बँकेच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा बँकेने संत मुक्ताई साखर कारखान्याला कोट्यवधींचे कर्ज दिल्या प्रकरणी ईडीने (सक्तवसुली संचालनालय) नोटीस दिल्याने खडसें पिता-कन्या यांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे या निवडणुकीवर ईडीचे सावट नक्कीच असणार आहे.
सहकार क्षेत्रातील राजकारणात जिल्हा सहकारी बँकांची महत्वाची भूमिका असते. यामुळे जिल्हा बँक ताब्यात ठेवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपली प्रतिष्ठा पणाला लावतात.
काँग्रेसचा स्वबळाचा नारा, सर्वपक्षीय पॅनलबाबत चलबिचल
काँग्रेसने स्वबळाचा नारा देऊन सर्वपक्षीय पॅनलमधून बिनविरोध निवडणूक करण्याच्या प्रयत्नांना सुरुंग लावला आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 संचालकांच्या निवडीसाठी लवकरच सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. पण, तत्पूर्वीच या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वपक्षीय पॅनलची चर्चा सुरू झाली. सहकारात पक्षीय राजकारण नसते, असा समज असला तरी जळगाव जिल्हा बँकेत मात्र, पक्षीय राजकारणाचे प्रतिबिंब दिसून येते. सध्या ही निवडणूक सर्वपक्षीय वाटाघाटी करून बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न फसले तर जिल्ह्यातील बदललेली राजकीय परिस्थिती पाहता यावेळी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे पारडे जड राहील. भाजपाही जोर लावून विरोधी पक्षांच्या अडचणी वाढवू शकतो. दुसरीकडे, काँग्रेसने स्वबळाचा नारा देऊन सर्वपक्षीय पॅनल निवडणुकीचे स्वप्न पाहणाऱ्यांना सुरुंग लावला आहे. परंतु गेल्या वेळेचे पक्षीय बलाबल पाहिले तर काँग्रेस स्वबळावर लढलीच तर काँग्रेसला तोटाच सहन करावा लागेल. मात्र राज्यात मित्र पक्ष आलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरणार आहे. यामुळं स्वबळाचा नारा देऊन जास्तीच्या जागा पदरी पाडून घेण्याची काँग्रेसची खेळी आहे, अशी चर्चा आहे.
सर्वपक्षीय पॅनलसाठी दिगग्ज नेत्यांची प्राथमिक बैठक
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बड्या नेत्यांची बैठक ह्या आठवड्यात होणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनलसाठी चाचपणी सुरू आहे. यासंदर्भात व्यूहरचना आखण्यासाठी पुढील आठवड्यात सर्वपक्षीय नेत्यांची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत पक्षनिहाय जागा वाटपाचे सूत्र ठरवून, ही निवडणूक बिनविरोध करण्याबाबत चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या बैठकीसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी गेल्या आठवड्यात माजीमंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेतली होती. तसेच राष्ट्रवादीचे माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, आणि गुलाबराव पाटील यांचीही भेट झाली. भाजप नेते गिरीश महाजन यांनाही या बैठकीत आणण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटलांनी पुढाकार घेतला आहे. या बैठकीत सर्वपक्षीय पॅनलबाबत नेत्यांचे एकमत झाले नाही तर मात्र निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. या बैठकीत जर काही निर्णय झाला नाही तर शिवसेना स्वबळावर लंगोट बांधून तयार आहेत. शिवसेनेची भूमिका देखील लवकरच जाहीर केली जाईल, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितले.
भाजप विरुद्ध महाविकास आघाडी?
गेल्या वेळी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात 21 पैकी सर्वाधिक 10 संचालक हे भाजपचे होते. त्या खालोखाल 6 संचालक राष्ट्रवादी काँग्रेसचे तर 4 संचालक हे शिवसेनेचे होते. 1 संचालक सर्वपक्षीय मानले जाणारे होते. त्यावेळी माजीमंत्री एकनाथ खडसे हे भाजपमध्ये होते. त्यांनी पुढाकार घेऊन सर्वपक्षीयांना एकत्र आणत निवडणूक बिनविरोध केली होती. आता खडसे हे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड राहणार आहे. खडसे हे भाजपच्या अडचणी वाढवण्यासाठी ताकद लावतील, अशीही चर्चा आहे. दुसरीकडे, राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र असलेली शिवसेनाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत गेली तर यावेळी निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगण्याची शक्यता आहे.
सर्वपक्षीय पॅनलचे प्रयत्न फसले तर ऐनवेळी अडचण होऊ नये, म्हणून भाजपने स्वबळाची तयारीही केली आहे. विकास सोसायटी मतदार संघाच्या 15 जागांसह इतर सहा राखीव मतदारसंघातील जागांबाबत भाजपने 21 इच्छुकांच्या नावांची यादी तयार ठेवल्याचचे बोलले जाते आहे.
सर्वपक्षीय प्रयत्न फसला तर भाजपची संभाव्य यादी
जळगाव- आमदार सुरेश भोळे, धरणगाव- चर्चेअंती निर्णय, अमळनेर- माजी आमदार शिरीष चौधरी, पारोळा- चर्चेअंती निर्णय, एरंडोल- विजय महाजन, भडगाव- प्रशांत पवार, चाळीसगाव- आमदार मंगेश चव्हाण, जामनेर- आमदार गिरीश महाजन किंवा अन्य कार्यकर्त्याला संधी, बोदवड- चर्चेअंती निर्णय, मुक्ताईनगर- अतुल पाटील किंवा नयना कांडेलकर, भुसावळ- आमदार संजय सावकारे, चोपडा- चर्चेअंती निर्णय, यावल- विनोद पाटील किंवा प्रशांत चौधरी, रावेर- नंदू महाजन, पाचोरा- पंडित शिंदे, (इतर मतदारसंघाच्या 6 जागांसाठी) ओबीसी- नारायण चौधरी, एसटी- प्रभाकर सोनवणे, इतर मतदारसंघ- खासदार उन्मेष पाटील, एनटी- राजेंद्र राठोड, महिला राखीव 2 जागांसाठी- माजी आमदार स्मिता वाघ अशी यादी भाजपने तयार ठेवली आहे. यात ऐन वेळी नावात बदल होण्याची शक्यता आहे.
*सर्वपक्षीय पॅनलची संभाव्य यादी *
जिल्हा बँकेच्या आजवरच्या इतिहासावर एक नजर टाकली तर स्वतःच्या अस्तित्वासाठी संचालकांनी वाटाघाटी करूनच संचालक मंडळ स्थापन झाल्याचे पाहायला मिळते. आताही सर्वपक्षीय पॅनलसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.
पॅनेलमध्ये सध्या चर्चेत असलेली नावे अशी आहेत-
जळगाव- आमदार सुरेश भोळे (भाजप),
धरणगाव- संजय पवार (राष्ट्रवादी)
अमळनेर- आमदार अनिल पाटील (राष्ट्रवादी),
पारोळा- आमदार चिमणराव पाटील (शिवसेना),
एरंडोल- अमोल पाटील (शिवसेना),
भडगाव- नानासाहेब देशमुख (राष्ट्रवादी) किंवा प्रताप पाटील, (राष्ट्रवादी)
चाळीसगाव- आमदार मंगेश चव्हाण (भाजप) किंवा माजी आमदार राजीव देशमुख (राष्ट्रवादी),
जामनेर- आमदार गिरीश महाजन (भाजप), बोदवड- ऍड. रवींद्र पाटील, (राष्ट्रवादी)
मुक्ताईनगर - माजीमंत्री एकनाथ खडसे (राष्ट्रवादी)
भुसावळ- आमदार संजय सावकारे (भाजप),
चोपडा- डॉ. सुरेश पाटील (काँग्रेस)
यावल- आर. जी. पाटील किंवा विनोद पाटील, (काँग्रेस)
रावेर- नंदू महाजन (भाजप), पाचोरा- आमदार किशोर पाटील (शिवसेना),
- इतर सहा राखीव मतदारसंघाच्या जागांसाठी - ओबीसी- माजीमंत्री डॉ. सतीश पाटील (राष्ट्रवादी)
इतर मतदारसंघ- माजी मंत्री गुलाबराव देवकर(राष्ट्रवादी) एसटी- माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे (शिवसेना) एनटी- मेहताबसिंग नाईक, महिला राखीव 2 जागांसाठी- ऍड. रोहिणी खडसे (भाजप) किंवा संगीता भंगाळे.
अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनात रस्सीखेच
निवडणुकीपूर्वीच बँकेच्या अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरु झाली आहे. अध्यक्ष पदावर दिग्गज नेत्यांचा डोळा आहे. गेल्यावेळी सर्वपक्षीय पॅनलसाठी एकनाथ खडसे यांनी प्रयत्न करून कन्या रोहिणी खडसे यांची अध्यक्षपदी वर्णी लावली होती. यावेळी एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. शिवाय जिल्हा बँकेत राष्ट्रवादीची ताकद पाहता अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचा दावा मजबूत राहणार आहे. राष्ट्रवादीचे दोन माजीं पालकमंत्री गुलाबराव देवकर आणि डॉ. सतीश पाटील यांच्यात चुरस राहणार आहे. सर्वपक्षीय पॅनलसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील प्रयत्न करत आहे. यामुळं शिवसेनेकडून विद्यमान उपाध्यक्ष आमदार किशोर पाटील आणि बँकेचे माजी चेअरमन तसेच आमदार चिमणराव पाटील यांच्यात चुरस रंगणार आहे. ऐनवेळी दोन्ही प्रयत्न फसले तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना या दोन्ही पक्षांपैकी एकाच्या वाटेला अध्यक्षपद जाईल, यात भाजपची भूमिका मात्र महत्वाची असेल.
या सर्व गदारोळात बँकेचे ध्येय, घोटाळ्यातील आरोपींचे काय होणार याबाबत मात्र कुणीही चर्चा करत नाहीये.