मोदींसमोर आता काँग्रेसचं प्रियंकास्त्र
X
नवी दिल्ली – २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपुर्वीच काँग्रेसमध्ये एक मोठा निर्णय झाला आहे. काँग्रेसच्या महासचिवपदी प्रियंका गांधी यांची निवड कऱण्यात आली आहे. आगामी निवडणुका या आता नमो विरूद्ध रागा ऐवजी नमो विरूद्ध प्रियंका गांधी अशा होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
देशभरात सोशल मीडियाने राहुल यांना पप्पू म्हणून हिणवलं होतं. त्याचवेळी काँग्रेसमधून प्रियंका गांधी यांना सक्रीय राजकारणात आणण्याची मागणी जोर धरू लागली होती. मात्र, काँग्रेस श्रेष्ठींनी राहुल यांच्या पारड्यात वजन टाकलं. सामान्य कार्यकर्त्यांनी मात्र प्रियंका गांधी यांनीच नेतृत्व करावी अशी मागणी पक्षाकडे वारंवार केली होती. अखेर काँग्रेसच्या महासचिवपदी प्रियंका यांची निवड करून त्यांना सक्रीय करण्यात आलं आहे.
प्रियंका गांधी यांच्यावर उत्तरप्रदेश पूर्व ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे उत्तर प्रदेश पश्चिमची जबाबदारी देण्यात आलीय. काँग्रेसचे माजी सरचिटणीस गुलाम नबी आझाद यांची हरिय़ाणाचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रियांका गांधी यांच्या निवडीमुळं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदच वातावरण असून त्यांच्या या निवडीचा फक्त उत्तर प्रदेशाच्या पूर्वेकडच्या भागावरच परीणाम होणार नसून संपूर्ण देशभरात फरक पडेल असं मत ज्येष्ठ काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा यांनी व्यक्त केलं आहे.