महिला काँग्रेसच्या सरचिटणीसपदी तृतीयपंथी अप्सरा रेड्डी यांची निवड
X
काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्र राहुल गांधी यांनी घेतल्यानंतर पक्षात नवीन-नवीन गोष्टी सुरु असल्याचे आपल्याला पाहायला मिळतेय. त्यातच आणखी एक भर म्हणून काँग्रेसने प्रसिद्ध तृतीयपंथी पत्रकार आणि कार्यकर्त्या अप्सरा रेड्डी यांची महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड करण्यात केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रेड्डी यांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांच्या निवडीची घोषणा केली.
कोण आहेत अप्सरा रेड्डी?
चेन्नईत वास्तव्यास असलेल्या रेड्डी या अण्णा द्रमुकमध्ये (एआयएडीएमके) कार्यरत होत्या. त्याआधी त्यांनी भाजपसाठी काम केलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि लंडनमध्ये पत्रकारितेचं शिक्षण घेतलेल्या रेड्डी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मासिकांमध्ये काम केलं आहे. तामिळनाडूत स्वच्छता मोहीम राबवण्याबरोबरच महिलांच्या प्रश्नांवरही त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. २०१६मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, पक्षात विचारस्वातंत्र्याला स्थान नसल्याचं सांगत त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर थोड्याच दिवसांत माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी त्यांची अण्णा द्रमुकच्या प्रवक्ता म्हणून नियुक्ती केली होती. जयललितांच्या निधनानंतर पक्षात सुरू झालेल्या वादामुळं त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.