मरणाच्या दारावरील 'तिचा' रोजचा प्रवास!
पतीच्या मृत्यूनंतर उघड्यावर आलेल्या संसाराला आपल्या जिद्द आणि मेहनतीने पुढे नेणाऱ्या ह्या आहेत छाया कुचे... पैठण येथील जायकवाडी धरणाच्या बँक वाटर परिसरात राहणाऱ्या छाया कुचे ह्या वयाच्या 15 वर्षांपासून मासे पकडण्याच काम करतात... घरच्यांनी 15 वर्ष वय झाले नाही ते लग्न करून दिले. लॉकडाऊनमध्ये छायाताईंना जीवावरची कसरत करून आपल्या परिवाराचं पालनपोषण करावं लागतंय. मोसीन शेख यांचा विशेष रिपोर्ट
X
काळ बदलत चालला आहे तसे अनेक पारंपरिक व्यवसायांचे स्वरुप बदलत आहे. मुंबईतील कोळी महिलांचा मासेविक्रीच्या व्यवसायातील प्रभाव नेहमी असतो. पण मुंबई बाहेर मराठवाड्यातही मासेमारीच्या व्यवसायात महिला काम करत आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून कहार समाज मासेमारी करून आपली उपजीविका भागवत आहे. मराठवाड्यात तर या व्यवसायात महिला सुद्धा मोठ्याप्रमाणात असल्याचे दिसून येते. धरण,तलाव आणि नद्यांमध्ये उतरून जाळे लावण्यापासून तर मार्केटमध्ये विक्री करण्यापर्यंत महिलांचा सहभाग पाहायला मिळतो. औरंगाबादच्या जायकवाडी धरणात अशीच एक महिला आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रोज मरणाच्या दारावरील प्रवास करतेय. पतीच्या मृत्यूनंतर उघड्यावर आलेल्या संसाराला आपल्या जिद्द आणि मेहनतीने पुढे नेणाऱ्या छाया कुचे ह्या गेल्या कित्येक वर्षांपासून मासे पकडण्याच काम करतायत.पैठण येथील जायकवाडी धरणाच्या बँक वाटर परिसरात राहणाऱ्या छाया कुचे ह्या वयाच्या 15 वर्षांपासून मासे पकडण्याच काम करतात.
वडिलांनी 15 वर्ष वय झाले नाही ते लग्न करून दिले. सासरी आल्यावर काही दिवस चांगले गेले. मात्र आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने पती प्रमाणेच छाया बाई यांनी सुध्दा धरणात जाऊन मासे पकडण्याचे काम सुरू केले. पकडलेले मासे रोजच्या-रोज विकून मिळाले पैसे हेच या कुटुंबाच आर्थिक उत्पन्न. छाया बाई यांचा असाच संसार सुरू असताना पतीचं अचानक निधन झालं.त्यामुळे घरातील एक मुलगी आणि अपंग मुलाची जवाबदारी छाया बाई यांच्या खांद्यावर आली.साधं रहवासी कार्ड नसलेल्या छाया बाई यांना नोकरी किंवा इतर रोजगारच कोणतेही साधन नसल्याने, त्यांनीही पती प्रमाणेच मच्छिमार हा व्यवसाय पुढे करत राहण्याचा निर्णय घेतला.
म्हणतात पोटाची खळगी माणसाला सर्व काही शिकवून जाते, त्याचप्रमाणे छाया बाई यांनाही याच पोटाच्या खळगीने जायकवाडी धरणाच्या पाण्यात आधीच उतरवलं होतं. मात्र आता सुरू झाला होता तो स्वतः बरोबरच मुलांच्या भविष्यासाठीचा लढा, जो आजही सुरू आहे. छाया बाई ह्या रोज संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास चपूच्या साह्याने धरणाच्या 5-6 किलोमीटर आत जाऊन जाळे लावतात. रात्रीतून जाळ्यात अडकलेले मासे आणण्यासाठी पुन्हा सकाळी 6 वाजता त्याच चपूच्या साह्याने धरणात जातात. पाण्यात जाताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचं छाया बाई सांगतात. वारा आल्यास चपू पलटी होण्याचा धोका असतो.अनकेदा जाळ्यात सर्प ही अडकून येतात, तर याच परिसरात मगर सुद्धा अनेकदा दिसून आल्याने तीही भीती मनात असते. एवढं सर्व करून हातात फक्त किलो-दोन किलो मासे येतात. त्यातून दीड-दोनशे रुपये मिळाले म्हणजे खूप झाले, असेही त्या भावनिक होऊन सांगत होत्या.
तर अनेकदा उत्पन्नपेक्षा मच्छीमारीसाठी लागणाऱ्या वस्तूंचाच खर्चच अधिक होत असते. मासे पकडण्यासाठी लागणारी एक जाळी हजार रुपयाला मिळते.तर प्रत्येक महिन्याला नवीन जाळी आणावे लागते. त्यामुळे बऱ्याचवेळा पैसे नसल्याने उधारीवर पैसे घेऊन जाळी आणावी लागते. पुढे मासे विकून हे उधारीचे पैसे फेडावे लागत असल्याचं छाया बाई सांगतात. पतीच्या निधनानंतरही छाया बाई यांनी संघर्ष अर्ध्यावर न सोडता खडतर लढा दिला आहे. नियतीशी दोन हात करण्याच्या निर्णय घेऊन त्यांनी आपला जीवनाचा लढा कायम ठेवण्याची जिद्द ठेवली आहे.यामुळे छाया बाई यांचा हाच लढा इतर महिलांही प्रेरणादायी देणारा आहे.
कहार समाज विकासापासून दूर
तर छाया बाई यांच्याप्रमाणेच कहार समाजातील अनेक महिला यांचा सुद्धा असाच प्रवास आहे. धरण किंवा तलावाच्या बँक वाटर परिसरात झोपड्यामध्ये राहून पिढ्यानपिढ्या अनेक कुटुंब आपले जीवन जगत आहे. जायकवाडीच्या बँक वाटर भागात सोनवाडी भागात सुद्धा असे अनेक कुटुंब झोपड्या टाकून रहातात.आतापर्यंत अनेक सरकार आले आणि गेलीत पण या समाजाच्या विकासासाठी हवे तसे प्रयत्न कधीच झाले नाही.
या समाजाचा इतिहास पहिला तर आधी मराठवाड्यातील कहार समाज लग्नात डोली उचलण्याचे काम करत असे.मात्र काळानुसार या समाजाने सुद्धा आपल्या कामात बदल केला. पुढे त्यांनी शेती सुरू केली. नदी,नाले, धरण आणि तलाव यांच्या गाळपेरा भागात टरबूज-खरबूज पिकांची शेती करणे सुरू केले. पाणी कमी झाल्यावर सरकारी जमिनीवर अशी पिके घेत असल्याने त्यांना लागवड खर्च पलीकडे इतर खर्च नसल्याने उत्पन्न सुद्धा चांगला होत असे. त्यामुळे हा समाज विकसीत होत होता.
मात्र पुढे धरणात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी धरण परिसरात ताबे घेत या जमिनीवर स्वतः शेती करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पुन्हा हा समाज बेरोजगारीच्या वाट्यावर गेला. मात्र त्यातच अनेकांनी मच्छिमार हा व्यवसाय निवडला. पुढे मग कहार समाजातील अनेकांनी हाच व्यवसाय निवडला.
पुरुषांप्रमाणे महिला सुद्धा या व्यवसायात उतरल्या. छाया बाई प्रमाणे अनेक महिला आजही वर्षानुवर्षापासून मच्छिमार करत आहे. पण त्यातून होणाऱ्या आर्थिक उत्पन्न किंचीत असल्याने हा समाज आजही दारिद्र्य खाली आहे.
शिक्षणाचे महत्त्व अद्यापही पोहचलेच नाही
कहार समाज म्हणजेच भोई समाजातील एक पोटजात त्यामुळे त्यांना 'भाई' या नावाने देखील ओखळले जाते.नदीकाठी खरबूज-टरबूजांचे पीक घेऊन त्यांची विक्री करणे,मासे विकणे या पारंपरिक व्यवसायात अडकून राहिलेल्या या समाजात शिक्षणाचे महत्त्व अद्यापही पोहचलेले नाही.त्यामुळे या समाजातील फारच कमी लोक हे उच्च शिक्षण घेताना दिसून येतात. विशेष म्हणजे कहार समाजातील महिलांचे शिक्षण घेण्याचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळेच छाया बाई सारखी परिस्थितीचा त्यांना सामना करावा लागतो.
सरकारने लक्ष देण्याची गरज
कहार समाजातील अनेक कुटुंबाला आजही हक्काच घर नाही. त्यामुळे धरणाच्या बँक वाटर किंवा गायरान जमिनीवर झोपडी बांधून राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.घरचं नसल्याने वीज आणि इतर सोयी-सुविधांचा लांब-लांब पर्यंत संबंध नाही.त्यामुळे त्यांच्या जीवनातील अंधार कायमचाच असल्याचं पाहायला मिळते.
घरकुल,रेशन, मुलांचे शिक्षण या प्राथमिक सुविधा मिळाल्या तर,या समाजच्या विकासाला मार्ग मिळू शकते. मात्र ह्या साठी त्यांना संघर्ष करावा लागतो. त्याचप्रमाणे पारंपरिक व्यवसाय करताना त्यासाठी सरकारने मदत करण्याची अनेक दिवसांची मागणी सुद्धा प्रलंबित आहे.
एवढं सर्व करून हातात फक्त किलो-दोन किलो मासे येतात. त्यातून दोनशे रुपये मिळाले म्हणजे खूप झाले.त्यालाही विकण्यासाठी 3-4 किलोमीटर दूर पायी जावे लागते.तर मासे पकडण्यासाठी लागणाऱ्या जाळयांचा खर्च वेगळं.एक जाळी हजार रुपयाला मिळते.प्रत्येक महिन्याला नवीन जाळी आणावे लागते. त्यामुळे दर महिन्याला उधारीवर पैसे घेऊन जाळी आणावी लागते. पुढे मासे विकून हे पैसे फेडावे लागतात.
छाया बाई यांच्या मुलीचं लग्न झालं तर मुलगा अपंग आहे. त्यामुळे त्याचाही सांभाळ छाया बाई यांनाच करावा लागतो..
पतीच्या निधनानंतरही त्यांनी संघर्ष अर्ध्यावर न सोडता खडतर लढा दिला आहे. नियतीशी दोन हात करण्याच्या निर्णय घेऊन त्यांनी आपला जीवनाचा लढा कायम ठेवण्याची जिद्द ठेवली आहे... त्यामुळे छाया बाई यांचा हाच लढा इतर महिलांही प्रेरणादायी देणारा आहे.... औरंगाबादहुन मोसीन शेख मॅक्स महाराष्ट्र..


