Chandrayaan 2 : या दोघी आहेत चांद्रयानाच्या आर्कीटेक्ट
Max Maharashtra | 15 July 2019 7:28 PM IST
X
X
भारताच्या चांद्रयान- २ या मोहिमेचे विशेष आकर्षण म्हणजे पहिल्यांदाच दोन भारतीय महिला वैज्ञानिक या मोहिमेचं नेतृत्व करत आहेत. एम. वनिता आणि रितू करीधल या दोन महिला वैज्ञानिक आहेत ज्यांच्या खांद्यावर चांद्रयान -२ या मोहिमेची जबाबदारी आहे. चांद्रयान -२ मोहिमेचं आजचं प्रक्षेपण तांत्रिक कारणामुळे स्थगित करण्यात आलं असलं पहिल्यांदाच इतक्या मोठ्या मोहीमेचं नेतृत्व महिला वैज्ञानिक करत असल्यामुळे भारतासाठी ही गौरवशाली बाब आहे.
वनिता मुथैया
वैज्ञानिक वनिता मुथैया मोहिमेच्या प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम पाहत आहेत. चांद्रयान-२ च्या लॉन्चिंग पासून ही मोहीम पूर्णत्वास नेईपर्यंत एम. वनिता यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. त्या डिजाईन इंजिनिअर आहेत. चांद्रयान -१ च्या मोहिमेमध्येही अंतराळातून येणाऱ्या विविध डाटा च्या विश्लेषणाची कामगिरी त्यांनी पार पाडली होती. त्यांची समस्यांवर त्वरित उपाय शोधण्याची क्षमता व सांघिक कामगिरीसाठी सहका-यांना उत्साहित करण्याची शैली या गुणामुळेच त्यांच्याकडे या मोहिमेची सूत्रे देण्यात आल्याचे इस्रोद्वारा म्हटले जाते. एस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया ने २००६ साली त्यांना 'बेस्ट वुमन सायंटिस्ट' चा किताब देऊन गौरविलेही होते.
समंधीत बातम्या वाचण्यासाठी इथं क्लिक करा...
रितू करिधल
तसेच या मोहिमेत दुस-या महिला वैज्ञानिक आहेत ज्या महत्वाची भूमिका निभावणार आहेत त्या म्हणजे 'भारताची रॉकेट वुमन' अशी ओळख असणाऱ्या रितू करिधल. त्या या मोहिमेत डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर म्हणून काम पाहत आहेत. रितू या मुळच्या लखनऊ येथील असून त्या एयरोस्पेस इंजिनिअर आहेत. यापुर्वीही त्यांनी चांद्रयान-१ व मंगलयान या भारताच्या यशस्वी अंतराळ मोहिमांमध्ये आपले अमूल्य योगदान देऊन आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. यावेळेस त्यांच्याकडे चांद्रयान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेस पार पाडण्याची महत्वाची जबाबदारी आहे.
आजची चांद्रयानाच्या उड्डाणाची मोहीम जरी काही तांत्रिक अडचणीमुळे रद्द करण्यात आली असली तरी भविष्यात नारीशक्तीच्या बळावर नक्कीच हे यान अवकाशात उत्तुंग भरारी घेईल व भारतीय अवकाश संशोधनाच्या इतिहासाचे पान सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल.
Updated : 15 July 2019 7:28 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire