GroundReport मुंबईकरांनो तुमची तहान भागवणारे पाण्याविना, महापालिका न्याय देणार का?
मुंबईची तहान भागवणाऱ्या आसपासच्या आदिवासी भागातील प्रकल्पग्रस्तांची पाण्याची तहान आजही कायम आहे. त्यांच्या समस्या आणि संघर्षाची कहाणी सांगणारा आमचे प्रतिनिधी रवींद्र साळवे यांचा ग्राऊंड रिपोर्ट...
X
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ही अनेकांचे स्वप्न पूर्ण करते म्हणून या शहरात दररोज शेकडो लोक येत असतात...या वाढत्या गर्दीच्या गरजा भागवण्यासाठी महापालिका वेगवेगळ्या सुविधा करते...मुंबईच्या लोकसंख्येची पाण्याची तहान भागवण्यासाठी शेजारच्या ठाणे, पालघर जिल्ह्यांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. पण मुंबईच्या अवाढव्य लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमधील हजारो आदिवासी बांधवांनी आपल्या जमिनी दिल्या...याचाच अर्थ त्यांनी आपले भवितव्य मुंबईच्या पाण्यासाठी दिले. त्या बदल्यात या प्रकल्पग्रस्तांना अनेक आश्वासने देण्यात आली. पण आजही ही आश्वासने पूर्ण झालेली नाहीत.
धरण उशाला कोरड घशाला
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मध्य वैतरणा प्रकल्प १२ वर्षांपूर्वी पालघरमधील मोखाडा येथे उभारण्यात आला. या प्रकल्पात असंख्य आदिवासींच्या जमिनी गेल्या अनेकांना विस्थापित व्हावे लागले. यावेळी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक आदिवासींना असंख्य आश्वासनांची खैरात केली. पण 12 वर्षात धरणालगतच्या आदिवासींना ना पाणी मिळाले, ना विस्थापितांना न्याय मिळाला, ना कुणाला नोकऱ्या मिळाल्या. अनेकवेळा रास्ता रोको आंदोलनं केली, मोर्चे निघाले. पण प्रशासनाने दखल घेतली नाही. यामुळेच पालिका प्रशासनाच्या विरोधात येथील आदिवासींमध्ये प्रचंड खदखद आहे, व आपल्याला न्याय मिळावा या भावनेतून त्यांचा संघर्ष सुरूच असल्याचे पहायला मिळतेय. आता पुन्हा हा पाणी प्रश्न पेटणार असल्याची चिन्ह आहेत.
"आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा आम्ही मुबंईला जाणारे पाणी रोखू नाहीतर ह्याच धरणाच्या पाण्यात जलसमाधी घेऊ" असे नितीन जागले या आदिवासी युवकाने मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले.
कसे आहे मध्य वैतरणा धरण
मध्य वैतरणा धरण पूर्णतः सिमेंट काँक्रिटचे बांधण्यात आले आहे. महाराष्ट्रातील अशाप्रकारचे हे पहिले तर भारतातील दुसरे व जगातील नववे धरण आहे. या धरणाची उंची १०२ मीटर आहे. मुंबईला सध्या मोडक सागर, तानसा, वैतरणा, विहार, तुळशी, भातसा या सहा धरणांतून रोज ३ हजार ३५० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केला जात असून एकट्या मध्यवैतरणा धरणातून दरोज ४५५ दशलक्ष लिटर पाणी मुबंईला पुरवठा केला जातो आहे.
मध्य वैतरणा प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या
1. नळयोजना प्रभावीपणे राबवून स्थानिकांना मोफत पाणी मिळावे
2. प्रकल्पग्रस्त व प्लॉटधारकांना दाखले, नोकऱ्या व तात्काळ मोबदला मिळावा
3. जलविद्युत प्रकल्पाला आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे नाव देणे
४. जलविद्युत प्रकल्पातून स्थानिकांना मोफत वीज द्यावी
५. नव्याने सुरू होणाऱ्या जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणीत स्थानिकांना रोजगार द्या व इतर कामांमध्ये प्राधान्य द्यावे
६. प्रकल्पग्रस्त गावे महापालिकेने दत्तक घ्यावी
मुबलक पाणीसाठा असूनही मोखाडा तालुका तहानलेला
अतिदुर्गम डोंगराळ भागात असलेल्या मोखाडा तालुक्यातील आदिवासींना दरवर्षीच पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. फेब्रुवारी महिन्यात पाणीटंचाईची समस्या तोंड वर काढते. तालुक्यात खोच, पळसपाडा, मारुतीची वाडी, कारेगाव, मोरहंडा,अशी मोठी मोठी पाच धरणे उशाला असून कोरड मात्र घशाला, अशी परिस्थिती प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणामुळे कायम आहे. या धरणांवर कोट्यवधींचा खर्च होऊन देखील याचा काहीच फायदा येथील आदिवासी बांधवाना झालेला नाही. टंचाईग्रस्त आदिवासींना हातातली कामे सोडून घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते आहे. टंचाईग्रस्त गावपाड्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींपासून टंचाईग्रस्त गावपाडे २० - २५ किलो मीटर अंतरावर आहेत. त्यामुळे टँकर चालकांनाही चांगलीच कसरत करावी लागते आहे. त्यामुळे त्यांना टँकरसाठी ताटकळत उभे राहावे लागते.
दरवर्षी या ठिकाणी प्रचंड पाऊस होऊन देखील शून्य नियोजनामुळे पाणीटंचाई उग्र होत असते. यामुळे फक्त टँकर लॉबीला जगवण्याचे काम केले जात आहे का, असा सवाल इथले लोक विचारतायत. कोचाळे येथील मध्य वैतरणा प्रकल्पातून १२० किमी अंतरावर मुबंईला पाणी पोहोतचे. धरणालगतच्या ४ ते ५ किमी अंतरावरच्या गावांना उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते.
ज्या मोखाडा तालुक्यातून बाळासाहेब ठाकरे मध्यवैतरणा धरणातील पाणी 100 किमी अंतरावर मुबंईला पुरवले जाते, त्या मोखाडा तालुक्यातील पंचायत समितीवर देखील गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. परंतु शिवसेनाला फक्त मुंबईकरांची काळजी आहे, आमची नाही अशी तक्रार आंदोलक करत आहेत.
विद्युत निर्मिती प्रकल्प पूर्ण, आश्वासने अपूर्णच
इथल्या विद्युत निर्मिती प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून त्याचे उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केले जाणार आहे. त्यामुळे प्रशासनाला कोंडीत पकडण्यासाठी इथल्या आदिवासींनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून 23 जानेवारीला या विद्युत निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केले जाणार होते अशी चर्चा आहे. पण कोचाळे, कारेगाव, कडूचीवडी, करोळ, वावळेवाडी, पाचघर येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हंडे डोक्यावर घेत मोर्चा काढला. 7 किमी पायी चालत या आंदोलकांनी मध्य वैतरणा प्रकल्पापर्यंत धडक मारली. या आंदोलनाची कुणकुण पालिका प्रशासनला आधीच लागल्याने हा उद्घाटन सोहळा पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आहे.
त्यामुळे हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले. आता 29 तारखेला पालिका अधिकारी व स्थानिकांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीत मागण्यांची पूर्तता न झाल्यास 2 तारखेपासून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे प्रकल्पग्रस्तांचा समजूत घालण्याचे प्रयत्न सत्ताधारी शिवसेनेकडून केले जात आहेत. त्यासाठी 24 जानेवारी रोजी शिवसेनेचे आमदार रविंद्र फाटक यांनी प्रकल्पग्रस्तांची भेट घेतली.
शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांचे आश्वासन
"तुमचे एक शिष्टमंडळ घेऊन मी स्वत: तुमची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घडवून आणेन. त्यातून तुमच्या मागण्या सोडवल्या जातील" असे आश्वासन पुन्हा एकदा देण्यात आले आहे. परंतु गेल्या 12 वर्षात अशी अनेक आश्वासनं पदरी पडलेल्या प्रकल्पग्रस्तांचा सरकारवर विश्वास नाहीये. प्रकल्पग्रस्तांना नळाचे पाणी नाहीच २००८ मध्ये मध्य वैतरणा प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. 12 वर्षांचा कालावधी उलटूनही येथील धरणग्रस्तांना मुंबई महानगरपालिकीने दिलेली आश्वासाने पाळलेत. 5 कोटी रुपयांची नळ योजना केवळ कागदावरच राहिली आहे. यामुळे हंडाभर पाण्यासाठी येथील आदीवासी होणारी पायपीट कायम आहे. यासंदर्भात आम्ही आमदार सुनील भुसारा यांची प्रतिक्रिया जाणून घेतली, तेव्हा येत्या वर्षभरात मुंबई महापालिकेशी समन्वय साधून सर्व समस्या सोडवू असे आश्वासन त्यांनी दिले.