Ground Report : "तिरंदाज खेळाडूंचा कारखाना" बुलडाणा शहराची नवी ओळख...
बुलडाणा जिल्ह्याला भौगोलिक , ऐतिहासिक आणि अध्यात्मिक वारसा लाभलेला आहे, आणि आता यामध्ये एक नवीन भर पडली आहे... बुलडाणा म्हणजे "तिरंदाज खेळाडू घडवण्याचा कारखाना..." आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे यांचा रिपोर्ट ग्राऊंड रिपोर्ट...
X
युरोपातील पोलंडमध्ये 18 वर्षाखालील तिरंदाजी स्पर्धा अर्थात "युथ व आर्चरी चॅम्पियनशीप" भारतीय युवा संघाने अटी-तटीच्या फरकाने अमेरिकेवर मात केली आणि स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला पुन्हा भारताचा तिरंगा सातासमुद्रापार फडकला आणि भारतीयांची मान अभिमानाने उंचावली....या भारतीय संघाचे नेतृत्व करणारा मिहीर अपार हा बुलडाण्याचा रहिवासी आहे, ही बाब महाराष्ट्रासाठी आणखी भूषणावह आहे. भारतीय तिरंदाजी संघात बुलडाण्याच्या मिहीर अपारसह हरियाणाचा कुशल दलाल व उत्तरप्रदेशचा साहिल चौधरी हे खेळाडू होते. विशेष म्हणजे भारतीय टीमचे प्रशिक्षक चंद्रकांत ईलक हे देखील बुलडाण्याचे आहेत.. मिहीरने लहानपणापासूनच चंद्रकांत ईलक यांच्या मार्गदर्शनात धनुर्विद्या या खेळासाठी अथक परिश्रम घेतले आणि 14 वर्षाखालील भारतीय संघासाठी तो पात्र ठरला होता.
तिरंदाजीच प्रशिक्षण घेणारे खेळाडू सराव करत असताना त्यांचा सराव मिहीर हा मन लावून पाहत होता मग त्यांच्या आईवडिलांनी प्रशिक्षक चंद्रकांत इलक यांच्याकडे प्रशिक्षणासाठी त्याला पाठवविले अथक परिश्रम तो आपला सराव नियमीतपणे करत होता. स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात मनावर मोठ्याप्रमाणात दडपण होतं, परंतु कुठेही विचलित न होता देशाचा तिरंगा डोळ्यासमोर आणला आणि नंतर तीर योग्य ठिकाणी मारल्याने भारताला सुवर्णपदक मिळालं असे मिहीर अपार यांने सांगितले.
खरं तर कुठल्याही खेळामध्ये प्रावीण्य मिळवायचं असेल तर त्यासाठी खेळाडूची जिद्द, चिकाटी आणि मेहनत तर लागतेच, त्यासोबतच खेळासाठीचे सुसज्ज असे मैदान, त्या खेळाचे सर्व साहित्य, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्कृष्ठ प्रशिक्षकाची गरज असते... इतर मोठमोठ्या शहरांच्या तुलनेत बुलडाणा शहरात तिरंदाजीसाठी स्वतंत्र मैदान आणि खेळाचे साहित्य याची कमतरता सोडली, तर उत्कृष्ट असे प्रशिक्षक हे बुलडाण्याला लाभलेले आहेत... आणि त्यामुळेच त्यांनी आपल्या अथक परिश्रमातून आणि निशुल्क पणे देशाला उत्कृष्ट तिरंदाज खेळाडू दिले... ज्या खेळाडूंनी देशाला सुवर्णपदकासह इतरही पदके मिळवून दिली आहेत... आणि त्यामुळेच बुलडाणा शहरात राज्याच्या राजधानी , उपराजधानी सह राज्यभरातून आलेले खेळाडू हे तिरंदाजीचे प्रशिक्षण घेत आहेत...
सैन्य दलातुन निवृत्त झाल्यानंतर चंद्रकांत इलक यांनी बुलडाण्यात 2012 साली मुलांना धनुर्विद्येचे प्रशिक्षण देण्यासाठी सुरुवात केली... सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्याकडे केवळ एक खेळाडू प्रशिक्षण घेत होता, मात्र आज रोजी संपूर्ण राज्यातील 100 पेक्षा जास्त खेळाडू त्यांच्या मार्गदर्शनात सराव करत आहेत... या आठ वर्षाच्या काळामध्ये त्यांनी तिरंदाजी मध्ये अनेक खेळाडू तरबेज केले, ज्यापैकी आत्तापर्यंत 5 आंतरराष्ट्रीय खेळाडू, 2 छत्रपती पुरस्कार मिळवलेले खेळाडू, 3 खेळाडू इंटरनॅशनल पदक मिळवले, तर 43 राष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू त्यांनी घडवले आहेत... आणि आता नुकतेच पोलंडमध्ये अमेरिकेवर मात करून तिरंदाजी टीमने सुवर्ण पदक मिळवून स्वातंत्र्यदिनी देशाला एक अनोखी भेट दिली आहे. या टीमचा नेतृत्व करणारा मिहीर अपार हा देखील बुलडाण्यातील असून तो प्रशिक्षक चंद्रकांत इलक यांच्याच मार्गदर्शनात तरबेज झाला आहे...
नागपूरची प्रिया सावजी हिने शाळेत असतानाच आर्चरी खेळण्याला सुरुवात केली, इंडियन राउंड खेळत असताना स्टेट लेव्हलपर्यंत तिची मजल होती असे ती सांगते. त्यानंतर पोलीस कर्मचारी आणि आर्चरीचे प्रशिक्षक चंद्रकांत ईलक यांच्याशी 2017 साली प्रियाची ओळख झाली आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची आर्चरी काय असते, हे तेव्हा कळले आणि आपण त्यांच्या मार्गदर्शनात सराव सुरू केल्याचे ती सांगते. 2018 साली ती पहिली राज्यस्तरीय स्परधा खेळली. 2019 ला तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. मात्र कोरोनाने सर्व ठप्प असल्याने दोन वर्षे कुठलीच स्पर्धा झाली नाही.. त्यानंतर प्रशिक्षक चंद्रकांत इलक हे बुलडाण्यामध्ये आले. त्यामुळे त्यांची कोचिंग पाहून पूजाही नागपूरहून आपल्या इतर सहकारी खेळाडूंसह बुलडाणामध्ये आली. तेव्हा नागपूरसह इतरही जिल्ह्यातील खेळाडू प्रशिक्षणासाठी बुलडाण्यात असल्याचे प्रियाच्या लक्षात आले. प्रशिक्षक चंद्रकांत ईलक यांचे प्रशिक्षण देण्याची पद्धत आणि आर्चरीसाठी बुलडाण्यामधले वातावरण हे नागपूरपेक्षा अधिक पूरक असल्याचे पूजा सावजी सांगते.
सध्या त्यांच्याकडे बुलडाणा जिल्ह्यातील 50 तर मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे यासह संपूर्ण राज्यातील 40 ते 50 खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. अजूनही बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी येण्यास इच्छुक आहेत. मात्र या ठिकाणी इतर सोयीसुविधा पाहता त्यांना ईलक यांनी सध्यातरी हिरवा झेंडा दाखवलेला नाही, चंद्रकांत ईलक यांनी आजपर्यंत निशुल्क पद्धतीने प्रशिक्षण दिले आहे.
प्रशिक्षक चंद्रकांत इलके आता बुलडाणा पोलीस दलामध्ये कार्यरत असून ते आपली नोकरी करून या विद्यार्थ्यांना निशुल्क प्रशिक्षण देत आहेत. मात्र या विद्यार्थ्यांना पूर्णवेळ प्रशिक्षणासाठी ईलक यांना डेप्यटेशनवर क्रीडा विभागात रुजू करावे, जेणेकरून देशाच्या नावलौकिकात भर टाकण्यासाठी अनेक तिरंदाज खेळाडू निर्माण करता येतील अशी मागणी वस्तू उद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली आहे...
यासर्व तिरंदाज खेळाडूंना आजही स्वतःचं मैदान नसल्यामुळे बियाणे महामंडळाच्या ताब्यात असलेल्या मैदानावरच ते सराव करत आहेत... बाहेरून येणाऱ्या सर्व मुले-मुली खेळाडूंना राहण्याची आणि जेवणाची अजूनही शासनाकडून व्यवस्था नाही... त्यामुळे जिल्हा प्रशासन किंवा क्रीडा विभागाने या खेळाडूंना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा भावनाही यावेळी खेळाडूंनी व्यक्त केल्या आहेत...
तर शासकीय जागेवर तालुका क्रीडासंकुल उभारण्यासाठी क्रीडा विभागाने पावले उचलली असून, त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी देखील उपलब्ध झाला आहे. या क्रीडासंकुलात प्राधान्याने तिरंदाज खेळाडूंसाठी मैदानाची आणि साहित्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, आणि पाच कोटी रुपयापर्यंत निधी उपलब्ध झाल्यास या सर्व विद्यार्थ्यांची राहण्याची आणि जेवणाची देखील सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याचे तालुका क्रीडा अधिकारी यांनी सांगितले आहे...
बुलडाण्यामध्ये तिरंदाज खेळासाठी अत्यंत उत्कृष्ट प्रशिक्षक लाभले असून आता प्रशासनाने या खेळाडूंना इतर सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यास ऑलिंपिक स्पर्धेमध्ये नक्कीच हे सर्व खेळाडू देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवू शकतील अशी अपेक्षा प्रशिक्षकांनी व्यक्त केली आहे.