#BuddhaJayanti बुद्धाच्या जीवनावर बनविला 'किसा गौतमी' लघुपट
X
सोलापूर : जगात दुःख असून दुःखाला कारण आहे. त्याचा निरोध ही करता येतो. त्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी अष्टांगिक मार्ग सांगितला आहे. भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटनेवर सोलापूर येथील डॉ. औदुंबर मस्के आणि त्यांच्या टीमने 'किसा गौतम' हा लघुपट बनविला असून त्याला जगभरातून आणि भारतातील अनेक फिल्म फेस्टिव्हल मधून गौरविण्यात आले आहे. हा लघुपट किसा गौतमी या महिलेच्या जीवनावर आधारित असून भगवान गौतम बुद्धांनी तिला दिलेल्या उपदेशानुसार ती कशी दुःख मुक्त होते. यावर या लघुपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे.
मूल मेल्यानंतर गौतमीला विरह सहन होत नाही
या चित्रपटाचे दिग्दर्शक रवी गजधाने यांनी या चित्रपटाच्या कथेबद्दल बोलताना सांगितले की, किसा गौतमीला आपल्या मुलाच्या बाबतीत खुपच आसक्ती असते. त्या मुलाशिवाय ती जगू शकत नाही. अशी ती महिला असते. एके दिवशी तिचा मुलगा सर्पदंशाने मृत्यू पावतो. ती मुलगा वाचवा म्हणून वेडीपीशी होऊन गावात सैरावैर फिरत असते. तिची ही अवस्था पाहून गावातील एकजण सांगतो की, तू भगवान गौतम बुद्धांकडे मूल घेऊन जा तेच त्याला जिवंत करतील. त्याच वेळेस किसा गौतमी मृत मुलाला घेऊन गौतम बुद्धांकडे जाते. परंतु गौतम बुद्ध तिची मानसिक अवस्था पाहून तिला आपण काही समजावण्याचा प्रयत्न केला तर ती समजण्याचा प्रयत्न करणार नाही. अशी त्यांना खात्री पटते. त्यामुळे गौतम बुद्ध तिला एक गोष्ट करायला सांगतात.
ज्या घरात आजपर्यंत कोणी मेलेले नाही त्या घरातून मोठभर मोहरी घेऊन ये
भगवान गौतम बुद्ध किसा गौतमी ला मुलाला जिवंत करण्यासाठी गावातील ज्या घरातील आजपर्यंत कोणी मेलेले नाही,त्या घरातून मूठभर मोहरी घेऊन ये, तरच तुझे मूल जिवंत होईल. हे ऐकून तिला आनंद होतो. मृत मुलगा घेऊन किसा गौतमी गावातील प्रत्येक घरात मोहरी मागते,पण प्रत्येक घरातील कोणी ना कोणी मेलेले असते. ती दिवसभर नगरामध्ये अशा घराचा शोध घेत असते,पण तिला ते मिळत नाही. शेवटी तिला असे समजते की,"जे उत्पन्न झालेले आहे,ते नष्ट होणार आहे". असा बोध तिला या घटनेतून समजतो आणि दुःखातून मुक्त होण्यासाठी किसा गौतमी पुन्हा बुद्धांकडे येते. याचना करते मला दुःखातून मुक्त करा. त्यावेळी भगवान गौतम बुद्ध तिला अष्टांगिक मार्गाचा सदधम्म सांगतात. त्याचबरोबर तिला अनापान आणि विपश्यना करायला शिकवतात. विपश्यनेच्या आधारे किसा गौतमी स्वतः मधील विकार घालवते व ती दुःख मुक्त होते. ती अरहंत पदापर्यंत पोहचते. हे या लघुपटातून दाखवण्यात आले आहे.
भगवान गौतम बुद्धांच्या संघात महिलांना मानाचे स्थान होते
अडीज हजार वर्षापूर्वी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या संघात महिलांना मानाचे स्थान होते. ज्या काळात स्रियांना पुरुषांच्या बरोबर समानता मिळत नव्हती. त्या काळात भगवान गौतम बुद्धांनी स्रियांना समानतेने जगता यावे. यासाठी स्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान दिले. त्यांनी आपल्या संघात भिक्षुनी संघाची स्थापना केली होती. त्या काळात भगवान गौतम बुद्धांनी स्रियांना मानाचे स्थान देऊन त्यांचा सन्मानच केला होता. असे या लघुपटाची प्रोड्युसर श्रुष्टी कसबे हिने सांगितले.
अडीज हजार वर्षांपूर्वीचा कार्यकाळ दाखवताना आल्या अडचणी
या चित्रपटाचे आर्ट डायरेक्ट ऍड. पवन भालेदार यांनी सांगितले की, या लघुपटातून अडीज हजार वर्षांचा कार्यकाळ दाखवताना विविध अडचणीचा सामना करावा लागला. त्याकाळात सध्याच्या युगातील कोणतीही वस्तू दिसता कामा नव्हते. त्याकरिता आम्ही अनेक लोकेशन पाहिली. शेवटी स्मशानभूमीत ही गेलो,पण तेथे आजच्या युगातील भिंती होत्याच. त्यामुळे तेथे शुटिंग घेता आले नाही. शेवटी अनेक ठिकाणे फिरून झाल्यानंतर सोलापुरातच लोकेशन मिळाले. अशा प्रकारे या चित्रपटा समोर असणारी आवाहने पेलली.
भगवान गौतम बुद्धांचा गेटअप करताना आल्या अडचणी
या चित्रपटाच्या मेकअप आर्टिस्ट स्मिता आबूटे यांनी सांगितले की, चार आर्यसत्य लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न या लघुपटातून केला आहे. जगात दुःख आहे आणि दुःखाला कारण आहे. हे चार आर्य सत्यात सांगितले आहे. त्यावर मात करण्यासाठी अष्टांगिक मार्गाचा अवलंब करण्यास भगवान गौतम बुद्धांनी सांगितले आहे. या फिल्मसाठी भगवान गौतम बुद्धांचा गेटअप करताना विविध प्रकारची काळजी घ्यावी लागली. बुद्धांची जी 32 लक्षणे होती ती जास्तीत-जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या चेहऱ्याचा लांबट भाग आणि कपाळ, नाकाची ठेवण यांची विशेष काळजी घेण्यात आली. त्यांच्या डोळ्यांचा आकार मोठा होता. त्यामुळे पांढरे काजळ आणि काळे काजळ वापरावे लागले. मोठे कान आणि लांबट चेहरा दाखवण्यासाठी कंट्रोलिंग्ज करण्यात आले होते. बुद्धांना पुढचा जन्म नव्हता,असे म्हटले जाते. त्यामुळेच त्यांच्या हातावर भविष्य रेषा नव्हत्या. या लघुपटात भविष्य रेषा दाखवण्यात आल्या नाहीत. भगवान गौतम बुद्धांचा गेटअप करताना अशा प्रकारच्या विविध अडचणीचा सामना करावा लागला. असे स्मिता अबुटे यांनी सांगितले.
भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातील महत्वाच्या घटना वैशाखी पौर्णिमेला घडल्या
तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना वैशाखी पौर्णिमेला घडल्या आहेत. याच पौर्णिमेला त्यांचा जन्म, विवाह, ज्ञानप्राप्ती,महापरिनिर्वाण झाले होते. त्यामुळे ही पौर्णिमा अतिशय महत्त्वाची आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध दिवसातून एकवेळेस जेवण करत असत. ध्यान धारणा करायचे. रात्री लवकर झोपायचे. अशी त्यांची विशिष्ट जीवनशैली होती. जगामध्ये दुःख असून ते निवारण्याचा मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग आहे. जे दुःख निर्माण होते ते आसक्तीमुळे होते. आपण कुठल्याही गोष्टींबद्दल आसक्ती बाळगतो. ज्यावेळेस आपल्याला ती गोष्ट मिळत नाही. त्यावेळेस आपण दुखी होतो. हे आपल्याला टाळायचे असेल तर अष्टांगिक मार्गाचा लोकांनी वापर करावा. भगवान गौतम बुद्धांची भूमिका साकारत असताना मोठे आवाहन होते. अगोदर श्रामनेर शिबीर केले असल्याने चिवर परिधान करण्यास अडचणी आल्या नाहीत. हे चिवर अंगावर घेत असताना भिक्षु संघाची परवानगी घेण्यात आली होती. असे या चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेल्या डॉ. औदुंबर मस्के यांनी सांगितले.