Ground Report : बोगस कीडनाशकाच्या फवारणीमुळे द्राक्ष बागांचे कोटयवधींचे नुकसान
सध्या द्राक्ष तोडणीचा हंगाम सुरू असून बाजारात मोठ्या प्रमाणात द्राक्ष विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. द्राक्षांना चांगला भाव मिळू लागला आहे. शेतकरी वर्षभर विविध संकटं झेलत या बागांचे संवर्धन करत असतो.या बागांवर विविध प्रकारच्या औषधांची फवारणी केली जाते.शेतकरी योग्य हंगामात बागांची छाटणी करून रासायनिक फवारण्या करतात.त्यांची देखभाल चांगल्या प्रकारे करतात.दिवसेंदिवस बागायती शेतीचे क्षेत्र वाढू लागले आहे. या वाढत्या शेतीला रासायनिक औषधे व खतांची गरज लक्षात घेता बाजारात बोगस खते आणि रासायनिक खतांचा सुळसुळाट झाला आहे, प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा रिपोर्ट.
X
यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊन शेतीला फटका बसू लागला आहे.यासाठी शासनाने वेळीच कडक पाऊले उचलून अशा बोगस खते व रासायनिक औषधे विकणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांतून करण्यात येऊ लागली आहे.सध्या बाजारात खतांच्या व रासायनिक औषधांच्या किंमती गगनाला भिडल्या असताना शेतकऱ्यांची अशी जर फसवणूक होत,असेल तर त्याला जबाबदार असणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी आता शेतकऱ्यांतून होऊ लागली आहे.खतांसाठी व रासायनिक औषधांसाठी शेतकरी वर्षाला लाखो रुपये खर्च करत असतात.त्यात अशा बोगस औषधांमुळे शेतकऱ्यांची घोर निराशा होत असून त्यांची पिके वाया जाऊ लागली आहेत.असाच प्रकार सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात उघडकीस आला असून तशा प्रकारचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
20 एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात बावी येथे बोगस खतांचे प्रकरण ताजे असताना आता पंढरपूर तालुक्यातील कासेगाव,तणाळी गावच्या परिसरात द्राक्ष बागावरील मिलिबग रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पायरोबन नावाचे कीडनाशक द्राक्ष बागांच्या बुडावर टाकल्याने त्या जुळू लागल्या आहेत.द्राक्षांचे घड लाल पडून ते जळू लागले आहेत.तर फांद्या चिरु लागल्या असून त्याही जळू लागल्या आहेत.सध्या द्राक्ष तोडणीचा हंगाम सुरू असताना हातातोंडाला आलेले द्राक्षेचे पीक वाया जाऊ लागल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहू लागले आहेत.सध्या तरी 20 एकर द्राक्ष बागांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.या बोगस औषधाचा परिणाम द्राक्ष बागांना धुरळणी केल्यानंतर 8 दिवसांनी दिसून येत आहे.त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक केली जात आहे.या जळू लागलेल्या द्राक्ष बागांना कृषी अधिकारी,मंडल अधिकारी,तलाठी यांनी भेट दिली असून द्राक्ष बागांचा पंचनामा करून शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले असल्याचे तेथे उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले.
अनिल गवळी या शेतकऱ्याने 30 ते 40 लाख कर्ज घेऊन उभी केली होती द्राक्ष बाग
30 ते 40 लाख रुपयांचे कर्ज घेऊन द्राक्ष बाग उभी केली असल्याचे कासेगाव येथिल शेतकरी अनिल गवळी यांनी सांगितले. अनिल गवळी यांचे द्राक्ष बागेचे 5 एकर क्षेत्र आहे.या द्राक्ष बागेची चांगली फळधारणा झाली होती.बागेवर मिलिबाग रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये,यासाठी पायरो बन नावाचे कीडनाशक औषध झाडांच्या बुडावर टाकले होते.या औषधामुळे त्यांच्या बागेच्या फांद्या जळू लागल्या आहेत.द्राक्ष बागांची झाडेसुद्धा जळतील की, काय अशी भीती त्यांनी बोलताना व्यक्त केली.यावेळी अनिल गवळी यांनी बोलताना सांगितले की,आमच्या बागेचे प्रचंड असे नुकसान झाले आहे. याचबरोबर कासेगाव आणि तणाळी गावच्या परिसरातील 8 ते 10 शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांचे नुकसान या बोगस औषधामुळे झाले आहे.आमच्या 5 एकर बागेत 100 ते 125 टन माल निघाला असता.सुदैवाने या वर्षी द्राक्ष चांगल्या प्रकारची आली होती.कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या 2 वर्षांपासून अडचणीत आलो असताना द्राक्ष बाग कशीतरी डेव्हलप केली होती.या झाडांवर क्लोरोपायरीस नावाची पावडर टाकली होती.त्यामुळे चांगल्या स्थितीत असलेल्या बागेचे प्रचंड नुकसान झाले आहे.या औषध निर्माण करणाऱ्या कंपनीचे नाव अँमिको पेस्टिसाइड लिमिटेड मुंबई असे आहे.या औषधाच्या संदर्भात कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.पण त्यांनी दखल घेतली नाही.या पावडरमुळे द्राक्ष बागेची वाढ खुंटून द्राक्ष घड लाल पडू लागले आहेत.काही घड जळू लागले आहेत.यामुळे माझे वैयक्तिक 70 ते 80 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बाग डेव्हलप करण्यासाठी 30 ते 40 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.ते कसे फेडायचे असा प्रश्न समोर उभा राहिला आहे.बागेचे खूपच नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन नुकसानभरपाई द्यावी, असे शेतकरी अनिल गवळी यांना वाटते.
कासेगाव येथील द्राक्ष बागायतदार संघाचे महाराष्ट्र राज्य संचालक माणिकभाऊ गणथडे यांनी बोलताना सांगितले की,कासेगाव परिसरामध्ये दत्तात्रय गवळी,सुनील गवळी यांनी द्राक्ष बागेवर मिलिबाग रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये,यासाठी कृषी कल्याण केंद्र पंढरपूर येथून पायरीबन नावाचे क्लोरोपायरीस आणून बागेवर त्याची धुळवणी केली.पण धुळवणीच्या 4 ते 5 दिवसानी असे दिसून आले की,द्राक्षांचे घड खालून करपत चाललेले आहेत.पाने करपू लागली आहेत.कांड्याची अवस्था बेकार झाली आहे.त्या फुगून चिरु लागल्या आहेत.असे द्राक्ष बागेचे नुकसान होऊ लागले आहे.या परिसरातील आणखीन 4 ते 5 शेतकऱ्यांचे नुकसान प्रत्यक्षात दिसून येऊ लागले आहे.आता फवारलेल्या औषधांचा 6 ते 7 दिवसानंतर वाईट परिणाम दिसून येत आहे.आणखीन किती शेतकऱ्याचे नुकसान होईल याची कल्पना आता सध्या तरी करू शकत नाही.झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरला नाही.असे शेतकरी माणिकभाऊ गणथडे यांनी बोलताना सांगितले.
अवकाळी पावसाचा द्राक्ष बागांना फटका
सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने काढणीला आलेल्या गहू,ज्वारी,द्राक्ष बागा यांच्यावर काही प्रमाणात अवकाळी पावसाचा परिणाम झाला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे.तसेच जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे.त्यामुळे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.अचानक असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
आमदार प्रशांत परिचारक यांनी द्राक्ष बागेला भेट देऊन केली पाहणी
विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी या नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पहाणी करून याबाबतची माहिती राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांना दिली असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.तसेच बोगस कीडनाशक औषधे विकणाऱ्या दुकानदार आणि कंपनीवर कारवाई करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी प्रशांत परिचारक याच्याकडे केली.
द्राक्ष बागेच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे कधी?
कासेगाव आणि तणाळी गावच्या परीसरातील शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार क्लोरोपायरी बनची द्राक्ष बागांच्या खोडावर धुरळणी केल्याने नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.त्यानुसार द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे.या क्लोरोपायरी बनची पावडर ओरिजनल आहे की,बोगस याची तपासणी करण्यासाठी लॅब कडे पाठवली आहे.त्याचा रिपोर्ट काही दिवसात येईल.झालेल्या नुसानीचे पंचनामे करून शासनाकडे पाठवू असे उपविभागीय कृषी अधिकारी सर्जेराव तळेकर यांनी सांगितले.