आरोग्य विभागाच्या परीक्षेत दिव्यांग परीक्षार्थ्यांचा संभ्रम, आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण
X
राज्याच्या आरोग्य विभागाच्या ड वर्गाची परीक्षा रविवारी होणार आहे. पण आधीसारखीच गोंधळाची मालिका आताही सुरू राहणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रविवारी होणाऱ्या या परीक्षेमध्ये दिव्यांग परीक्षार्थी संभ्रमावस्थेत अडकले आहेत.
काही दिवसांपूर्वी दिव्यांग विद्यार्थ्यांकडे आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले असल्याचे धक्कादायक वास्तव Max Maharashtra ने मांडले होते. त्यानंतर त्याची दखल घेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दिनांक 5 ऑक्टोबर 2021 रोजी सुधारित परिपत्रक प्रकाशित करण्यात आले होते. मात्र रविवारी पार पडणाऱ्या परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना दिल्या गेलेल्या परीक्षा पत्रकावर 2014 च्या दिव्यांगांसाठी असलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
प्रत्यक्षात मात्र 2021 मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. यामुळे राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. 2014 च्या शासन निर्णयानुसार दिव्यांग विद्यार्थी वरच्या वर्गातील लेखनिक परीक्षेकरिता घेऊन जाऊ शकतात. पण 2021 च्या शासन निर्णयानुसार उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेच्या एक वर्ग खाली अथवा देत असलेल्या परीक्षेच्या पात्रतेच्या एक वर्ग खाली लेखनिक असावा, अशी अट आहे.
परीक्षा पत्रकावर 2014 चा उल्लेख व प्रत्यक्षात 2021 शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी यामुळे या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आता आम्ही वेळेवर लेखनिक कसे शोधावे असा प्रश्न उमेदवारांकडून विचारला जात आहे. लेखनिक मिळाले तरीसुद्धा त्यांचे शाळेतील बोनाफाईड वेळेवर कुठून आणणार हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे.
या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांना लेखनिक नसतील अशा विद्यार्थ्यांना आरोग्य विभाग लेखनिक पुरवणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र यामुळे आमच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे असं या उमेदवारांकडून सांगण्यात येत आहे. आम्ही यासंदर्भात आरोग्य विभागाची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी आरोग्य विभागाच्या संचालिका अर्चना पाटील यांना फोनवरून अनेक वेळा संपर्क केला मात्र त्यांनी फोन घेतला नाही. पण यासंदर्भात आम्ही आरोग्य विभागाची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले काही दिवसांपूर्वी आम्ही यासंदर्भात सुधारित परिपत्रक प्रकाशित केले आहे मात्र राज्यातील अनेक विद्यार्थ्यांपर्यंत हे परिपत्रक पोहोचलाच नसल्याचं दिव्यांग विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.