पंकजा मुंडेंच्या जिल्ह्यात भाजप विरुद्ध भाजप आखाड्यात...
X
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या जिल्ह्यात भाजप विरुद्ध भाजप असाच संघर्ष सोमवार पासून पहायला मिळत आहे . बीड जिल्ह्यातील आष्टी येथील एका भाजप गटाची हनूमान तालीम , दुसऱ्या भाजप गटाने पाडल्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. यामुळे तालमीच्या राजकारणातून बीड जिल्ह्यात, भाजप विरुद्ध भाजप आखाड्यात, उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे..
आष्टी तालुक्यातील मुर्शदपूर जिल्हा परिषद गटातून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या निता शिंदे यांचे पती व भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सतिश शिंदे आणि भाजपचे आमदार सुरेध धस व त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. तीन दिवसापूर्वी आमदार धस यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी हनूमान तालीम पार पाडली होती. याबाबत धस व त्यांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करा, या मागणीसाठी सतिश शिंदे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी आष्टी येथील तहसिल कार्यालयावर उपोषण सुरू केले होते.
सोमवारी सतिश शिंदे यांची प्रकृती उपोषणामुळे खालावल्याने त्यांना उपचारासाठी बीड जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यांनी जोपर्यंत जिल्हा प्रशासन हनूमान तालीम पाडणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस व त्यांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत उपचार घेणार नाही. अशी भूमिका घेतल्याने प्रशासन देखील हादरले.
शेवटी जिल्हाप्रशासनातील काही अधिकार्यांनी मध्यस्थी करून उपचार घेण्यास विनंती केली. जिल्हा शुल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सतिश शिंदे यांची तपासणी करुन औषधोपचार केले असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या गटबाजीचा फटका भाजपला येणाऱ्या निवडणूकींत बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कार्यकर्ते पक्षातीलच दुसऱ्या गटाच्या नेत्यांविरोधात उघडपणे बोलताना दिसत आहे . दरम्यान बीड जिल्ह्यात तालमीवरून भाजप विरुद्ध भाजप आखाड्यात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.