भाजप किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षांकडून शेतकरी कुटुंबाला मारहाण...
X
जालना – भाजपच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक जालन्यात सुरू असतांना दुसरीकडे जालना जिल्ह्यातील निवडुंगा गावातील एका शेतकरी कुटुंबाला भाजपच्याच किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षकांकडून मारहाण केल्याचा व्हिडिओ वेगानं व्हायरल झाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी पोटाच्या बेंबीपासून बोलणारे राजकीय नेते, कार्यकर्ते प्रत्यक्षात वागतात कसे याचा प्रत्ययच यानिमित्तानं आला आहे. मारहाण करणाऱ्यांमध्ये भाजपच्या किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर यांचा समावेश आहे. भवर आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून शेतकरी कुटुंबातील सदस्याना भर रस्त्यातच मारहाण करत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. मारहाण करणाऱ्यांनी या कुटुंबातील एका महिलेलाही मारहाण केल्याचं व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे. यासंदर्भात रावसाहेब भवर आणि जिल्हाध्यक्ष रमेश भांदरगे यांच्याशी संपर्क साधून नेमकी घटना समजून घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाहीतर या शेतकरी कुटुंबाला खड्ड्यात टाकून जेसीबीच्या साहाय्याने खड्डा बुजवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शेतकरी कुटुंबाने केला आहे. विशेष म्हणजे शहरातच भाजप कार्यकारिणीची बैठक सुरू असतांना हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रावसाहेब भवर यांनी निवडुंगा येथील शेतकरी ज्ञानेश्वर खांडेभारड यांच्या शेतात विहिरी खोदण्यासाठी जेसीबी मशीन आणली होती. आपल्या शेतात अचानकपणे जेसीबी मशीन आणल्यामुळे या कुटुंबाने त्यांना विरोध केला. त्यामुळे भवर आणि त्यांच्या समर्थकांनी या कुटुंबाला जबर मारहाण केली. या घटनेनंतर खांडेभारड कुटुंबांनी पोलिसांत धाव घेतली असून तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही.
पीडित कुटुंबाच्या पाठीशी शेतकरी संघटना
ज्ञानेश्वर खांडेभारड आणि त्यांच्या कुटुंबियांना भाजपच्या किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर यांच्याकडून झालेल्या मारहाणप्रकरणाची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्यावतीनं उद्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिलं जाणार असल्याचं शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी लकडे यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलतांना सांगितलं.
पाहा हा व्हिडिओ...
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/238078333789404/