Home > मॅक्स रिपोर्ट > आकाश जाधव हत्या प्रकरण, आणखी एक रोहित वेमुला?

आकाश जाधव हत्या प्रकरण, आणखी एक रोहित वेमुला?

रोहित वेमुलाचा बळी जातीव्यवस्थेने घेतला असा आरोप होतो. पण देशात अनेक रोहित वेमुला बळी जात आहेत. मुंबईतही असाच प्रकार घडला आहे आणि त्या तरुणाच्या कुटुंबाचा आता न्यायासाठी संघर्ष सुरू आहे.

आकाश जाधव हत्या प्रकरण, आणखी एक रोहित वेमुला?
X

अनुसूचित जाती आणि जमातींच्या लोकांवर अन्याय होऊ देणार नाही, असे दावे वारंवार सत्ताधाऱ्यांकडून केले जातात. सत्ताधारी कोणत्याही पक्षाचे असले तरी हे दावे कायम असतात पण अन्याय आणि अत्याचार काही कमी होत नाही. काही वर्षांपूर्वी जातीवादाचे रुप किती भीषण आहे हे रोहित वेमुलाच्या आत्महत्येने सिद्ध केले आहे. तरीही यंत्रणा आणि सत्ताधारी यातून कोणताही धडा घेत नाहीयेत, त्यामुळेच आजही वंचितांना न्याय मिळण्यासाठी वणवण भटकावे लागते आहे. असाच प्रकार राज्याची राजधानी मुंबईमध्ये घडला आहे.

मुंबईमध्ये नोव्हेंबर महिन्यात आकाश जाधव या मागासवर्गीय तरुणाचा काही गुंडांनी मारहाण करत खून केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. सांताक्रुझ पूर्वमध्ये राहणाऱ्या आकाश जाधव या तरुणावर वस्तीतील गुंडांनी जातीवाचक शिवीगाळ करत हल्ला आणि मारहाण केली होती, असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. तसेच आकाश जाधव याच्या घरातील नळाचे पाणीही बंद केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत तक्रार दिली पण पोलिसांनी ती अॅट्रोसिटी कायद्याखाली नोंदवली नाही, असाही आरोप त्याचे कुटुंबिय करत आहेत. राजकीय दबावामुळेच पोलिसांनी कारावई तकेली नाही असा आरोप आकाशची आई सुप्रिया जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या खुल्या पत्रात केला आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी विविध सामाजिक संघटनांनी १८ जानेवारीला वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध धरणे आंदोलन सुद्धा केले.

त्या दिवशी नेमके काय झाले?

आकाशच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश जाधव हा २२ वर्षांचा तरुण सांताक्रूझमधील वाकोला भागात राहत होता. आकाशच्या घरची परिस्थिती खूप हलाखीची होती. वडिलांचे छत्र नसल्याने घराची जबबादारी त्याच्यावरच होती. तो झोमॅटो कंपनीमध्ये कामाला होता. 1 नोव्हेबरच्या रात्री 12:15 मिनिटांनी तो आपल्या घरी परतला. आकाशचे काही मित्र त्याला भेटण्यासाठी बाहेरून त्याच्या परिसरात आले होते. त्याच दरमान्य आकाश ज्या भागात राहतो त्या भागातले काही तरुण दारू पिऊन तिथे उभे होते. आकाशच्या मित्रांनी तिथे सिगारेट ओढण्यास तिथल्या स्थानिक मुलांनी विरोध केला आणि आकाशला याबाबत जाब विचारला. त्यानंतर त्यांनी आकाशला मारहाण करण्यास सुरू केली.

पण त्याचे मित्र आकाशला एकटे सोडून पळून गेले आणि त्यानंतर नशेत असलेल्या त्या तरुणांनी आकाशला जबर मारहाण सुरुवात केली. यात आकाश बेशुद्ध झाला. त्यानंतर गल्लीतील काहींनी भांडण सोडवलं आणि आकाशच्या घरच्यांनी त्याला घरी नेले. पण त्याच रात्री त्या नशेतील तरुणांनी आकाशच्या घरावर हल्ला केला. पण बहीण अक्षदा हिने बाहेर येऊन त्या मुलांचा सामना केला. त्यानंतर ते गुंड निघून गेले. पण त्याच रात्री आकाशला उलट्या सुरू झाल्या. दुसऱ्या दिवशी आकाशला सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण तब्येतीत फरक पडत नसल्याने आकाशवर सायन हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. पण तरीही त्याच्या प्रकृतीत सुधारणी झाली नाही. २ डिसेंबर रोजी आकाशला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आणि 4 डिसेंबरच्या रात्री आकाशने अखेरचा श्वास घेतला.


आकाशची आई आणि बहिणीचा संघर्ष

आकाश जाधव यांच्या आई सुप्रिया जाधव यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितले की, "या हल्ल्याबाबत आपण वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी आमची तक्रार नोंदवून न घेता आम्हाला हाकलून दिले. हल्ल्यानंतर आकाशची तब्येत बिघडल्यानंतर त्याला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथूनही पोलिसांना ई-मेलद्वारे कळवण्यात आले. मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही. नंतर आकाशची तब्येत अधिक बिघडल्यानंतर त्याचे पोटाचे ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला, असे असले तरी आम्ही सांगितलेली आरोपींची नावे पोलिसांनी नोंदवली नाहीत. तसेच जातीवाचक शिवीगाळ, धक्काबुक्की करणे हे प्रकारही एफआयआरमध्ये नोंद न करता अगदीच किरकोळ कलमे लावण्यात आली. आरोपींना अॅट्रोसिटी कायदा लावला नाही आणि सर्वांना जामिनावर सोडण्यात आले. ४ डिसेंबर या दिवशी कुपर रुग्णालयात आकाशचा मृत्यू झाला".

आरोपी राजकीय पक्षांशी संबंधित?

"या प्रकरणातील सर्व प्रमुख आरोपींवर जीवघेण्या मारहाणीची आणि जातीवाचक अन्यायाची कठोर कलमे लावण्यास संबंधित पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी नकार दिला, कारण संबंधित आरोपी हे सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्याचा आरोप आकाशच्या आईने केला आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याशी संबंधित गुंडांनी ही माराहण केल्याचा आरोप मृत आकाशच्या आईने केला आहे. त्यांच्या राजकीय दबावामुळे पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ आणि हलगर्जीपणा करत आरोपींना अप्रत्यक्षपणे वाचवण्याचा प्रयत्न केला असा त्यांचा आरोप आहे.


आकाश जाधव यांची बहीण अक्षदा जाधव यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितले की, "आम्ही ज्या भागात राहतो त्या ठिकाणी बौद्ध समाजाचे आमचे एकच घर आहे. त्यामुळे आसपास राहणाऱ्या लोकांकडून आम्हांला योग्य ती वागणूक मिळत नव्हती आणि त्या लोकांनी माझ्या भावाची हत्या केलीच. पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हांला पाणी भरून दिले नव्हते. पोलिसांनी आरोपींना मदत करून त्यांना जामीन मिळवून दिला, त्यांना मोकाट सोडलं आहे. आम्ही पोलिसांवर दबाव आणून त्या आरोपींवर हत्या आणि अट्रोसिटीचा गुन्हा नोंदवून घेतला होता. पण तरीदेखील त्यांना अजूनपर्यंत पोलिसांकडून अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे आम्ही खूप हताश आहोत आणि आम्ही आता न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आहोत."

पोलिसांचे म्हणणे काय?

यासंदर्भात आम्ही झोन क्रमांक 9 चे DCP मंजुनाथ शिंगे यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की, "आकाश जाधव मृत्यू प्रकरणात आम्ही गुन्हा नोंद केला आहे आणि आकाश जाधवच्या मारेकऱ्यांवर आम्ही 302 चा गुन्हा नोंदवलेला आहे तसेच आम्ही अट्रोसिटीचा गुन्हाही नोंदवला आहे. आम्ही कोणत्याही राजकीय दबावाखाली काम करत नाही आहोत. आम्ही निष्पक्षपणे या गुन्ह्याची चौकशी केली आहे.

परिवहन मंत्री आणि माजी महापौरांचे म्हणणे काय?

आरोपांसंदर्भात आम्ही माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. "आकाश जाधव याचा मृत्यू झाला ते अत्यंत वाईट झालं आहे. या प्रकरणाशी माझा काहीच संबंध नाही. या प्रकरणातील दोन आरोपी हे मनसे पक्षाचे आहेत आणि शिवसेनेला बदनाम करण्याचं काम केलं जातं आहे, आम्ही कुठेही पोलिसांच्या कामांमध्ये हस्तक्षेप केलेला नाही. घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे." आम्ही परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. प्रतिक्रिया मिळाल्यानंतर बातमीमध्ये अपडेट केले जाईल. महाडेश्वर यांनी मनसेवर केलेल्या आरोपांबाबत आम्ही मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना संपर्क साधला तेव्हा मारहाण कऱणाऱ्यांमध्ये मनसेचे तरुण होते हे शिवसेनेने सिद्ध करुन दाखवावे, असे म्हटले आहे.

साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्यांनी कारवाईची केली मागणी

मारहाणीचा बळी ठरलेला आकाश जाधव याची आई सुप्रिया जाधव यांच्यासाठी 18 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले गेले. आकाशच्या आईने मुख्यमंत्र्यांना निवेदन देणारे पत्रसुद्धा दिले आहे. आरोपींना तत्काळ अटक करून पीडित कुटुंबाला शासनाने मदत करावी अशी मागणी साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. यामध्ये प्रतिमा जोशी, डॉ. माया पंडित, डॉ. प्रज्ञा दया पवार, डॉ. कुंदा प्र. नी. डॉ. वंदना महाजन, कविता मोरवणकर, डॉ. छाया दातार, ज्योती म्हापसेकर, हिरा बनसोड, सुबोध मोरे, डॉ. रमेश कांबळे, सुमेध जाधव आदींचा समावेश यामध्ये आहे.



"सत्ताधारी शिवसेना पक्षातील काही नेते आरोपींना पाठिशी घालत आहेत, असा आरोप जातीअंत संघर्ष समितीचे सदस्य सुबोध मोरे यांनी केला आहे. सुबोध मोरे यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले की, "दलितांवरील अत्याचाराची ही काही पहिली घटना नाही. अशी अनेक दलित हत्याकांड यापूर्वीसुद्धा झाली आहेत. आकाश जाधव हत्या प्रकरणात सरकारी यंत्रणा इतक्या सुस्त का आहेत हा मोठा सवाल इथे उपस्थित होत आहे, आरोपींना कोण पाठशी घालत आहे याची शोध मोहीम पोलिसांनी राबवली पाहिजे अशी आमची मागणी आहे. जे कोणी आरोपी आहेत त्यांचा सत्ताधारी शिवसेनेशी संबंध आहे आणि त्या सगळ्या आरोपींना विश्वनाथ महाडेश्वर आणि मंत्री अनिल परब हे पाठीशी घालत आहेत, असा आमचा ठाम आरोप आहे आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही त्या कुटुंबासाठी लढणार."

रोहित वेमुलाप्रमाणे आकाशही यंत्रणेचा बळी – प्रा. रमेश कांबळे

मुंबई विद्यापीठाचे समाजशास्त्र विभागाचे प्राध्यापक रमेश कांबळे यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितले की, "दलितांनी सन्मानाने आणि समानतेने जगण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा काही समाजकंटकांनी अशाप्रकारे हिंस्त्र कृत्य केल्याची ही काही पहिली घटना नाही. खरं तर जसा रोहित वेमुलाचा बळी हा प्रशासनाने घेतला तसाच आकाश जाधव यांच्या मृत्यूलादेखील प्रशासन जबाबदार आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. कारण त्याला 2 नोव्हेंबरला मारहाण झाली पण अजूनही आरोपी मोकाट आहेत. त्यांना पोलीस पाठीशी घालत आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण हे काही पहिलं प्रकरण नाही, यापूर्वीदेखील दलित हत्याकांडामध्ये असेच काहीसे घडले आहे. त्यामुळे एक व्यापक चिंतन करणे गरजेचं आहे, नाहीतर यापेक्षा पण भयंकर घटनाही दलितांच्या बाबतीत घडू शकते."

या कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य सरकार व पोलिसांची आहे. अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना शासन करण्यासह पीडित व्यक्तीला किंवा कुटुंबाला आर्थिक मदत देणे व त्यांचे योग्य पुनर्वसन करणे हे देखील सरकारचे काम आहे. पण या प्रकरणात सरकारतर्फे त्यांचे कामही झालेले दिसत नाही.

Updated : 28 Jan 2021 7:41 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top