गोगोईंवरील आरोपांची चौकशी करावी - महाधिवक्ता
Max Maharashtra | 11 May 2019 12:58 PM IST
स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगई यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप झाल्यानंतर नेमलेल्या समितीने गोगई यांना क्लीन चीट दिल्यानंतरही हे प्रकरण शांत होण्याची चिन्हं दिसत नाही.
आता रंजन गोगोई यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपा प्रकरणाची तीन निवृत्त न्यायाधीशांच्या समितीमार्फत पुन्हा एकदा चौकशी करावी, अशी सूचना महाअधिवक्ता के के वेणुगोपाल यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी न्या. एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील अंतर्गत समितीला 22 एप्रिलला हे पत्र पाठवले आहे. मात्र, २३ एप्रिलला, ही मागणी देशाचा महाधिवक्ता या नात्यानं नसल्याचं स्पष्टीकरण के.के. वेणुगोपाल यांनी पुन्हा एकदा पत्रादेवारे कळवलं आहे. दरम्यान या पत्राच्या संदर्भातील माहिती के. के. वेणुगोपाल यांनी न्या. एस. ए. बोबडे यांच्या समितीने गोगई यांना क्लीन चीट दिल्यानंतर चार दिवसाने दिली आहे.
न्या. धनंजय चंद्रचूड यांनी देखील या प्रकरणात काही आक्षेप घेतले असून तक्रारदार महिलेला वकिलाचे साह्य घेऊ न देण्यास त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे.. हा केवळ तिच्या प्रतिष्ठेचा प्रश्न नसून अधिकाराचाही प्रश्न आहे, असं चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. या संदर्भात न्या. चंद्रचूड यांनी चौकशी समितीचे अध्यक्ष न्या. एस. ए. बोबडे यांना पत्र लिहिले असून या पत्रात त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा विचार करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
तक्रारदार महिला जेव्हा या चौकशी समितीसमोर आली तेव्हा या महिलेने काही मुद्दे उपस्थित करत या चौकशी समितीतून बाहेर पडली...
1) समितीच्या कार्यपद्धतीविषयी महिलेला कोणतीही पूर्वकल्पना दिली गेली नसल्याचं या महिलेनं म्हटलं आहे.
2) श्रवणदोष, मनात भीती आणि अस्वस्थता असल्या कारणाने वकील देण्यात यावा. ही मागणी तिची पूर्ण करण्यात आली नाही
3) समितीच्या कामकाजाचे ध्वनिचित्रमुद्रण झाले नाही.
4) महिलेने जो जबाब नोंदवला त्याची प्रतही तिला देण्यात आली नाही.
असं या महिलेचं म्हणणं आहे.
त्यामुळे न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने पीडित महिलेला तिचं म्हणणं मांडायला पूर्ण संधी दिली का? तिच्या म्हणण्यात तथ्य नसेल तर तिची बदली सरन्यायाधीशांच्या निवासस्थानातील कार्यालयात का करण्यात आली? या संपूर्ण प्रकरणामध्ये पारदर्शकता होती का? तिच्या कुटुंबातील व्यक्तींना कामावरुन का काढले? या सारख्या अनेक प्रश्नाची उत्तर अजूनही अनुत्तरीतच आहेत…
Updated : 11 May 2019 12:58 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire