Max Maharashtra Impact : विना अनुदानित शिक्षकांच्या व्यथेची विरोधी पक्षनेत्यांकडून दखल
X
कोरोनाचा पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा फटका समाजाती सर्वच घटकांना बसला आहे. विशेष करून शिक्षणक्षेत्राला याची सगळ्यात झळ बसल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत, आता काही प्रमाणात शाळा सुरु झाल्या असल्या तरी त्यांची संख्या मोजकीच आहे. शासकीय सेवेत असलेल्या शिक्षकांना जरी वेतन मिळत असले, तरी विना अनुदानित, खाजगी शाळेतील शिक्षकांचे पगार मात्र बंद आहेत. काही मोजक्या संस्था या शिक्षकांना वेतन देत आहेत. पण तरीही त्यात मोठी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे अशा शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
कोरोनामुळे पालकांची परिस्थती बिकट झाली आहे, अनेकांच्या हातातील नोकऱ्या गेल्या आहेत. तर काहींचे व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामुळे ऑनलाइन शाळेची फी सुद्धा भरणे अवघड झाले आहे. शाळा बंद असल्याने अनेक संस्थाचालकांनी शिक्षकांना पगार दिलेला नाही, त्यामुळे शिक्षकांना कुटुंब चालवणे अवघड झाले आहे. अशाच एका औरंगाबादच्या खाजगी शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकावर चक्क चिकटटेप विकण्याची वेळ आली आहे, तर दुसऱ्या शिक्षकावर शेतात काम करण्याची वेळ आली आहे.
शिक्षकावर सेल्समन म्हणून फिरण्याची वेळ
औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन गावातील दिनेश गोखले हे सुदर्शन प्राथमिक स्कूल या विनाअनुदानित खाजगी शाळेत मुख्याध्यापक काम करीत आहे.. गेल्या 5 वर्षांपासून ते या शाळेमध्ये कार्यरत आहेत. आधी डी.एड त्यानंतर बीएडची पदी त्यांनी मिळवली. पण सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या गोखले यांना तुटपुंज्या पगारावर शिक्षकाची नोकरी करणे भाग पडले, घर चालवण्यासाठी त्यांच्याकडे याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्यामुळे त्यांनी या परिस्थितीत काम कऱण्याचा निर्णय घेऊन कमी पगाराची नोकरी स्वीकारली सुद्धा...
कमी पगारात संसराचा गाडा कसातरी हाकण्याचा प्रयत्न ते करत होते. पण कोरोनाच्य. संकटाने त्यांच्यावर आणखी भीषण परिस्थिती ओढवली. आधीच कमी पगारात काम करत असताना अचानक आलेल्या कोरोनाने गोखलेंचे आयुष्यच बदलून गेले. कोरोनाचा धोका लक्षात घेत सरकारने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला.
शाळा बंद होताच संस्थाचालकांनीसुद्धा शिक्षकांना पगार न देण्याचा निर्णय घेऊन टाकला. पगार बंद झाल्यानंतर काही दिवस कसेतरी काढता आले. मात्र पुन्हा दुसरी लाट आल्याने पगाराचा विषयच संपला होता. त्यामुळे गोखले हतबल झाले. घर तर चालवायचे आहे, त्यामुळे त्यांनी सेल्समन बनण्याचा निर्णय घेतला. दुकानांमध्ये फिरुन चिकटटेप विकण्याचा व्यवसाय त्यांनी सुरु केला आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या सरांनी घडवले, आज त्यांच्याचकडे जाऊन 5 रुपयांची टेप घेता का? असं विचारण्याची वेळ दिनेश गोखले यांच्यावर आली आहे.
शाळेतील नोकरी गेल्याने शेतीत काम
अशीच काहीशी अवस्था औरंगाबाद जिल्ह्यातील रांजणगावातील मनोहर इनामे यांची आहे. शेतात राबराब राबून वडिलांनी शिकवलं. मात्र मुलगा चांगल्या नोकरीला लागेल असे स्वप्न पाहणाऱ्या त्याच बापासोबत शेतात काम करण्याची वेळ इनामे यांच्यावर आली आहे. दुर्गा प्राथमिक स्कूलमध्ये शिकवणारे इनामे यांची कोरोनामुळे नोकरी गेली. इतर ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केला. पण सर्वच शाळा बंद असल्याने नोकरी मिळाली नाही. त्यामुळे अखेर हतबल होऊन त्यांनी गावाकडे जाऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही शिक्षकांची व्यथा Max Maharashtara ने दाखवण्याचा प्रयत्न केला होता.
विरोधीपक्ष नेत्यांकडून दखल
दिनेश गोखले आणि मनोहर इनामे या दोन्ही शिक्षकांची व्यथा Max Maharashtra ने दाखवली होती. या वृत्ताची दखल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी घेतली.. दरेकर यांनी या दोन्ही शिक्षकांची घरी जाऊन भेट घेतली. त्यांच्या व्यथा जाणून घेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना फोन करून विना अनुदानित शिक्षकांच्या बाबतीत सकारत्मक निर्णय घेण्याची विनंती केली. तसेच या दोन्ही शिक्षकांचा प्रत्येकी एक-एक लाखांची मदतसुद्धा केली. तसेच सामान्यांच्या व्यथा मांडणाऱ्या Max Maharashtara चे आभार सुद्धा मानले.
राज्यातील काय आहे परिस्थिती
राज्यातील आकडेवारी पाहिली तर ही संख्या एक लाख ९ हजार ९८९ पर्यंत जाते. तर शिक्षकांचा आकडा साडेसात लाखांपर्यत जातो. राज्यातील साधारण दोन कोटी २५ हजार विद्यार्थी इयत्ता पहिली ते बारावीपर्यत शिक्षण घेत आहे. जवळजवळ २ लाख ५० हजार शिक्षक कायम विना अनुदानित आणि विना अनुदानित शाळात तसेच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये नोकरी करतात. यातील तब्बल ७० टक्के शाळांच्या संस्थाचालकांनी कोरोनामुळे वेतन देणे बंद केलं आहे, असे काही शिक्षकांचे म्हणणे आहे.
जवळ- जवळ २ लाख ५० हजार शिक्षक आहे. यापैकी ७० टक्के शाळा कोरोनामुळे वेतन देत नाही. उर्वरित ३० टक्के शिक्षकांना वेतन कपात करून मिळत आहे. महाराष्ट्रात जवळपास ७०० महाविद्यालय असून, ज्यात २० हजार प्राध्यापक पार्ट टाईम म्हणून काम करतात. मात्र, कोरोनामुळे वर्ग बंद आहेत आणि त्यामुळे पगार सुद्धा बंद आहेत.
संस्थाचालकांची कोंडी
औरंगाबाद येथील टायलंट इंग्लिश स्कूलच्या संस्थापक वैशाली फुटाणे सांगतात की, शाळा बंद असले तरीही आमचा खर्च बंद नाही. शाळेचे भाडे,वीजबिल आणि इतर खर्च सुरूच आहे. त्यात ऑनलाइन शाळामुळे आणखी खर्च वाढले आहे. त्यात पालक फी भरत नाही, त्यामुळे इच्छा असूनही शिक्षकांचे पगार देणे शक्य नाही, त्यामुळे आमची सुद्धा कोंडी झाली असल्याचा वैशाली फुटाणे म्हणतात.
सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष...
विनाअनुदानित शिक्षकांच्या अनुदानासाठी गेली अनेक वर्षे शिकांकडून आंदोलन केले जाते आहे. मात्र सरकार बदलले तरी मागण्या काही मान्य होत नाही. २०१९ मध्ये ऑगस्टमध्ये अधिवेशनात काळात शिक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन केले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आक्रमक झालेल्या शिक्षकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यानंतर तत्कालीन विरोधीपक्षाचे नेते आणि आता सत्तेत असलेल्या पक्षातील नेत्यांनी आंदोलनस्थळी जाऊन शिक्षकांना पाठिंबा दिला होता. मात्र आज सत्तेत आल्यानंतर सुद्धा त्याच शिक्षकांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे. यावर सरकारने तातडीने निर्णय़ घेऊन या शिक्षकांना दिलासा देण्याची गरज आहे.