व्यथा कोकणची - निसर्गाने दिले आणि 'निसर्ग'ने नेले...
max-reports/after-3-month-nisarga-cyclone-kokan-ground-situation-ground-report
X
कोकणातील 'निसर्ग' चक्रीवादळाला ३ महिने पूर्ण झाले. मात्र, परिस्थिती अजूनही तशीच आहे. ३ जुनला कोकणाला वादळी वाऱ्यानं तांडव केलं. या निसर्ग चक्रीवादळाने कोकणचे निसर्ग सौंदर्य हिरावून घेतले. वादळानं झालेल्या नुकसानातून कोकण अजूनही सावरलेलं नाही. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणाचे सर्वात जास्त नुकसान झालेलं असताना याची झळ कोकणवासीयांना अजूनही जाणवत आहे. ३ महिन्यानंतर कोकणातील दापोली, दाभोळ, मंडणगड,आंजर्ले, केळशी ,हर्णै, पाजपंढरी, आडे- पाडले,अडखळ या भागात फिरताना अजूनही 'निसर्ग' चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीचा प्रदर्शन पाहायला मिळतं.
मुळातच २ महिन्याच्या लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झालेलं असताना आता या चक्रीवादळाचा फटका अनेकांच्या अवाक्या बाहेरचा आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे लोकांजवळ संपर्क तुटलेला असताना आडे- पाडले, आंजर्ले अश्या भागात तीन महिन्यानानंतरही मोबाईल नेटवर्क आलेलं नाही. 'निसर्ग' चक्रीवादळानंतर १ ते २ महिने काही गावांना विजेच्या प्रतीक्षेत राहावं लागलं.
यावेळी नुकसानग्रस्त भागात फिरताना तीन महिन्यांनंतरही काही ठिकाणी नारळ आणि पोफळीच्या (सुपारीच्या) वाडीची साफ-सफाई पूर्ण झालेली नाही. आंजर्ले येथील भालचंद्र कोकणे यांच्या बागेचं मोठं नुकसान झालं आहे. यावेळी आम्ही बागायतदार भालचंद्र कोकणे यांना भेटलो. ते सांगतात...
TEJAS BORGHARE
"सरकारनं देऊ केलेली नुकसान भरपाई अपुरी आहे. असं सर्व बागायतदारांचं म्हणणं आहे. निसर्ग चक्रीवादळाने प्रामुख्याने रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झालं आहे. नारळ, सुपारी, आंबा आणि काजूच्या बागांची मोठी हानी झाली आहे. पुढील काही वर्षे शेतकऱ्यांना उत्पन्नच मिळणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मागच्या २ पिढ्यांनी कष्टाने उभ्या केलल्या बागा वन वादळाने भुईसपाट केल्या आहेत. तीन महिने उलटले तरी ३० ते ४० टक्के बागांचे पंचनामेच झालेले नाहीत. सरकारने दिलेली मदत पुरेशी नाही, सरकारच्या मदतीची वाट न पाहता आता बागायतदारांनी बागांचे काम सुरु केलंय "
असं भालचंद्र कोकणे सांगत होते.
नुकसान भरपाई आणि अनुदानाकडे न पाहता उध्वस्त झालेली बाग पुन्हा उभी करण्याच्या तयारीला ते लागले आहेत. जरी पुर्नलागवड करायची झाली तरी सरकारच्या जाचक अटींमुळे करू शकत नाही, त्यामुळे सरकारने जाचक अटी शिथिल कराव्या अशी मागणी बागायतदारांनी केली आहे.
कोकणात महत्त्वाचा असणारा पर्यटन व्यवसाय उद्ध्वस्त झाला आहे. सरकारने केलेल्या मदतीतून फक्त २ महिन्याचं जेवण होऊ शकतो. मात्र, पर्यटन व्यवसाय उभा होऊ शकत नाही. अशी इथल्या पर्यटन व्यवसायिकांची कैफियत आहे. आम्ही पर्यटन व्यावसायिक आणि आंजर्ले येथील केतकी बीचचे मालक मिलिंद निजसुरे यांना भेटलो.
TEJAS BORGHARE
"लॉकडाऊनमुळे मे च्या सिझनलाच पर्यटक आले नाहीत. लॉकडाऊन आणि निसर्ग चक्रीवादळ असं दुहेरी संकट आमच्यावर आलं. ज्या हंगामात कमाई करायची असते. तोच हंगाम लॉकडाऊनमुळे गेला. हे कमी की काय? तोच निसर्ग चक्रीवादळाचं संकट. वादळामुळे तर माझ्या हॉटेलचं जवळ जवळ १५ लाखांचं नुकसान झालंय. २ ते ३ महिने वीज नसल्यामुळे एसी, टिव्हीचं नुकसान झालं आहे. पर्यटन महत्त्वाचा उद्योग आहे. मात्र यंदाचा हंगाम कोरडा गेला"
असं मिलिंद निजसुरे सांगतात.
हर्णै बंदरावर एका मच्छिमार महिलेला भेटलो असता त्या सांगतात
TEJAS BORGHARE
"वादळाच्या दिवशी माझ्या घराचे छप्पर उडून गेले होते. मी माझ्या मुलांना घेऊन आडोश्यासाठी दुसऱ्यांच्या घरी गेली. अजूनही झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाली नाही. पहिली मासेमारी करायची तेव्हा मी एक पापलेट चा मासा १०० रुपयाला विकत होती. मात्र, आताच्या या रोगराईमुळे १० रुपयाला पण मासे कोण घेत नाही? वादळामध्ये सर्व उडालंय तिथे धंदा पण बुडलाय. निसर्ग चक्रीवादळ आणि लॉकडाऊनमुळे व्यवसाय हरवलाय "
असं वनिता रघुवीर सांगतात.
मच्छिमार व्यावसायिक बाळकुष्ण पावसे सांगतात
TEJAS BORGHARE
"मी जन्माला आल्यापासून असं वादळ कधी पाहिलं नाही, झालेली नुकसान देखील कधी पाहिली नाही. लॉकडाऊन आणि 'निसर्ग' चक्रीवादळाच्या नुकसानीला सामोरे जाताना LED फिशिंगचे संकट समोर आहे. सरकार समोर LED फिशिंग बंद करण्यासाठी निवेदन दिले आहेत. मात्र, सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. मत्स खात्याचे आयुक्तांकडे आम्ही आमचे निवेदन दिले आहेत. मात्र तिकडूनही अपेक्षित असं उत्तर आलं नाही. अश्यावेळी पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांनी जगायचं की नाही? असा प्रश्न आमच्यासमोर आहे. जसे शेतकरी आत्महत्या करतात "आता मच्छिमारांवरही आत्महत्या करण्याची वेळ" आली आहे."
असं बाळकुष्ण पावसे सांगतात.
हर्णै बंदरावर माशांचा लिलाव होत असताना मच्छिमार व्यावसायिक पांडुरंग पावसे भेटतात ते सांगतात
TEJAS BORGHARE
" निसर्ग चक्रीवादळाची परिस्थिती भूतो ना भविष्यति स्वरूपाची होती. माझा वय ५० वर्ष आहे. मात्र, एवढ्या वर्षात असं भयानक वादळ मी कधीही पाहिलं नाही. हर्णै, पाजपंढरी गावात स्लॅबची घरं सोडून एकही घर या वादळाच्या कचाट्यातून सुटलं नाही. वादळ झाल्यानंतर सरकारने खूप नंतर मदत केली. मात्र, ती सुद्धा मच्छिमारांपर्यंत पोहोचली नाही. शासनाने सरसकट अनुदान देणं गरजेचं होतं. मात्र, ते दिलं गेलं नाही. अद्यापही लोक तहसीलदार, तलाठी, ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार फेऱ्या मारतात. मात्र, त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नाही."
असं पांडुरंग पावसे सांगतात.
आता तीन महिन्यानंतर वीज, वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरु झाली आहे. मात्र, आडेसारख्या काही गावात अजूनही मोबाईल नेटवर्क नाही. सरकारच्या मदतीची वाट न पाहता कोकणवासियांनी आवरायला घेतलंय.
एका व्यवसायिकाने कोकणी माणसाच्या जिद्दीचे एका ओळीत वर्णन केला आहे
"कोकणातला शेतकरी कोणाच्या मदतीवर अवलंबून न राहता आजही पुन्हा नव्या उमेदीने पूर्वीप्रमाणे उभं राहण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे".
वादळ, पाऊस, पूर अश्या अनेक नैसर्गिक संकटाना सामोरे गेलेला कोकणी माणूस गेल्या १० -१२ वर्षांपूर्वी आलेल्या फयान वादळातून देखील तो उभा राहिला आहे. मात्र, या नुकसानीतून तग धरताना त्याला कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे कोकणवासियांना आता पुन्हा एकदा नव्या उमेदीने या संकटातून उभं राहावं लागेल.