परंपरेला छेद देत आचार्य कुटुंबियांनी आंबेडकर मिशनला केले मंगळसूत्र दान
मंगळसूत्राच्या सोन्याचे आंबेडकरवादी मिशन केद्राला दिलेल्या दानातून खरे सोने होईल असं सांगत रायगडमधील आचार्य कुटुंबाचा स्तुत्य व प्रेरक उपक्रम पुढे आला आहे, प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा रिपोर्ट
X
प्रज्ञासूर्य, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील प्रशासकीय व शाशनकर्ति जमात बनविन्याच्या दृष्टीने आंबेडकरवादी मिशन केंद्र नांदेड येथे सलग अठरा तास अभ्यास उपक्रमाद्वारे हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जातेय. आंबेडकर वादी मिशनमधुन हजारो विद्यार्थी अधिकारी बनत असतात. या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी समाजातील सेवाभावी घटक आपापल्या परिने मद्त करीत असतात. रायगड़ जिल्ह्यातील अलीबाग येथील आचार्य परिवाराने त्यांच्या लग्नाच्या वेळेस केलेले मंगळसूत्र कुटुंबातील चारही सदस्यांच्या संमतीने आंबेडकरवादी मिशन केंद्र प्रमुख आयु. दीपक कदम यांना दान केले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे मिशन जोमाने चालले पाहिजे, बहुजन समाजातील मुले शिकली पाहिजेत यासाठी आंबेडकर मिशन कार्यरत आहे. या मिशनला विविध स्थरातून मदत मिळत आहे. आचार्य कुटुंबियांनी देखील या मिशनला हातभार लावला आहे।
परंपरेला छेद देत शालिनी आचार्य व कुटुंबियांनी आंबेडकर मिशनला मंगळसूत्र दान करून समाजात प्रेरक संदेश देत आदर्श उभा केला आहे. आपल्या भावना व्यक्त करताना प्रा. डॉ. पी. बी. आचार्य म्हणाले की मंगळसूत्राच्या स्वरुपात असलेल्या सोन्याचे आंबेडकरवादी मिशन केद्राला दिलेल्या दानातून खरे सोने होईल, असे आचार्य सर म्हणाले.
हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत लहान विद्यार्थ्यांपासून तर विद्यार्थी व तरुण, पालक व वृद्ध या मंडळींनी या उपक्रमात सहभाग घेतला. . मनोगत व्यक्त करताना आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्राला मंगळसूत्र देत असताना आम्ही भावनिक झालेलो नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा भावनिक होऊ नका असे आवाहन आचार्य सर यांनी केले. हा निर्णय आम्ही कोणत्याही भावनेच्या भरात न घेता आपल्याकडे असलेल्या सोन्याच्या स्वरूपातील बंदिस्त पैशाचा उपयोग SC/ST/OBC/DNT/VJNT/ SBC/मराठा/धार्मिक अल्पसंख्यांकामधील गरीब, होतकरू, बुद्धिमान आणि समाजाशी बांधिलकी असणारे स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या सोन्याच्या वस्तूचे मिशन केंद्राला दिलेल्या दानातून जेव्हा यूपीएससी एमपीएससी (UPSC/MPSC) होऊन आंबेडकरवादी अधिकारी बाहेर पडतील आणि तळागाळातील लोकांचे बुद्धाच्या करुणेने हक्क मिळवून देतील तेव्हाच त्याचे खऱ्या अर्थाने सोने होईल असे ते म्हणाले.
बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानिक अधिकारामुळे आम्हाला शिक्षण आणि नोकरी मिळाली आणि आम्ही स्वाभिमानी, स्वावलंबी झालोत. मात्र हे प्रमाण केवळ ५% इतकेच नगण्य आहे. याचाच अर्थ ९५% समाजाला बाबासाहेबांच्या संविधानिक अधिकाराचा फायदा मिळाला नाही. तो मिळवून देण्याची जबाबदारी ही आता नोकरदार म्हणून आपली आहे. त्यासाठी आपल्याकडे असलेल्या बंदिस्त पैशाचा उपयोग करावा लागेल असे ते म्हणाले.
आयु. शालिनी आचार्य यांनी आपल्या भावना व्यक्त करताना मंगळसूत्र दान देण्याचे आम्ही चार वर्षापूर्वी ठरविले होते. पण त्यावेळेस बँकेत गहाण ठेवले असल्याने आणि नंतर Lockdown सुरू झाल्यानंतर आम्हाला आमचा संकल्प आजपर्यंत पूर्ण करता आला नाही. तो संकल्प आज पूर्ण होत असल्याने आज वेगळ्या पद्धतीने जयंती साजरी करताना आम्ही आज खूप आनंदित झाल्याचे त्यांनी सांगितले.
वर्णव्यवस्थेतील प्रस्थापितांनी स्त्रियांच्या गळ्यात मंगळसूत्र, पायात पैंजण, जोडवे ई. च्या माध्यमातून बंधने घातली आणि भारतीय स्त्रियासुद्धा या बंधनात खुश आहेत. शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या स्त्रियांनी अशी बंधने झुगारून दिली पाहिजे. स्त्रियांनी अशा प्रकारे भौतिक सुखाच्या मागे न लागता सावित्रीने समाजासाठी केलेला त्याग, रमाईने केलेल्या त्यागाची आठवण ठेऊन ज्या लोकांपर्यंत संविधानिक हक्क अधिकार पोहचले नाहीत त्यांच्यापर्यंत ते पोहचण्याचे साधन आपण झालो पाहिजे आणि या साधनांचा उपयोग आपण विधायक कार्यासाठी केला पाहिजे असे त्या म्हणाल्या. डॉ बाबासाहेब आंबे डकर यांनी आमची ओटी सोन्याने भरली आहे, शिक्षण हाच आमचा खरा दागिना व अलंकार आहे, असे शालिनी आचार्य म्हणाल्या.
आचार्य परीवारामधील त्यांच्या दोन्ही लेकी आर्या आणि श्रेया या दोन्हीचा पाठींबा नेहमीसाठी त्यांना असतो. आंबेडकर मिशन मध्ये हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडत असून या मिशनला सर्वांची मदत मिळणे गरजेचे आहे असे डॉ दीपक कदम म्हणाले.
याप्रसंगी मा. दीपक कदम यांचे आई-वडील, मा. आर. के. गायकवाड, माजी आयुक्त महाराष्ट्र राज्य, पंकज सिंग दिल्ली, रेणुका तलमवार, सहा. आयुक्त रोजगार व स्वयंरोजगार, डॉ. सोनकांबळे, मा. हर्षद, कार्यालयीन अधीक्षक आदिवासी विकास मंडळ, इंजिनियर सोनकांबळे, प्रा. बायसर, प्रा. शिरसे, शिवराज टोम्पे, भीमराव वाघमारे, शेषराव वाघमारे, मायाताई सोनकांबळे, मा. संदीप ससाणे, डॉ. यशवंत चव्हाण, स्वप्नाली धुतराज इत्यादी उपस्थित होते.