Ground Report : वादळ आणि लॉकडाऊनमुळे आदिवासी शेतकरी उध्वस्त
आधी लॉकडाऊन आणि आता आलेल्या चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधवांवर मोठे संकट आले आहे. त्यांच्या स्थितीचा आढावा घेणारा धम्मशील सावंत यांचा ग्राऊंड रिपोर्ट
X
रायगड : लॉकडाऊन, त्यानंतर चक्रीवादळ आणि आता अतिवृष्टीने शेतकरी, बागायतदार व मळे व्यावसायिक यांचे जगणे मुश्किल केले आहे. एक नैसर्गिक आपत्ती गेली की दुसरी आपत्ती येऊन धडकते, यामध्ये शेतकऱ्यांच्या तोंडातील घास गळून पडतोय. रायगड जिल्ह्यातील सुधागड , रोहा व पेण तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी, कातकरी बांधव वास्तव्यास असून त्यांच्या जगण्याचे, उपजीविकेचे साधन म्हणजे जैव संपत्तीतुन ज्या रानभाज्या, रानमेवा मिळेल ते विकून आपली उपजीविका ते भागवततआ. याबरोबरच काही ठिकाणी दुधी, वांगी, टोमॅटो, कारली, काकडी व इतर भाज्यांचे मळे करून आपला उदरनिर्वाह ते करीत आहेत. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनचे संकट आणि त्या पाठोपाठ आलेले तौक्ते चक्रीवादळाने त्यांनी फुलवलेले मळे उध्वस्त झाले आहेत.
उसनवारी व कर्ज घेऊन मोठ्या धाडसाने आदिवासी बांधव शेतमळे करण्यासाठी पुढे सरसावतात. मात्र अतिवृष्टीने पिकांची वारंवार नासाडी होत असल्याने शेतकरी हतबल झाला.
सरकारी नियमांचा फटका
आदिवासी बांधव भाजीपाला पिकवण्यासाठी जमीन भाडेतत्वावर घेतात. पण ही जमीन त्यांच्या मालकीची नसल्याने नुकसानीचे पंचनामे होऊ शकलेले नाहीत. तरी प्रशासनाने त्यांना मदत करावी, अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे. येथील मळे व्यवसायिक हरी देवराम वाघ यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, "मोठ्या आशेने आम्ही भाजी मळा लागवडीसाठी गुंतवणूक केली. मात्र तौक्ते चक्रीवादळ व अतिवृष्टीने आमच्या पिकाची पूर्ण नासाडी झाली. थोड्या फार प्रमाणात उत्पादन झाले मात्र लॉक डाऊन मुळे गिर्हाईक मिळणे कठीण झाले. त्यामुळे लागवडीसाठी केलेला खर्च देखील निघाला नाही, डोळ्यादेखत भाजी पाल्याची नासाडी होताना पाहून खूप वेदना होतात. आम्हा गरीब मळेवाल्यांना मायबाप सरकारने मदतीचा हात द्यावा हीच अपेक्षा."
उन्हाळी भातशेतीला फटका
जिल्ह्यात साधारण 2200 हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी भात शेती केली जाते. यंदा त्योक्ते वादळाने उन्हाळी भातशेतीला फटका बसला आहे. साधारणपणे 243 हेक्टरवरील भात पिकांच्या नुकसान झाले आहे. शेतकरी या नुकसानीने हतबल झाला आहे. जिल्ह्यात सुधागड, माणगाव, रसायनी, अलिबाग, पेण, कर्जत, महाड, मुरुड व रोहा आदी विविध ठिकाणी उन्हाळी भातशेती केली जाते. हमखास पाणी, पोषक वातावरण, शेतीची योग्य मशागत आणि हवामानाची साथ यामुळे उन्हाळी भात शेतीमधून शेतकऱ्यांना हमखास चांगले पिक मिळते. पावसाळ्यातील शेतीतून मिळणाऱ्या उत्पादन व उत्पन्ना पेक्षा उन्हाळी शेतीतून अधिक चांगले उत्पादन व उत्पन्न मिळते. मात्र यंदा हातातोंडाशी आलेले पीक तौक्ते वादळ व पावसाने हिरावून नेले आहे. याबरोबरच लागवड केलेला भाजीपाला देखील वाया गेला आहे.
रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य आदिवासी, कातकरी बांधव नदीकिनारी जागा शोधून जागा मिळेल तेथे काकडी, भाजीपाला यांचे मळे करून आपली उपजीविका करीत आहेत. त्यांनी मेहनत करून मळे फुलविले होते. परंतु तौक्ते चक्रीवादळाने त्याचे नुकसान झाले आहे. परिणामी त्यांच्या उपजीविकेचे साधनच नष्ट झाल्याने ते हताश झाले आहेत. सरकारने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई दिल्यास पुन्हा उभे राहता येईल असे आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे.
यासंदर्भात आम्ही कृषी उपसंचालक दत्तात्रय काळभोर यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की,
तौक्ते वादळ व अतिवृष्टीने जिल्ह्यात सर्वत्र नुकसान झालेय, त्या अनुषंगाने पंचनामा अहवाल सादर केलेला आहे. नुकसान भरपाई अजून जाहीर झालेली नाही.
आता सरकार या आदिवासी बांधवांना मदतीचा हात देणार का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.