गावची कारभारी; कोरोनावर पडतेय भारी
जिथं गावाचे मातब्बर पुरुष हतबल झाले, तिथं आज कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अनेक महिला सरपंच आपलं कर्तव्य पार पाडत आहे.
X
जिथं गावाचे मातब्बर पुरुष हतबल झाले, तिथं आज कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अनेक महिला सरपंच आपलं कर्तव्य पार पाडत आहे. अशीच काही कामगिरी करणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील महिला सरपंच सारिका पेरे यांची कामगिरी चर्चेचा विषय ठरत आहे.
महिला आता सर्वच क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करतायत, चूल आणि मूल एवढ्यापुरत अधिकार समजल्या जाणाऱ्या ग्रामीण भागातील महिला सुद्धा आपल्या रूढी-परंपरेला मोडीत काढत पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन आप-आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावत आहे.
अशीच काही कामगिरी करणाऱ्या सारिका पेरे औरंगाबाद पासून 20 किलोमीटर असलेल्या बिडकीन गावच्या सरपंच आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कामाची पंचक्रोशीत मोठी चर्चा आहे, त्याच कारणही तसेच आहे. गावात कोरोना रोखण्यासाठी त्या स्वतः फिल्डवर उतरून काम करत आहे. एवढच नाही तर दोन-तीन दिवसाला रुग्णालयात जाऊन रूग्णांची भेट घेणे, डॉक्टरांची विचारपूस करणे हे आता नेहेमीच झालं आहे.
जिथं गावच्या राजकारणात पुरुष ही हतबल झाले तिथं त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. तसं बिडकीन हे सारिका याच सासर आणि माहेर असल्याने त्यांना ग्रामस्थांनी नेहमीच सहकार्य केलं आहे.
कोरोना काळात कंटेंमेन झोनमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेणे, कोरोनाबाधित रुग्णांच्या कुटुंबातील लोकांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करण्याचं काम सारिका न घाबरता करतायत. सारिका यांचा हा दिनक्रम एक-दोन दिवसांचा नाही, तर कोरोना आल्याच्या दीड वर्षांपासून त्यांचं काम असेच सुरू आहे.
तर सारिका ह्या फक्त राजकीय नेत्याचं नव्हे तर एक चांगल्या गृहणी सुद्धा आहेत. दिवसभर आपलं कर्तृत्व पार पाडत,आपल्या कुटुंबासाठी सुद्धा त्या वेळ कढतात. खरं तर कोरोनाच्या सुरवातीला काही दिवस त्या आपल्या कुटुंबातील लोकांपासून दूर राहायच्या, मात्र आता सवयी झाल्याने योग्य काळजी घेऊन आपलं कर्तव्य पार पाडत आहे.
तसं कोरोनामुळे ग्रामीण भागात मोठी भीती निर्माण झाली आहे, त्यामुळे माणसं- माणसापासून दूर गेलेत, पण अशा काळात ही एका महिला सरपंच म्हणून गावाच्या हितपोटी सारिका पेरे यांच काम कौतुकास्पद ठरत आहे.