Ground Report : गावात घाणीचे साम्राज्य, गावकऱ्यांच्या आरोग्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
X
राज्यात कोरोना संकटाची तीव्रता कमी झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुका झाल्या आणि वर्षभर थांबलेला गावगाडा पुन्हा सुरू झाला. आपल्या समस्या सुटतील अशा आशा गावातील ग्रामस्थांना होती. पण सत्तेत आलेल्यांनी गावकऱ्यांच्या समस्या सोडवल्या की उलट समस्या वाढल्या आहेत, याचे ताजे उदाहरण समोर आले आहे बुलडाणा जिल्ह्यात....
खामगाव तालुक्यातील आसा या गावातील संपूर्ण रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासन मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार इथल्या गावकऱ्यांनी केली आहे. इथले सरपंच म्हणतात आपल्याला पदभार स्वीकारुन ६ महिने झाले आहेत. आसा - दुधा गट ग्रामपंचायत असलेल्या आसा या गावामध्ये मूलभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. ह्या सुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत आहे. गावांमध्ये बहुतांश रस्त्यांचे बांधकाम झालेले नसल्याने गटारं देखील बांधण्यात आलेली नाहीत. त्यामुळे गावातील संपूर्ण सांडपाणी रस्त्यावर सोडले जात आहे. तर काही नागरिकांनी सांडपाण्यासाठी असलेले शोषखड्डे देखील बुजवून घेतल्याने हे संपूर्ण सांडपाणी रस्त्यावर तुंबल्याने सर्वदूर गटारे साचली आहेत, असा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे. या साचलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. सोबतच दुर्गंधीमुळे देखील नागरिक बेजार झाले आहेत. आधीच कोरोनामुळे भीतीचे वातावरण आहे, तर आता जिल्ह्यामध्ये डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव होत असल्याने या घाणीचे साम्राज्या परसल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी तोंडी तक्रारी केल्या, मात्र निधी उपलब्ध नसल्याचे कारण ग्रामपंचायतीने दिल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन स्थानिक ग्रामपंचायत सचिव आणि इतर यंत्रणेवर कारवाई करावी अशी मागणी याच चिखलामध्ये बसून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी गावकऱ्यांनी दिला आहे.
याबाबत आम्ही ग्रामपंचायतीचे सचिव पायघन यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की, "रस्त्यावर पसरलेल्या चिखलासंदर्भात एअर वॉल दुरुस्त करून पाईपलाईनचे चेंबर बदलण्यात येणार आहेत. सोबतच रस्त्यांवरील चिखल नष्ट करण्यासाठी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये तात्काळ मुरूम टाकण्यास सांगण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच 40 लाख रुपयांच्या विकास कामासंदर्भात प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास त्यामधून या समस्यांचे निवारण करण्यात येईल" अशी माहिती त्यांनी दिली.

तर गावाचे सरपंच प्रकाश बारगळ यांनी सांगितले की, " मी गेल्या सहा महिन्यापूर्वीच सरपंचपदावर आलोय, तेव्हापासून अजूनपर्यंत ग्रामपंचायतला कुठलाही निधी मिळालेला नाही. पंधराव्या वित्त आयोगातील पाच लाख रुपये जमा आहेत, परंतु त्याला खर्च करण्याची परवानगी नाही. गावात तीस लाख रुपयांच्या जवळपास कर वसुली थकीत आहे. स्थानिक आमदारांनी देखील गावात विकास कामे करण्यासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र त्यांनाही निधी खर्च करण्याची अजूनपर्यंत मुभा नाही. अशा अनेक समस्या गावात विकासकामे करण्यासंदर्भात येत आहेत, तर दुसरीकडे नागरिक देखील आपले सांडपाणी रस्त्यावर सोडत आहेत. त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल साचत आहे. त्यांना वारंवार विनंती करण्यात आली मात्र गावकरी ही आपली जबाबदारी विसरून जात आहेत, त्यांनी देखील ग्रामपंचायतीला सहकार्य करावे आणि आपल्याकडे थकित असलेल्या कराचा भरणा करावा, जेणेकरून गावातील विकासकामे करता येतील, त्याचबरोबर येत्या काळात निधी उपलब्ध झाल्यास योग्य पद्धतीने रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि नाल्यांचे बांधकाम करून ही समस्या कायमची निकाली काढली जाईल" असे त्यांनी सांगितले.

आरोग्य विभागाचे म्हणणे काय?
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात डेंग्यू व मलेरियाची साथ सुरू आहे आणि गावामध्ये घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या अनुषंगाने विविध आजाराच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी , किंवा तपासणी करण्यासाठी आसा गावामध्ये आरोग्य विभागाकडून काय उपाययोजना करण्यात येत आहेत याबाबतीत तालुका आरोग्य अधिकारी अभिलाष खंडारे यांना विचारणा केली असता, यासंदर्भात कुठलीही माहिती नाही, मात्र स्थानिक आरोग्य विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना याप्रकरणी विचारणा करू, आणि गावात योग्य त्या उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
गटविकास अधिकारी राजपूत यांना संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की, आसा गावामध्ये पाईपलाईनचे वॉल जास्त लिक झाल्याने रस्त्यावर पाणी वाहत होते. त्याचबरोबर नागरिकांनी आपले शोषखड्डे बुजवून टाकल्याने त्यांचे सांडपाणी देखील रस्त्यावर येत आहे. यासंदर्भात नागरिकांना योग्य त्या सूचना करून पाईपलाईन वॉलच्या चेंबरची तात्काळ दुरुस्ती करून तुंबलेले पाणी धावते करण्यासंदर्भात ग्रामपंचायत सचिवाला योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
त्याचबरोबर ग्रामपंचायत सचिव नागरिकांना निधी उपलब्ध नाही किंवा उद्धटपणाची वागणूक देतात, अशाही ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकायला आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांची बदली झालेली आहे, त्यांना 30 तारखेपर्यंत कार्यमुक्त देखील करण्यात येणार आहे, आणि त्या गावांमध्ये नवीन सचिवाची नियुक्ती करण्यात येणार आहे अशी प्रतिक्रिया गटविकास अधिकारी राजपूत यांनी दिली आहे.
स्थानिक राजकारण आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या मुजोरीचा फटका सर्वसामान्यांना कसा बसतो याचे हे गाव एक उदाहरण आहे. गावातील लोकांनी शोषखड्डे बुजवले तर ग्रामपंचायतीने त्यांच्यावर कारवाई का केली नाही, असाही प्रश्न उपस्थित होतो आहे.
कोरोनाच्या लसीकरणात १०० कोटींचा पल्ला भारताने गाठला आहे, त्यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी एक मोठी ढाल तयार झाली आहे. पण इतर आजारांच्या बाबतीत अजूनही आरोग्य व्यवस्था हलगर्जीपणा करते आहे की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले होते. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने दक्षता बाळगत ग्रामीण भागात चांगले काम केले. त्यामुळे आता सर्वत्र कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
पण इतर आजारांच्या बाबतीत अजूनही ग्रामीण भागाची व्यवस्था सांभाळणाऱ्या ग्रामपंचायती दक्षता बाळगत नसल्याचे चित्र आहे. अंतर्गत राजकारणामुळे या गावातील लोकांना असुविधांचा सामना करावा लागतो आहे. ग्रामसचिवांविरोधात गावकरी तक्रार करत आहेत तर सरपंच हतबलता व्यक्त करत आहेत. आता याची दखल लोकप्रतिनिधी घेतील का, हा खरा प्रश्न आहे.