Home > मॅक्स रिपोर्ट > Ground Report : पाणी, रस्ते, वीज, आरोग्याच्या प्रतिक्षेत असलेला दुर्गम महाराष्ट्र

Ground Report : पाणी, रस्ते, वीज, आरोग्याच्या प्रतिक्षेत असलेला दुर्गम महाराष्ट्र

सध्या देशात 5G ची चर्चा आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रही मोठी प्रगती करत असल्याचे दावे सरकार करते आहे. पण याच प्रगत महाराष्ट्रातील आदिवासी पाडे आजही 5 मुलभूत सुविधांची प्रतिक्षा करत आहेत. आमचे प्रतिनिधी रवींद्र साळवे यांचा ग्राऊंड रिपोर्ट

Ground Report :  पाणी, रस्ते, वीज, आरोग्याच्या प्रतिक्षेत असलेला दुर्गम महाराष्ट्र
X

पालघर : डिजिटल भारताचे स्वप्न आपण सगळेच पाहत आहोत. देशाचा विकास होत असल्याचा दावा केंद्र सरकार करतंय तर राज्य सरकार महाराष्ट्र प्रगती करतोय असा दावा करत आहे. परंतु पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांचा रस्ता मात्र या 'विकास' महाशयांना सापडतच नाहीये. कारण गेल्या अनेक वर्षांपासून या पाड्यांना पाणी, रस्ते, वीज, आरोग्य सुविधा यांची प्रतिक्षा आहे. देशाची आर्थिक राजधानी, स्वप्ननगरी मुबंईपासून 100 किमी अंतरावर तर जव्हार तालुक्यापासून 35 किमी अंतरावर दरी डोंगरात न्याहाळे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या अंतर्गत जव्हार मोखाडा तालुक्यांच्या सीमेवर आदिवासी बहुल लोकवस्ती असलेला सावट पाडा आजही मूलभूत सोयीसुविधा पासून वंचित आहे.

पाण्यासाठी १ किलोमीटर दरीमधून कसरत

पाणी आणण्यासाठी येथील आदिवासींना एक किलोमीटरची दरी पार करावी लागते. पावसाळ्यात तर तालुक्यांचा संपर्कच तुटतो. कामानिमित्त किंवा रुग्णाला नदीमधून जीवघेणी कसरत करावी लागते. या पाड्यात शिक्षणाचीही मोठी गैरसोय आहे. पावसाळयात चार महिने शिक्षकांना यायला सोय नसल्याने येथील मुले शिक्षणापासून वंचित राहतात. येथील परिस्थिती भयानक असताना इकडे कुणीही लक्ष देत नाही. लोकप्रतिनिधी प्रशासन इकडे फिरकतही नाही. यामुळे कोणीतरी आमच्याकडे येईल आणि आमचे प्रश्न सोडवेल याची आम्ही आतुरतेने वाट पहात आहोत, असे सामाजिक कार्यकर्ते नरेश पढेर यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितले.





समस्यांचा पाडा

सावटपाडा समस्यांचा पाडा असून राज्यापासून तुटलेला पाडा आहे. येथे पाणी, रस्ता, आरोग्य अशा कोणत्याच सुविधा नाहीत. गावातील एखादी व्यक्ती आजारी पडली तर लाकडाची डोली करून त्या रुग्णाला न्यावे लागते. वेळेत उपचार न मिळल्याने येथे रुग्णही दगावले आहेत पावसाळयात तर या पाड्याचा संपर्कच तालुक्याशी राहत नाही. केंद्र सरकार म्हणतंय मेक इन इंडिया, डिजिल इंडिया ..पण या योजना कुठे आहेत, असा सवाल यावेळी उपस्थित होतोय.





सावट पाडावासियांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो आहे. एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना दुसरीकडे या पाड्यावर रस्त्याची सुविधा नसल्याने येथील आदिवासींना मरणयातना भोगाव्या लागतात ही बाब गंभीर आहे. याकडे प्रशासन- लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देऊन येथील समस्या सोडवल्या पाहिजेत अन्यथा पावसाळयात गंभीर परिस्थिती उदभवल्यास किंवा कुणाचा मृत्यू ओढवल्यास याला प्रशासन लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील, असा इशारा श्रमजीवी संघटनेचे ईश्वर बांबरे यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना दिला आहे.

स्वस्त धान्यासाठी 8 किमी पायपीट

जव्हार तालुक्यापासून 30 ते 35 किमी अंतरावर 35 घरांचा वसलेला 350 लोकवस्तीच्या सावटपाडा या आदिवासी पाड्यावरील शाळेची दूरवस्था आहे. इथे पाण्याची सोय नाही. एवढंच काय रेशन दुकानावरचे धान्य आणण्यासाठी 8 किलोमीटरची डोंगर माथ्याची पायवाट तुडवत नदीच्या पलीकडे जीव धोक्यात घालून नदीत पोहून सांबरपाडा गाठावा लागतो. बरं एकाच फेरीत रेशन मिळेल याची शाश्वती नसते. यामुळे एका महिन्याचे धान्य आणण्यासाठी अनेकवेळा फेऱ्या माराव्या लागतात. पावसाळयात नदीच्या पलीकडे ये-जा करावी लागत असल्याने चार महिन्याचे धान्य आणता येत नसल्याचे येथील गावकरी सांगतात. त्याचबरोबर रस्त्याची सोय नसल्याने पावसाळ्यात येथील आदिवासींचा संपर्कच तुटतो.





पाण्यासाठी 1 किलोमीटर पायपीट

या पाड्यापासून 1 किमी अंतरावर विहीर असून डोंगर पार करून त्यांना घोटभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते. तर कधी नदीच्या बाजूला खड्डा खोदून दुषीत पाणी प्यावे लागते. यामुळे आमच्या गावात सक्षम अशी नळपाणी पुरवठा योजना राबवा, अशी मागणी येथील महिला सविता जयराम भोगाडे यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना केली.

रुग्णासाठी डोली आणि खडतर प्रवास

एखादी व्यक्ती आजारी पडल्यास लाकडाची डोली करून नदीतून जीवघेणी कसरत करून 8 ते 9 किमीचे अंतर पार करून न्याहाळे बुद्रुक उपकेंद्र गाठावे लागते. किंवा 4 किमी अंतरावर डोली करून पांगरी गावा पर्यंत पोहून 10 किमी अंतरावर असलेले मोखाडा ग्रामीण रुग्णालयात गाठावे लागते. तसेच गरोदर मातांना तपासणीसाठी जव्हारला पोहचण्यासाठी तारेवरची मोठी कसरत करावी लागते.

तर पावसाळयात नदीच्या पलीकडे ये जा करताना सोनी बुध्या जाधव , मथी धाकल्या पढेर आणि सातळ धाकल्या तराळ अशा तीन व्यक्ती नदीच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत. यामुळे जीव मुठीत धरून मरण यातना भोगणाऱ्या या आदिवासींकडे प्रशासन-लोकप्रतिनिधी कधी लक्ष देणार हा प्रश्न आहे.




समस्या कशा सुटू शकतात?

जव्हार मोखाडा सीमेलगत असलेला हा पाडा समस्यांचा पाडा आहे. तसेच जव्हार तालुक्यात समाविष्ट असलेल्या येथील आदिवासींसाठी जव्हारला जाणारा रस्ता अतिशय बिकट आहे. यापेक्षा मोखाड्याकडे जाणार रस्ता थोडा तरी सुलभ आहे. पण मोखाड्याला जाताना 4 किमीचीच त्यांना पायपीट करावी लागते. परंतु वळसा घालून जाणे त्यांना शक्य होत नाही, यामुळे नाईलाजास्तव जीव धोक्यात घालून वैयक्तिक कामांसह शासकीय कामांसाठी बारमाही वाहणाऱ्या वाघनदीतून येजा करावी लागते. परंतु हा पाडा मोखाडा तालुक्यात समाविष्ट केल्यास व मोखाडयाला जोडणारा 4 किमीचा नवीन रस्ता बांधल्यास येथील आदिवासींचा प्रश्न कायमचा सुटू शकतो.

जव्हार मोखाडा तालुक्यांच्या सीमेवर असलेला हा सावटपाडा जव्हारपासून 30 किमी अंतरावर आहे. जव्हारहून जाताना डोंगर माथ्याची पायवाट तुडवत बारमाही वाहणारी वाघ नदी पार करून सावटपाडा गाठावा लावतो. तर मोखाड्यापासून 10 किमी पांगरी गावापासून 4 किमी अंतरावर असलेल्या सावट पाड्यात आजही कशी बशी दुचाकी पोहचत आहे. पावसाळयात मात्र कोणतेच वाहन पोहचत नाही. यामुळे पावसाळयात या पाड्याचा पूर्णता संपर्कच तुटतो. या जिल्हा परिषद गटातील झेडपी सदस्य सुरेखा थेतले याना संपर्क केला असता त्यांनी बोलताना सांगितले की, आपण या पाड्यावर भेट दिलेली आहे. या पाड्यावरील सोयीसुविधांचा प्रश्न जवलंत असून रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे. तत्कालीन पालकमंत्री विष्णू सवरा यांनी येथील रस्ता व पुलासाठी 2 कोटींचा निधी मंजूर केला होता. परंतु हा निधी खूपच अपूर्ण होता. तसेच या पाड्यावरील लोकसंख्या कमी असल्याने मोठा निधी उपलब्ध होत नाही परंतु आम्ही निधीसाठी प्रयत्न करतोय. यासाठी मी स्वतः अनेकवेळा आवाज उठवला आहे," असे त्यांनी मॅक्समहाराष्ट्राशी बोलताना सांगितले. तसेच याबाबत खासदार राजेंद्र गावित यांच्याशी संपर्क साधला असता या पाड्याचा प्रश्न गंभीर आहे. येथील रस्ता व पुलासाठी केंद्रातून निधी मंजूर करून आणू असे त्यांनी मॅक्समहाराष्ट्राशी बोलताना सांगितले.

Updated : 26 May 2022 6:29 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top