Investigation : ७ वर्षांच्या वरदचा खून की नरबळी?
कोल्हापूर जिल्ह्यातील सोनाळी गावात ७ वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पण या मुलाचा नरबळी दिला गेला आहे असा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. पण पोलीस अजून हा नरबळी असल्याचे म्हणत नाहीयेत. पण नरबळी असल्याचा आरोप कुटुंबीय का करत आहेत, गावातील इतरांचे म्हणणे काय आहे, आणि तिथली परिस्थिती काय आहे याचा आढावा घेणारा आमचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांचा ग्राऊंड रिपोर्ट....
X
"माझं बाळ वरदला त्यानं ठार मारलं, मी जर त्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला गेलो नसतो तर माझं बाळ वाचलं असतं. जेवायला बसलेलं माझं बाळ त्याने जेवणावरुन उठवून तलावाकडे नेलं. त्याचा बळी दिला माझ्या सात वर्षाच्या चिमुकल्याचा गळा दाबला. त्याला केवळ फाशीच झाली पाहिजे."
ही केविलवाणी प्रतिक्रिया आहे वरदचे आजोबा शंकर पाटील यांची... मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना पुढे त्यांनी माहिती दिली की, आरोपी मारुती वैद्य हा काही दिवसापूर्वी मुल होत नसल्याने अस्वस्थ होऊन त्यांच्याशी बोलत होता. त्यावेळी त्यांनी आरोपीला विज्ञान आता पुढे गेले आहे, अंधश्रद्धेने उपाय करु नको... आपण पत्की डॉक्टरांकडे जाऊ. त्यांच्या उपचाराने तुला नक्की मुल होईल. यावर त्याने "काही दिवसात मुलासाठी मी शेवटचा प्रयोग करणार असल्याचे सांगितले.", अशी माहिती शंकर पाटील यांनी दिली.
पण त्याचा हा शेवटचा प्रयोग म्हणजे चिमुकल्या वरदचा शेवट ठरेल याची तिळमात्र शंका त्यावेळी वरदच्या आजोबांना आलेली नव्हती. अखेर याच मारुती वैद्य याने चिमुकल्या वरदची हत्या केली. वरदची झालेली हत्या हा मुल होण्यासाठी दिलेला नरबळी आहे, असा आरोप ते करतात.
वरदच्या आजोबांनी दिलेल्या माहितीशी सुसंगत आणखी माहिती मिळविण्याचा प्रयत्न आम्ही सोनाळी गावात फिरून केला. काही नागरिकांच्या भेटी घेतल्या. यावेळी आमची भेट वत्सला खुळांबे यांच्याशी झाली. वत्सला खुळांबे यांच्या मुलीचा लहान मुलगा त्यांच्याकडे राहतो. त्यांनी माहिती दिली की आरोपी मारुती वैद्य हा त्यांच्या नातवाशी जवळीक करण्याचा प्रयत्न करत होता. त्या सांगतात " मी माझ्या लेकीचं मुल इथ जतन करत आहे. त्याला तो सतत विचारत असायचा बारक्या कुठं हाय? त्याला तो सतत म्हणायचा माझ्या छकड्यात बस, माझ्यासोबत पेंडीला( चारा आणायला) येणार का ? यानंतर त्यांनी त्यांच्या नातवास बोलावले. त्यांचा नातू देखील सांगतो की " तो मला पेंडीला नेईता, सतत म्हणायचा पेंडीला जाऊया, तुझ्या हातात बैल देतो तुमच्यापण ढोरास्नी पेंडी आणुया ". या मुलाला गेल्या महिनाभरापासून आरोपी असे म्हणत असल्याचे त्याने सांगितले.
वत्सला खुळांबे यांच्याप्रमाणेच सुहास रेडेकर यांचा अनुभव देखील असाच आहे. त्यांच्या मुलाशी जवळीक करण्याचा आरोप मारुती वैद्य याने केल्याचे त्यांनी सांगितले. यावरून आरोपी काही काळापासून लहान मुलांना जवळ करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. मुलांच्या आवडीच्या गोष्टी त्यांना देणे त्यांना गाडीत बसवणे खायचे आमिष दाखवणे अशा क्लृप्त्या करून मुलांशी लगट करत असल्याचे लोकांनी दिलेल्या माहितीवरून समजते. या ठिकाणी जमलेल्या गावकऱ्यांनी अशी देखील माहिती दिली की सदर आरोपी शामराव रामबाळे यांच्या कुत्र्याला दररोज भाकरी टाकत असायचा. कुत्र्याला भाकरी टाकल्याने मुल होते अशी त्याची समजूत असल्याचे गर्दीतील लोकांनी सांगितले.
आरोपी मारुती वैद्य याला १५ वर्षापासून मुलबाळ नसल्याने तो त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पंचांग बघत असायचा. वेगवेगळ्या उपायांच्या शोधात सतत असायचा. यातूनच तो बाचणी येथी एका व्यक्तीकडे पंचांग पाहण्यासाठी गेल्याचे देखील गावकऱ्यांनी सांगितले. आरोपी वैद्य याचा भाऊ हा देखील स्वतः पंचांग पाहतो. या दृष्टीने त्याने कुणाकडून सदर प्रकार करण्याचा सल्ला घेतला आहे का? या त्याच्या कृत्यामध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे? याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. संदीप पाटील हे वरदचे नातेवाईक आहेत. ते सांगतात " आरोपी हा दोन महिन्यांपासून सतत घरी यायचा. वरद सोबत सलगी करायचा. त्याला न बोलावता तो सावर्डे बुद्रुक येथील वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला त्याच्या आजोबांच्या सोबत गेला. त्याने केलेला हा प्रकार नरबळीच आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे.
घटनाक्रम नेमका काय घडला
सातत्याने वरदशी सलगी करणारा आरोपी मारुती वैद्य याला माहिती मिळाली की वरद त्याच्या आजोबांच्यासोबत सावर्डे बु येथील त्याच्या आजोळी वास्तुशांती करीता जाणार आहे. सावर्डे गावातच मारुतीची सासरवाडी आहे. तो त्यांच्यासोबत सावर्डे गावी गेला. वास्तुशांती विधी झाल्यानंतर आठ वाजता वरद अचानक घरातून गायब झाला. शोधाशोध सुरू झाली. या दरम्यान आरोपी देखील या ठिकाणाहून आठ ते नऊच्या दरम्यान गायब होता. काही वेळाने आरोपी वैद्य हा देखील या गर्दीमध्ये मिसळला. त्या गावातील गावकऱ्यांनी त्याच्यावर संशय घेतला. तो त्याच्या पाहुण्यांच्या घरातून हातपाय धुवून आला. या अगोदरही त्याने तळ्यातील पाण्यात हात पाय धूतल्याचे ग्रामस्थ सांगतात. पण तो असे काही करणार नाही असा विश्वास घरच्यांना होता. शोधाशोध करुनही वरदचा पत्ता लागला नाही. पोलिसांनी संशयित म्हणून वैद्य याला ताब्यात घेतले. गावातील एका मुलीने त्याला मुलांसोबत पाहिल्याचे सांगितल्यानंतर गावकऱ्यांचा संशय पक्का झाला.
गावातील ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने आपले पितळ उघडे पडणार या भीतीने आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर त्याच्या भावाने हे पाहिल्यानंतर त्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. गुन्हा कबूल केल्यानंतर आरोपीने मृतदेहाची जागा पोलिसांना दाखवली. सावर्डे गावाच्या तलावाशेजारी असलेल्या निर्मनुष्य झाडीमध्ये काट्यामध्ये त्याचा मृतदेह लपवून ठेवण्यात आला होता.
नरबळी असल्याचा कुटुंबीय आणि गावकऱ्यांचा दावा
मृतदेह सापडल्याच्या दिवसापासून सदर प्रकार हा नरबळीचाच असल्याचे ग्रामस्थ तसेच वरदचे नातेवाईक सतत सांगत आहेत. पण सदर प्रकरणामध्ये नरबळी हा शब्द वापरू नये असा पोलिसांचा दबाव असल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे.
या केसमध्ये आरोपीला फाशीपर्यंत पोहोचवतो, पण नरबळी हा शब्द वापरू नये असा दबाव पोलिस टाकत असल्याचा खळबळजनक आरोप वरदच्या आजोबांनी केला आहे. याबाबत त्यांनी मॅक्स महाराष्ट्राकडे आपली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. वरदच्या वडिलांनी देखील हा प्रकार नरबळीचा उद्देशाने केला असून पोलिसांनी या अंगाने तपास करावा. या घटनेमागे इतर कुणी आहे का? आरोपीला या कृत्यात इतर कुणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली आहे का याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
वरदची आई ही सहा महिन्यांची बाळंतीण आहे. मुलाच्या मृत्यूने त्यांना मानसिक धक्का बसलेला आहे. त्यांना पोलिस सातत्याने चौकशीसाठी बोलावत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी आम्ही पोलिसांना तपासासाठी सर्व ते सहकार्य करण्यास तयार आहोत, परंतु सदर प्रकरणाला वेगळे वळण देऊन सत्य झाकण्याचा प्रयत्न होऊ नये अशी मागणीच कुटुंबीयांनी केली आहे.
पोलिसांचे म्हणणे काय?
या घटनेबाबत कोल्हापूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यांनी सांगितले की, "सदर कुटुंबियांच्या पाठीशी पोलीस ठामपणे उभे असून सर्व अंगांनी पोलिस तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले. या केसचे तपास अधिकारी डी वाय एस पी काकडे यांची देखील प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली. पण हा प्रकार नरबळी आहे की केवळ खून हे अद्याप स्पष्ट झालेले नाही." पोलिसांच्या विविध टीम पूर्ण ताकतीने तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले. कुटुंबियांवर पोलिसांचा कोणताही दबाव नसल्याचे त्यांनी सांगितले.
अंनिसचा गंभीर आरोप
याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती यांनी सदर प्रकार नरबळीचा असण्याची दाट शक्यता आहे, कारण आरोपी गेल्या काही काळापासून लहान मुलांशी सलगी करत होता. त्याचा हा नेहमीचा स्वभाव नव्हता याचबरोबर मूल होत नसल्याबाबत त्याने काही देवरशी बुवा बाबांशी संपर्क केला आहे का ? त्याला असा सल्ला कुणी दिला आहे का याची सखोल चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.
वरदचा खून हा नरबळी असल्याचे नातेवाईक तसेच गावकरी ठामपणे सांगत आहेत. यासाठी गावातील लोकांचे म्हणणे पोलिसांनी गांभिर्याने घ्यावे, याचबरोबर तो ज्या पालकांच्या मुलांशी सलगी करत होता त्यांच्याकडे चौकशी करण्याची मागणी केली आहे. आरोपीच्या संपर्कात असणाऱ्या बुवा बाबा अथवा इतर कुणी मांत्रिक यांची चौकशी करून यातील इतर आरोपींना पोलिसांनी समोर आणावे आणि सदर प्रकार हा केवळ खून म्हणून दडपू नये अशी मागणी महाराष्ट्र अनिसने केली आहे.
यासंदर्भात कृष्णात स्वाती पुढे म्हणाले की "पोलिसांनी केलेला पंचनामा पाहिल्यावर त्या ठिकाणी कोणत्या वस्तू आढळल्या त्यावरून हत्येचे कारण स्पष्ट होईल. अद्याप पोस्ट मार्टम अहवाल देखील मिळालेला नाही. त्या ठिकाणी रक्त पडलेले आहे का? मृतदेहाचा कोणता भाग कापलेला आहे का ? यावरून नरबळी आहे का हे स्पष्ट होईल.
या प्रकरणातील आरोपीचे वरदच्या कुटुंबीयांसोबत कोणतेही वाद नव्हते, असे असताना तो हत्या का करेल हे कोडे उलगडण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. या तपासात गावातील नागरिकांचे जबाब अतिशय महत्त्वाचे आहेत. हे जबाब तपासामध्ये समाविष्ट करण्यात यावे. यासोबतच इतर काही धागेदोरे मिळतात का? घटनास्थळाच्या आसपास झाडी तसेच ऊस शेती आहे, या परिसरात कुठे काही विधी केला आहे का ? या गोष्टी सदर परिसर पूर्ण फिरल्याशिवाय लक्षात येणार नाही. हे सर्व पुरावेच आरोपीला फासापर्यंत पोहाचवतील. या दृष्टीने पोलिसांचा तपास होणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. पुरोगामी राज्याचा हा वारसा याच कोल्हापूर जिल्ह्यातून महाराष्ट्राला मिळाला आहे. या राज्यात घडलेल्या या गुन्ह्याची तथ्याच्या आधारावर पोलिसांनी उकल करून वरदच्या खुन्यांना फासावर खेचत न्यावे अशी जन भावना आहे.
पोलिसांनी पंचनामा केला पण त्याची माहिती ना कुटुंबियांना दिली ना गावकऱ्यांना देण्यात आली. पोस्टमॉर्टेम अहवालाला उशीर होतोय...त्यामुळे पोलिसांच्या दृष्टीने हा नरबळी आहे की नाही ते ठरेल...पण या प्रकरणात पोलीस तपासाचा वेग पाहता आणि नरबळी शब्द टाळण्याचा पोलिसांचा सल्ला पाहता..सत्य बाहेर येईल का असा सवाल उपस्थित होतो आहे.