पालघरमधील ती घटना आणि आरोग्यव्यवस्थेची ऐशीतैशी…
रस्त्या अभावी एका महिलेची घरीच प्रसुती झाली आणि तिच्या जुळ्या बाळांना वाचवण्यात अपयश आले. या धक्कादायक घटनेने महाराष्ट्र हादरलेला असतानाच या प्रकरणात आरोग्य व्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगणारी माहिती समोर आली आहे. रवींद्र साळवे यांचा स्पेशल रिपोर्ट
X
लघर : जिल्ह्यातील एका महिलेची रस्त्याअभावी घरीच प्रसुती झाली आणि त्यात तिची दोन्ही बाळं वाचू शकली नाही, या घटनेचे विधिमंडळ अधिवेशनात तीव्र पडसाद उमटले. पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पण आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तालुक्यातील मरकटवाडी येथील वंदना बुधर या महिलेची ७ व्या महिन्यातच प्रसुती झाली, तिची प्रसुती घरीच झाल्याने तिच्या डोळ्यादेखत तिच्या दोन जुळया बालकांचा मृत्यू झाला. यानंतर या गावाला रस्ताच नसल्या या महिलेनला झोळी करुन रुग्णालयात न्यावे लागले.
पण यापेक्षा देखील आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित महिलेची प्रसुतीपर्यंत एकदाही सोनोग्राफीच झाली नसल्याचे समोर आले आहे. गर्भवतीच्या गर्भात किती बालके आहेत, त्या बालकांची स्थिती कशी आहे हेच जर उपचार करणाऱ्या आणि प्रसूती करणाऱ्या आरोग्य यंत्रणांना माहिती नसेल तर बालमृत्यू आणि मातामृत्युही कसे रोखणार हा खरा सवाल या घटनेच्या निमित्ताने उपस्थित होत आहे.
प्रत्येक गर्भवतीची प्रसुती उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय अशा कोणत्याही आरोग्य केंद्रातच व्हायला हवी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी गर्भवती महिलेला पहिल्या महिन्यापासून प्रसूती होईपर्यंत त्यानंतरही बुडीत मजुरी म्हणऊन रक्कम दिली जाते. गर्भवती राहील्यापासून प्रसूती होईपर्यंत किमान १२ वेळा गर्भवती महिलांची तपासणी आरोग्य विभागाकडून करणे आवश्यक असते. मात्र वंदना बुधर यांची प्रसुतीचा १७ ऑक्टोबरला होईल असा अंदाज असताना आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार फक्त तीनवेळा तिची तपासणी झाली होती. तसेच ती तपासणीही अगदी औपचारिकच झाली असावी, असा अंदाज आहे कारण आता पर्यंत एकदाही सदर महिलेची सोनोग्राफी करण्यात आलेली नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण एका महिलेची तिच्या प्रसूतीपर्यंत किमान चारवेळा सोनोग्राफी होणे आवश्यक असते. मात्र इथे एकदाही सोनोग्राफी न झाल्याने आरोग्य यंत्रणेचे लक्ष फक्त कागदी घोडे नाचवून योजना हडप करण्यातच आहे का असा सवाल उपस्थित होतो आहे?
मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दर गुरुवारी अगदी मोफत सोनोग्राफी होत आहे, यासाठी तालुका आरोग्य विभागाकडून प्रती रुग्ण ४०० रुपये इतका निधी संबंधित सोनोग्राफी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिला जातो. उपकेंद्रातून प्राथमिक आरोग्य केंद्र तिथून ग्रामीण रुग्णालय हा प्रवासही रुग्णवाहिकेतून मोफत असतो. एवढेच काय प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षात मोजक्याच महिला गर्भवती असल्याने यांच्याकडे आरोग्य अधिकाऱ्यांचे लक्ष जायलाच हवे, मात्र असे अजिबात होताना दिसत नाही, हे या घटनेने दाखवून दिले.
जुळे बालके दगावली मात्र माता सुदैवाने बचावली तिच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र याभागातील प्राथमिक आरोग्य केंद्राना बळकटी देणे अधिक गरजेचे झाले आहे. मुलभूत सुविधेवर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या आरोग्य विभागाने काही ठोस पाऊले उचलयला हवीत, अशी मागणी होते आहे, कारण मोखाडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र हे फक्त रेफर केंद्र बनले आहे. जर किरकोळ उपचारासाठीही तालुक्याच्या जिल्ह्याच्या रुग्णालयातच जावे लागणार असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्र काय नुसत्या शोभेसाठी आहेत काय असाही प्रश्न वंदनाच्या निमित्ताने विचारला जात आहे.