गुरूशिवाय मल्लखांब शिकलेला सोलापूरचा नवा एकलव्य
महाभारतात एकलव्याची गोष्ट आपण वाचतो. त्यामध्ये एकलव्याला द्रोणाचार्याकडून धनुर्विद्येचं शिक्षण घ्यायचं असतं. पण द्रोणाचार्यांनी मी फक्त शुद्रांना शिक्षण देत नाही, असं म्हटलं. त्यानंतर एकलव्याने द्रोणाचार्यांची प्रतिमा समोर ठेऊन धनुर्विद्येचं शिक्षण घेतलं. यामध्ये एकलव्य द्रोणाचार्यांचा शिष्य अर्जुनापेक्षाही पारंगत झाला. त्याच पध्दतीने घरची परिस्थिती हलाखीची. गावातील तालमीत असणारे कुस्तीचे वस्ताद उत्तम तात्या यांनी हा मुलगा मल्लखांब शिकेल, हे सुतोवाच केले होते. पैसे नाहीत, प्रशिक्षक नाही. ग्रामीण भागात मल्लखांब खेळण्याची सोय नाही. या कठीण परिस्थितीत अथर्व देशमुख या तरुणाने मल्लखांब या खेळात प्राविण्य मिळवलं आहे. त्याचा हा संघर्षमय प्रवास वाचा आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांच्या या रिपोर्टमध्ये…
X
“मी लहान असतानाची घटना आहे. रस्सीखेच स्पर्धेत माझ्या बहिणीचा पहिला क्रमांक आला होता. स्टेजवर तिचा सत्कार सुरु होता. माझा पण सत्कार करा म्हणून मी रडत होतो. स्टेजवर पळत होतो. त्यावेळी वडील मला म्हणाले तू रोजच भांडणं करतो. लोकांच्या तक्रारी घरी घेऊन येतो. भांडणं केल्यावर सत्कार होत नसतो. सत्कार करण्यासाठी काहीतरी चांगलं करून दाखवावं लागतं”.
अथर्व देशमुख ते प्रसिद्ध मल्लखांबपटू अथर्व देशमुख या संघर्षमय प्रवासाची सुरवात या घटनेने झाली. ‘सत्कारासाठी काहीतरी करून दाखवावं लागतं’ या वडीलांच्या वाक्यावर अथर्वकडे उत्तर तयार होतं. गावातील तालमीत असणारे वस्ताद उत्तम तात्या यांनी अथर्व चांगला मल्लखांबपटू होऊ शकतो, असे सुतोवाच एकदा केले होते. अथर्वने मल्लखांब शिकण्याची इच्छा वडिलांकडे बोलून दाखवली. या घटनेनंतर काही दिवसातच अथर्व तालमीत वस्ताद असणाऱ्या उत्तम तात्यांच्याकडे मल्लखांब शिकण्यासाठी गेला. तालमीत मल्लखांब शिकण्यासाठी आलोय हे सांगताच तात्या म्हणाले, “कपडे काढ, लंगोट घाल आणि उतर मातीत”. तात्यांच्या या वाक्यावर अथर्व गोंधळला. लंगोट कसला असतो ?असा प्रश्न त्यांने तात्यांना विचारला. तात्यांनी तेथूनच अथर्वला गावातील ट्रेलरच्या दुकानात नेले. लंगोट शिवून दिला. तालमीत अथर्वचे मल्लखांब प्रशिक्षण सुरु झाले. अथर्व पहिल्याच दिवशी पहिल्या दीड तासात आडी, वेडी हे मल्लखांबातील प्रकार शिकला. तात्यांना इतकेच प्रकार येत होते. याच प्रकाराचा सराव काही दिवस अथर्वने केला. त्यानंतर तो युट्यूब वर व्हिडीओ पाहू लागला. ते पाहून सोप्पे सोप्पे प्रकार शिकला. तात्यांच्याकडे असलेले कौशल्य त्यांनी अथर्वला शिकवले. पुढील प्रकार शिकविण्यासाठी याला चिपळूण पुणे अशा शहरात पाठवण्याचा सल्ला त्यांनी वडिलांना दिला. अथर्वच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची. दुसऱ्या शहरात जाऊन शिकणे अशक्यच होते. मित्र नातेवाईक यांनी अथर्वला मल्लखांब शिकण्यास आर्थिक मदत केली.
मल्लखांब या खेळाचे विविध प्रकार आहेत. ते वयानुसार खेळले जातात. वीर भद्रासन, (vir bhadrasan ), नकीकस(nakikas ), कपाडी (kapadi), बगली (bagali), बगली फरारा (bagali farara ), कूर्मासन (kurmasan), चकुरासन(chakurasan), चकुरासन झाप (chakurasan zap) असे मल्लखांबाचे विविध प्रकार आहेत.
या खेळातील ज्ञान अथर्वने मोबाईल वरून घेतले. त्याचा सराव करत तो जिल्ह्यातील स्पर्धेत स्पर्धक म्हणून उतरला. त्याच्या पहिल्या स्पर्धेचा किस्सा जाणून घेतल्यास त्याचा संघर्ष आणि मल्लखांब शिकण्याची त्याची जिद्द समजते. सोलापूर येथील स्पर्धेत उतरताच त्याने त्याला येत असलेले प्रकार करून दाखवले. त्यावेळी तेथील प्रशिक्षक त्याच्याकडे अवाक होऊन पाहू लागले. त्या स्पर्धा बाराव्या वर्षाखालील प्रकारच्या होत्या. त्या स्पर्धेत अथर्व १९ वर्षाखालील प्रकार अगदी कौशल्याने करून दाखवत होता. त्याला बाराव्या वर्षाचे प्रकार माहित नव्हते. त्या प्रकारांचा व्हिडीओ त्याने पुन्हा मिळवला. पुण्याचे अनुप देसाई, साताऱ्याचे शेडगे सर यांनी या प्रकारचे व्हिडीओ त्याला पाठवले. त्यानुसार त्याने सराव केला. इतका सराव केला की या कष्टाच्या जोरावर सलग सहा वर्षे जिल्ह्यात प्रथम नंबर घेतला. अथर्वचा प्रवास केवळ जिल्हास्तरावर थांबला नाही. विभाग आणि पुन्हा राज्यस्तरावर त्याने चमकदार कामगिरी केली.
ग्रामीण भागातील तरुणांना मल्लखांब खेळाचे प्रशिक्षक मिळत नाहीत. खेळाची माहिती देखील मिळत नाही. या प्रतिकूल परिस्थितीतही अथर्वने या खेळात यश प्राप्त केले. टांगता मल्ल खांब काय असतो? हे पहायला अथर्वला चिपळूणला जायचे होते. पण त्याच्याकडे बसला देखील पैसे नव्हते. पैशाच्या कारणाने त्याने चिपळूणला जाणे रद्द केले होते. पण दिनेश नरळे, हणमंत काळे यांनी त्यावेळी अथर्वला आर्थिक मदत केली. चिपळूणला जाऊन त्याने टांगता मल्लखांब कसा खेळतात ते पहिल्यांदाच पाहिला. हा मुलगा केवळ व्हिडीओ पाहून मल्लखांब शिकतोय याचे सर्वांना आश्चर्य वाटत होते. अशा स्पर्धेतून अथर्वच्या ओळखी होत गेल्या. काही प्रशिक्षकांचे फोनवरून मार्गदर्शन होऊ लागले.
अथर्वच्या खेळाची ख्याती वाढत गेली. त्याला खेलो इंडिया स्पर्धेतून देखील पत्र आले. पण वडील आजारी असल्याने त्याचे ते स्वप्न भंग पावले.
अथर्वला देशपातळीवर आपल्या खेळाची चुणूक दाखवायची आहे. त्याचे वडील घरी आजारी असतात. त्यांच्या औषधांचा खर्च, कुटुंबाचा खर्च पेलून मल्लखांब खेळण्यासाठी आर्थिक परिस्थिती आज अथर्वची नाही. आपल्या गरीबीवर मात करत मल्लखांब शिकलेल्या महाराष्ट्राच्या मातीतील या उगवत्या खेळाडूला घरातील गरिबीने चीतपट केलाय. गरज आहे त्याला आर्थिक आधार देण्याची. अथर्वने आता बारावीची परीक्षा दिलीय. दानशूर लोकांनी मदत केल्यास महाराष्ट्रातून एक नवा खेळाडू राज्याचे नाव चमकावेल यात शंका नाही.