Home > मॅक्स रिपोर्ट > Special Report : मंदिराजवळ स्मशानभूमी नको म्हणून गावाला पाणी पुरवणाऱ्या विहिरी शेजारी स्मशानभूमीचा घाट

Special Report : मंदिराजवळ स्मशानभूमी नको म्हणून गावाला पाणी पुरवणाऱ्या विहिरी शेजारी स्मशानभूमीचा घाट

देव मानवात आहे त्यामुळे मानवाची सेवा करा असा संदेश संतांनी दिला आहे. पण या शिकवणुकीला काळीमा फासणारा प्रकार रायगड जिल्ह्यात समोर आला आहे. देवळाजवळ स्मशानभूमी नको अशी भूमिका घेत एका गावातील नागरिकांनी दुसऱ्या जागेचा प्रस्ताव दिला आहे. पण तिथे अनेक गावांना पाणी पुरवठा करणारी विहिरी आहे. या स्मशानभूमीमुळे विहिरीचे पाणी घ्यायला दररोज जायचे कसे असा प्रश्न इथल्या महिलांना पडला आहे. देवासाठी माणसांना पाण्यापासून तोडणारा हा प्रकार काय आहे ते सांगणारा धम्मशील सांवत यांचा ग्राऊंड रिपोर्ट.....

Special Report : मंदिराजवळ स्मशानभूमी नको म्हणून गावाला पाणी पुरवणाऱ्या विहिरी शेजारी स्मशानभूमीचा घाट
X

रायगड : रायगड जिल्ह्यात आजही अनेक वाड्या वस्त्यांवर मुलभूत सुविधांसाठी नागरिकांना संघर्ष करावा लागतो आहे. जिल्ह्यातील अनेक गावे, वाड्या वस्त्या, पिण्याच्या पाण्यासाठी वर्षानुवर्षे धडपडताना,संघर्ष करताना दिसत आहेत. कोट्यवधींच्या शासन योजना व नळपाणी पुरवठा योजना लालफितीत अडकल्या आहेत, तर अनेक ठिकाणी धूळखात पडल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील विशेषतः अलिबाग तालुक्यासारख्या मुख्यालय असलेल्या ठिकाणापासून जवळच असलेल्या मिळखतखार मळा तसेच सारळ-म्हाप्रोली या गावाना पाणीटंचाईची समस्या आहे. या गावांमधील लोकांसाठी इथली एक विहिर मोठा आधार ठरली आहे. पण आता या विहिरीजवळच्या मोकळ्या जागेत स्मशानभूमी तयार करण्याचा घाट घातला जातो आहे. ग्रामपंचायतीच्या या निर्णयाला इथल्या महिलांनी तीव्र विरोध केला आहे.

पाणीटंचाईने अनेक गावं त्रस्त

नदीला बारमाही पाणी नसत्ते. दुसरीकडे खारे पाणी पिण्यासाठी उपयुक्त नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती इथल्या लोकांच्या नशिबी आली आहे. इथल्या महिलांना गावातील घरापासून कोसो दूर खडकाळ, चढउतार व काटेरी वाट तुडवत विहिरीजवळ पोहोचावे लागते. तेथून पाणी उपसून डोक्यावर हंड्याच्या दुडी घेऊन उन्हातान्हात दमछाक करीत माघारी परतावे लागते. पाण्यासाठी येथील ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते. याठिकाणी असलेली विहीर मळा व म्हाप्रोली ग्रामस्थांची तहान भागवते. मात्र आता या विहिरीजवळ असलेल्या मोकळ्या जागेत काही ग्रामस्थांनी स्मशानभूमी तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.





पण आधीच पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष व संकट शिरावर असताना येथील विहीर निरुपयोगी झाली तर पाण्यासाठी खूप हाल होतील, अशी भूमिका महिला व इतर ग्रामस्थांनी घेतली आहे. सारळ ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गावातील देवळालगत दोन गुंठे जागेवर स्मशानभूमी व्हावी अशी मागणी जोर धरत आहे. तर देवळाजवळ स्मशानभूमी नको म्हणत काही ग्रामस्थ विहिरीजवळ असलेल्या मोकळ्या जागेतच स्मशानभूमी होईल या जिद्दीला पेटलेत. परिणामी याठिकाणी स्मशानभूमी झाल्यास दोन गावांना पाणीपुरवठा करणारी पानेरी विहीर पडीक होईल, यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

१४ गावांचा आधार असलेली विहिर धोक्यात

कडक उन्हाळ्यात या विहिरीचा मोठा आधार आहे, पाणी पुरवठा करणारी विहीर अत्यंत उपयुक्त असून तिच्या वापराने किमान 400 घरांची तहान भागत आहे. जोपर्यंत येथील गावाला जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी पुरवठा नियमित सुरू होत नाही, तोपर्यंत प्रस्तावित स्मशानभूमीचे काम करू नये असा एकमुखी निर्धार स्थानिक ग्रामस्थांनी केलाय.

एका बाजूला देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करतोय अस आपण म्हणतो. तर आपण डिजिटल इंडियाचे स्वप्नही पाहतोय, पण जिथं प्राथमिक गरजांची पूर्तता स्वातंत्र्याच्या 65 वर्षांनंतर ही होत नाही तिथं विकास आणि प्रगती या शब्दांची धारच बोथट होताना दिसते.




येथील एक महिला प्रतिज्ञा परशुराम नाईक सांगतात की, "इथली विहीर ही 14 गावांसाठी असलेली विहीर आहे. सर्वाना या विहिरीतून मुबलक पाणी मिळतंय, मात्र काही ग्रामस्थ एका गावासाठीच ही विहीर असल्याचं सांगतात हे योग्य नाही. पाणी हे माणसाचं जीवन आहे ते जीवनच तुम्ही खुंटून घेतलं तर माणसांनी जगायचं कसं? जेव्हा भरतीचं पाणी येतं तेव्हा आमच्या जवळच्या बोरिंगचं पाणी खारं होतं, ते पिण्यायोग्य नसतं, म्हणून फेब्रुवारी-मार्च एप्रिल व मेमध्ये आम्हाला ही विहीर अत्यंत उपयुक्त ठरते. जून जुलै महिन्यात आम्ही नदीचे पाणी वापरत असतो, जर याठिकाणी स्मशानभूमी झाली तर प्रेताची राख, कपडे, गाद्या, उशा, हार फुले विहिरीत टाकले जाण्याची भीती आहे. पाणी दूषित होईल त्या पाण्याचा वापर करता येणार नाही, तीच परिस्थिती येथे होईल, विहिरीजवळ जर स्मशानभूमी झाली तर पिण्याच्या पाण्यात राख उडेल, इथले पाणी कोणी पिणार नाही, मग पाण्यासाठी आम्ही कुठं धावणार? हा मोठा प्रश्न आहे, म्हणून आम्ही स्मशानभूमीला विरोध करीत आहोत.

येथील अंकिता पाटील यांनी पाण्यासाठी काय धडपड करावी लागते ही व्यथा मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना मांडली. "या विहिरीजवळ येताना चढउतार व काटेरी वाट आहे. येताना मोठी कसरत होते, काही महिला लहान मुलांना कडेवर घेऊन डोक्यावर हंडे घेऊन येतात. मात्र पाण्यासाठी आम्ही याठिकाणी सर्व त्रास सोसून येतो. स्मशानभूमी झाली की वावर कमी होईल, नदीतले विहिरीतील पाणी पिता व वापरता येणार नाही, लहान मुलांना नदीत पोहता येणार नाही, शिवाय याठिकाणी विद्युत ट्रान्सफार्मर असल्याने स्मशानभूमी झाल्यास आग लागण्याचा मोठा धोका आहे" असेही पाटील यांनी सांगितले.






शीतल पेडणेकर या सारळ ग्रामपंचायत अंतर्गत राहणाऱ्या म्हात्रोली येथील महिलेने सांगितले की "माझं इथं बाजूला घर आहे. सरकारने महिलांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पाण्यासाठी ही सरकारी विहीर दिली आहे, सारळ ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणारी व सभोवताली असलेल्या 14 गावांना इथं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विहिरींची सुविधा दिली आहे. मात्र काही लोक नाहक स्मशानभूमी निर्माणाचा घाट घालत आहेत. स्मशानभूमी करायची असेल तर देवळाजवळ दोन गुंठे जागा आहे तिथं करा. पण तिथं स्मशानभूमी करीत नाहीत, सध्या आपण महामारीच्या संकटात लढतो आहोत, सर्वाना शुद्ध पाणी मिळाले पाहिजे. स्मशानभूमी झाल्यास पाणी दूषित होईल. शिवाय इथं एक दर्गा आहे व ट्रान्सफार्मर आहे, म्हणून स्मशानभूमी नकोच" शितल यांनी सांगितले.

अनेक गावं विकासापासून वंचितच

विकास म्हणजे काय रे भाऊ? असा प्रश्न येथील गावातील मूलभूत नागरी सेवा सुविधांचा अभाव पाहून उपस्थित होतो. स्वातंत्र्याचा सूर्य इथं उगवलाच नाही, कारण आजही येथील गावांपर्यंत रस्ते पोहचले नाहीत, वीज पुरवठा नियमित व सुरळीत नाही, पाणी व आरोग्य सेवेच्या नावाने देखील बोंबाबोंब आहे. आमची पाण्यासारखी ज्वलंत व तातडीची गरज पूर्ण व्हावी, अशी मागणी मळा व म्हाप्रोली ग्रामस्थ करतांना दिसतायेत.






ग्रामपंचायतीचे म्हणणे काय?

यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रने येथील सारळ ग्रामपंचायतीच्या सरपंच अमृता अमित नाईक संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, "मिळखतखार मळा गावात व इतरत्र पाणीटंचाईची समस्यां जाणवते. येथील लोक मागील अनेक वर्ष म्हात्रोली सारळ येथील विहिरीवर पाणी भरण्यासाठी दररोज येतात. सर्वांना या विहिरीतून मुबलक पाणी मिळते. सदर विहिरीच्या बाजूला स्मशानभूमीसाठी राखीव जागा आहे. तसेच दोन गावांना पाणीपुरवठा करणारी विहीर देखील सरकारी आहे. म्हाप्रोली गावासाठी जनजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजना झाली आहे. मात्र मळा मिळखतखार ग्रामस्थांसाठी ही विहीर अत्यंत उपयुक्त ठरते आहे. सारळ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या काही ग्रामस्थांनी स्मशानभूमी विहिरीजवळच व्हावी अशी मागणी लावून धरली आहे. देवळाजवळ स्मशानभूमी होईल इतकी दोन गुंठे जागा असून त्या ठिकाणी स्मशानभूमी करण्यास काही ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. पाणी व स्मशानभूमी या दोन विषयाला घेऊन मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मळा मिळखतखार येथील गावाला जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना प्रस्तावित असून योजना जलद कार्यान्वित झाल्यास इथला देखील पाणी प्रश्न सुटेल, मात्र सद्यस्थितीत या प्रश्नी जिल्हास्तरीय प्रशासनाने बैठक लावून चर्चा करून तोडगा काढल्यास मार्ग निघू शकेल" असे सांगत त्यांनी या वादावर आपले हात झटकले आहेत.



Updated : 29 Jan 2022 6:40 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top