Special Report : अधिकाऱ्यांना हाताशी धरुन शेतकऱ्यांची जमीन लाटल्याचा आरोप, चौकशी होणार का?
मंत्रालयातून दबाव आहे असे सांगत अधिकाऱ्यांनी आपली फसवणूक करुन शेतजमीन लुबाडली असा गंभीर आरोप एका शेतकऱ्याने केला आहे. पाहा आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा स्पेशल रिपोर्ट....
X
रायगड जिल्ह्यात उद्योगधंदे व औद्योगिकीकरण झपाट्याने वाढतेय,नवनवीन प्रकल्प व उद्योग उभारले जातायेत. त्यामुळे येथील इंच इंच जमिनीला सोन्याचा भाव आलेला आहे. मागील दोन चार वर्षात जिल्ह्यात विविध भागात जमीन खरेदी विक्री व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असून गोरगरीब शेतकरी यांच्या अज्ञानाचा व मजबुरीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जातेय. शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने शेतकऱ्याची खरेदीदाराने फसवणूक केल्याचा गंभीर आरोप एका शेतकऱ्याने केला आहे.
पेण तालुक्यातील कोपर गावच्या शेतकऱ्याचे न्यायासाठी दोन वर्षांपासून पेण प्रशासन कार्यालयात हेलपाटे सुरु आहेत. पीडित शेतकरी आपल्याला न्याय मिळावा आणि ज्या अधिकाऱ्यांनी आणि खरेदीदाराने फसवणूक केली त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी शासनदरबारी आपले कष्ट, वेळ आणि पैसा खर्च करतो आहे. मात्र या शेतकऱ्यांची पदरी निराशाच येते आहे.
पेण तालुक्यातील कोपर गावचे शेतकरी लक्ष्मण भोईर यांनी शेतजमीन विक्री व्यवहारात शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने खरेदीदाराने मोठी फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. "आम्हाला मंत्रालयातून दबाव आला असल्याचे सांगून शासकीय अधिकाऱ्यांनी माझ्यावर अन्याय केला" असा आरोप तक्रारदार शेतकऱ्याने केला असल्याने खळबळ उडाली आहे. सदर जमीन लुटीमागे मंत्रालयातील कोणी बडा नेता अथवा अधिकारी आहे की काय, असा प्रश्न शेतकऱ्याच्या या आरोपामुळे निर्माण झाला आहे. यासंदर्भात लक्ष्मण भोईर यांनी राज्याचे मुख्यमंत्री, महसूलमंत्री, कोकण आयुक्त, पोलीस अधीक्षक, रायगडचे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी केली आहे. तसेच या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दोन वर्षांपासून पीडित शेतकरी लक्ष्मण भोईर हे न्याय मागण्यासाठी पेण तहसील कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. मात्र अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही. जिल्ह्यात एकीकडे भात लागवड क्षेत्र कमी होत आहे. दुसरीकडे जिल्ह्यासह पेण तालुक्यात नवे औद्योगिक क्षेत्र, महामार्ग येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शेतजमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. कोरोनामुळे थांबलेले जमीन खरेदी व्यवहार बंद होते. मात्र आता पुन्हा हे व्यवहार सुरू झाले आहेत. शेत जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार सध्या जिल्ह्यात जोरात सुरू असतानाच शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या प्रकारातही मोठी वाढ होताना दिसत आहे. स्थानिक दलाल, शासकीय अधिकारी यांना हाताशी धरून गरीब शेतकऱ्यांचे फसवणूक व शोषण करण्यात मोठंमोठे भांडवलदार, उद्योजक व विकासक चटवले असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
पेण तालुक्यातील शेतकरी लक्ष्मण भोईर आणि भरत भोईर याची कोपर गावात गट नंबर 58/3 क क्षेत्र 32 गुंठे शेतजमीन मिळकत आहे. या जमिनीचा भूधारण पद्धत बदलण्यासाठी लक्ष्मण भोईर यांनी 2019 साली तत्कालीन पेण तहसीलदार याच्याकडे अर्ज केला होता. त्याचा 40 टक्के नजराणाही भोईर भरण्यास तयार होते. मात्र तहसीलदार आणि कार्यालयीन अधिकारी यांनी वेळोवेळी चालढकलपणा करून आपल्याला दोन वर्षे झुलवत ठेवले असा आरोप, भोईर यांनी केला आहे.
याच दरम्यान जमीन विक्रीचा व्यवहार खरेदीदार रमेश रामदुलार यादव यांच्यासोबत ठरला. एक लाख गुंठे प्रमाणे 32 लाख 40 हजार रुपये अशी जागेची रक्कम ठरली. त्याप्रमाणे खरेदीदार रमेश यादव यांनी 5 लाख रुपये चेकच्या माध्यमातून भोईर यांना पैसे दिले. उर्वरित रक्कम खरेदीखत झाल्यानंतर देण्याचे ठरले होते. भोईर यांच्या कामाला सरकारी अधिकाऱ्यांनी दोन वर्षात दाद दिली नाही, पण यादव यांनी जमीन घेण्याचा निर्णय घेताच आपल्या जमिनीची फाईल तातडीने फिरु लागली, असे भोईर सांगतात.
या जमिनीच्या व्यवहाराचे काही रक्कम हाती आल्यानंतर खरेदीदार यादव यांना भोईर यांनी कुळमुखत्यार पत्र देऊन फक्त निष्पादनाचा अधिकार दिला. मात्र त्यांनी यादव यांना सहीचा अधिकार दिलेला नव्हता. पण यादव यांनी या कुळमुखत्यारपत्राचा गैरवापर करून पेण तहसीलदार, कर्मचारी, दुय्यम निबंधक, तलाठी यांना हाताशी धरून परस्पर खरेदीखताचा व्यवहार करून आपली फसवणूक केली असा आरोप लक्ष्मण भोईर यांनी केला आहे. एवढेच नाही तर लक्ष्मण भोईर आणि त्यांच्या भावाची सही, अंगठ्याचे खोटे ठसे घेऊन परस्पर खरेदी खताची कागदपत्रही तयार केल्याचा आरोपही ते करत आहे. इतकेच नाही तर जमिनीची भूधारण पद्धतीत बदल झाल्याचेही प्रशासनाने आपल्यापासून लपवून ठेवल्याचे भोईर सांगतात.,हे कळल्यानंतर लक्ष्मण भोईर आणि त्याचा मुलगा सतीश भोईर हे गेली दोन वर्षे पेण तहसीलदार कार्यालयात रोज न्यायासाठी दाद मागत आहेत. मात्र निगरगट्ट शासकीय अधिकारी हे त्यांच्या ताकाला सूर लावून देत नाहीत.
भोईर यांची फाईल दोन वर्ष रखडवून ठेवली गेली, पण त्यानंतर यादव यांनी जमीन घेण्याचा व्यवहार सुरू होताच या जमिनीबाबत सरकारी अधिकारी एवढ्या जोरात कामाला का लागले, त्यांना यादव यांनी काही पैसा दिला होता का, असा प्रश्नही भोईर यांना पडला आहे. यादव यांनी दिलेले चेकही बाऊन्स झाल्याचे लक्ष्मण भोईर सांगत आहेत. याचा अर्थ या प्रकरणात आर्थिक फसवणुकीचाही मुद्दा आला आहे.
यासंदर्भात आम्ही पेणच्या तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांच्याकडे विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितले की, सदर प्रकरणी पीडित शेतकऱ्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि चौकशीअंती पुढील कार्यवाही करू" अले आश्वासन त्यांनी दिले.
लक्ष्मण भोईर यांनी या प्रकरणाची तक्रार पेण पोलीस ठाण्यात देखील दाखल केली आहे. यासंदर्भात आम्ही पेणचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पाल यांची प्रतिक्रिया जाणून घेतली तेव्हा त्यांनी सांगितले की, "तक्रारीच्या अनुषंगाने तपास करू व शेतकऱ्याची फसवणूक झाली असल्याचे आढळल्यास योग्य ती कारवाई करू,"
यादव यांनी केवळ लक्ष्मण भोईर यांनाच नाही तर आणखीही काही शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप होतो आहे. एकीकडे अधिकाऱ्यांना हाताशी धरुन जमीन लुबाडली आणि शेतकऱ्याची आर्थिक फसवणुकही करण्यात आली असे दोन्ही आरोप या प्रकरणात आहेत. त्यामुळे पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास करुन दोषींवर कारवाईची मागणी होते आहे.