धक्कादायक : आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे, उपचाराअभावी मुलीचा नदीकाठीच मृत्यू
X
राज्याच्या विकासाचे कितीही दावे केले जात असले तरी हा विकास तळागाळापर्यंत पोहोचलाच नसल्याची उदाहरणं दररोज समोर येत असतात. अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यात समोर आली आहे. पुरामुळे रस्ता बंद झाला, नदी ओलांडण्यासाठी कोणतेही साधन नव्हते, त्यामुळे रबरी ट्यूबवर खाट ठेवून त्यावरुन तापाने फणफणलेल्या मुलीला पुरातून नेण्याचे धाडस तिच्या कुटुंबाने केले. पण दुर्दैवाने त्या मुलीला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील सात्री गावातील सुरेश भिल यांची मुलगी आरुषी ही गेल्या काही दिवसांपासून तापाने आजारी होती. मंगळवारी सकाळी ताप वाढल्याने तिला जास्त त्रास सुरू झाला. त्यानंतर तिला शेजारच्या गावातील दवाखान्यात हलवण्याची तयारी तिच्या आई-वडिलांनी केली. पण नदीला पूर असल्याने पलीकडच्या गावात जाणे शक्य नव्हते. इकडे आरुषीची तब्येत आणखीनच खालावली होती. एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी नदीवरून जाणारा एकच रस्ता असल्याने मोठी अडचण असल्याने मग काही ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून एका खाटेला हवा भरलेले ट्यूब बांधून नाव तयार केली. त्यावर आरुषी व तिच्या आईला बसवून नदी पार केली. परंतु, तोवर उशीर झाला होता. दवाखान्यात पोहचेपर्यंत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही आरुषीचा जीव वाचला नाही.
सात्री गावचे पुनर्वसन झालं असते तर आरुषी वाचली असती
सात्री हे गाव निम्नतापी प्रकल्पात येते. पण अनेक वर्षांपासून पुर्नवसन झालेले नाही. यामुळे ह्या गावात पुराचा धोका असतो. मात्र प्रशासनचे कायम याकडे दुर्लक्ष केलं आहे. तीन दिवसांपूर्वीच गावात काही अधिकारी आले होते. त्यावेळी गावात तापाची साथ असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली होती, मात्र अधिकारी गेल्यावर कोणीही आलं नाही, आरोग्य पथकही आलं नाही, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. गावात डॉक्टर नाहीयेत, त्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाच्या ह्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाला आणखी किती जणांचे जीव गेल्यावर जाग येईल, असा संतप्त सवाल यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केला.