Home > मॅक्स रिपोर्ट > नववी शाळा शिकलेला शेतक-याची ड्रॅगनफ्रुटमधून समृध्दी

नववी शाळा शिकलेला शेतक-याची ड्रॅगनफ्रुटमधून समृध्दी

दुष्काळी डाळींब पिकाचे हब असलेल्या सांगोल्यात शेतीचे नवनवे प्रयोग होत असून अडचणीतील डाळींब शेतीला पर्याय म्हणुन ड्रॅगनफ्रुटनं शेतकऱ्यांनं समृध्दी साधली आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट...

नववी शाळा शिकलेला शेतक-याची ड्रॅगनफ्रुटमधून समृध्दी
X

सांगोला तालुका डाळींब पिकाचे हब समजला जातो.येथे डाळींबाच्या बागा जास्त प्रमाणात असून या तालुक्यातील अजनाळे गाव डाळींबाच्या उत्पादनासाठी प्रसिध्द झाले पण येथील डाळींब बागांसह तालुक्यातील डाळींब बागांवर विविध रोग पडू लागल्याने या तालुक्यातील शेतकरी दुसऱ्या पिकांकडे वळू लागला असल्याचे दिसते. येथील डाळींब बागांवर पिन होल बोरर,करपा,कुजवा,तेलकट असे रोग पडल्याने येथील शेतकरी अडचणीत आला आहे.अजनाळे गावात डाळींबाच्या व्यापाराची वार्षिक उलाढाल 200 कोटीच्या आसपास होत होती,असे तेथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.पण डाळींबावर पडलेल्या रोगांमुळे आर्थिक उलाढाल कमी होऊन व्यवहार ठप्प झाले आहेत.येथील डाळींब बागा अडचणीत येत असताना सांगोला तालुक्यातील बामणी येथील शेतकरी अनिल साळुंखे यांनी तब्बल 25 एकर शेतीत ड्रॅगन फ्रुट या फळबागेची लागवड केली असून ड्रॅगन फ्रुटच्या विक्रीतून अनिल साळुंखे वर्षाला पावणे दोन कोटी रुपये कमवत आहेत.या शेतकऱ्याचे शिक्षण अवघे नववी पर्यंत झाले असून आपल्या अनुभवातून त्यांनी ड्रॅगन फ्रुटची शेती फुलवली आहे.त्यांची शेती पंढरपूर-सांगोला रोडवर बामणी गावाच्या जवळ आहे. शेती महामार्गावर असल्याने या रस्त्यावरून जाणारे प्रवाशी आवर्जून थांबून त्यांच्या शेतीला भेट देतात व ड्रॅगन फ्रुटच्या शेती संबधी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतात.त्यांची ही फायद्याची शेती पाहून सांगोला तालुक्यातील शेतकरी ड्रॅगन फ्रुटची शेती करू लागले आहेत.

गेल्या 10 वर्षांपासून केली जातेय ड्रॅगन फ्रुटची शेती

अनिल साळुंखे यांनी बोलताना सांगितले की,ड्रॅगन फ्रुटची शेती 2011 पासून करत आहे.सुरुवातीला 3 एकरमध्ये ड्रॅगन फ्रुटची बाग लावली होती.ड्रॅगन फ्रुटची शेती वाढत जाऊन ती 25 एकरामध्ये विस्तारली आहे.या झाडांची लागवड 10 बाय 6 वर केली असून यासाठी सिमेंटचे पोल उभे करावे लागले.सुरुवातीच्या काळात एक ते दीड वर्ष अडचणी आल्या.पण आता ड्रॅगन फ्रुटचा माल विकत घेण्यासाठी व्यापाऱ्यांचे फोन येतात.डाळींबाप्रमाणे जाग्यावरूनच 70 ते 80 टक्के ड्रॅगन फ्रुट विकले जात आहे.याची लागवड करताना पोल प्लेटवर करावी लागली आहे. यासाठी 6 फुटाचा सिमेंट पोल वापरला गेला असून पोल दीड फूट जमिनीत पुरला गेला आहे.त्यामुळे झाडांची देखभाल करण्यास सुलभ जाते.सुरुवातीच्या काळातील बागेच्या पोलची उंची 7 फूट होती.त्यामुळे झाडावरील फळे काढण्यास अडचण येत होती.ड्रॅगन फ्रुटची लागवड करताना नवीन सिस्टीम राबवली गेली आहे.आता ड्रॅगन फ्रुटची लागवड करताना एकरी 6 हजार पोल,रोप लागले आहे.पहिल्या वर्षीच ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीसाठी कमीत-कमी 5 लाखाच्या आसपास खर्च येतो.पुन्हा या बागेसाठी काहीही खर्च येत नाही.

व्हिएतनाम,थायलंड या देशामध्ये ड्रॅगन फ्रुटची केली जाते शेती

शेतकरी अनिल साळुंखे यांनी विदेशातील ड्रॅगन फ्रुटच्या फळ बागांना भेटी देऊन,त्याप्रमाणे आपल्या शेतात ड्रॅगन फ्रुटची बाग फुलवली आहे.त्यांनी व्हिएतनाम, थायलंड या देशातील ड्रॅगन फ्रुटच्या शेतीला भेट दिली आहे.सुरुवातीला एका झाडाला 1 किलो फळ निघाले तर एकरात 5 ते 6 टन ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन निघते.दुसऱ्या वर्षी 10 टनाच्या आसपास उत्पादन जाते.पण पोलवर त्याचा विचार केला तर त्यासाठी 3 ते 4 वर्षे लागतात.उत्पादन भरघोस निघण्यासाठी नवीन पद्धतीने ड्रॅगन फ्रुटची लागवड करणे आवश्यक आहे.ड्रॅगन फ्रुटच्या तीन व्हरायटी आहेत. त्यामध्ये रेड,जम्बो रेड,रेड व्हाइट या व्हरायटीचा समावेश आहे. रेड व्हाइट ड्रॅगन फ्रुट सुरुवातीच्या काळात चालत होते.पण आता ते मार्केटमध्ये चालत नाही.त्यामुळे इतर शेतकऱ्यांना त्याची लागवड करू देत नाही.सुरुवातीच्या काळात रेड ड्रॅगन फ्रुटची लागवड केली होती. त्याचा आकार 150 ग्रॅमपासून 500 ग्रॅम पर्यंत होता.पण नवीन आलेल्या जम्बो रेड व्हरायटीचे वजन 250 ग्रॅम ते 1 किलोपर्यंत भरते.त्यामुळे ही व्हरायटी मार्केटमध्ये चालत असून त्याची किपिंग क्वालिटी जास्त आहे.त्याची साल जाड असल्याने लांबच्या मार्केटला नेहण्यासाठी टिकतो.त्यामुळे सध्या जम्बो रेड ड्रॅगन फ्रुट मार्केटमध्ये चालत आहे.असे शेतकरी अनिल साळुंखे यांनी सांगितले.

एकरी 6 लाख रुपयांचे निघते उत्पादन

ड्रॅगन फ्रुटच्या एकरी लागवडीसाठी 4 ते 5 लाख रुपयाच्या आसपास खर्च येतो.रोप,ड्रीप,क्लिच सिस्टीमने लागवड केल्यास 5 लाख रुपये खर्च येतो.पहिल्या वर्षी एकरी 5 ते 6 टन उत्पादन निघते.हे ड्रॅगन फ्रुट मार्केटला कमीत-कमी 70 रुपये ते 200 रुपये किलो दराने विकले जातो.100 रुपये किलो दराने विकले गेले.तर 6 टनाचे 6 लाख रुपयांचे ड्रॅगन फ्रुट विकले जाते.1 लाख रुपये खर्च सोडला तर पाच लाख रुपये फायदा होतो. भारतात ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन कमी होते.त्यामुळे बाहेर देशातून 80 ते 90 टक्के ड्रॅगन फ्रुट आयात करून विकले जात आहे.भारतात ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन केवळ 10 ते 15 टक्केच होते.ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीनंतर याच्या देखभालीसाठी जास्त खर्च येत नाही.यावर बुरशीनाशक,फंगीसाइड, फवारले तर चालते नाही फवारले तरीही चालते.वाटल्यास शेतकरी या फवारण्यांचा एखादा स्प्रे घेऊ शकतात.बदलत्या वातावरणाचा व अवकाळी पावसाचा ड्रॅगन फ्रुटच्या शेतीवर परिणाम होत नाही.याचे मुख्य कारण म्हणजे जून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत ड्रॅगन फ्रुटच्या फळांचा हंगाम सुरू असतो.जेवढा जास्त पाऊस पडेल तेवढा ड्रॅगन फ्रुटच्या शेतीला त्याचा फायदा होतो.त्यामुळे जास्त उत्पादन निघते.ड्रॅगन फ्रुटवर जास्त पाऊस व थंडीचा परिणाम होत नाही.याचे झाड पावसाळ्यात फळ देते तर थंडीत ड्रॅगन फ्रुटची वाढ होते.उन्हाळ्यात हे पीक थोडे सुप्त अवस्थेत असल्याने वातावरणाचा याच्यावर परिणाम होत नाही.पण ड्रॅगन फ्रुटच्या बागेत पावसाचे पाणी थांबले नाही पाहिजे.या ड्रॅगन फ्रुटच्या बागेत आंतरपीक म्हणून कमी उंचीची आणि कमी पाणी लागणारी पिके घेता येतात,असे शेतकरी अनिल साळुंखे यांनी सांगितले.

वर्षाला मिळतात पावणे दोन कोटी रुपये

शेतकरी अनिल साळुंके यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले की,ड्रॅगन फ्रुट मुंबई, पुणे,बेंगलोर, हैद्राबाद, येथील मार्केटला विकले जाते.तर सांगली,सातारा,कोल्हापूर, कऱ्हाड,लातूर व प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या लोकल मार्केटला विकले जाते.याचे मार्केटमधील भाव आणखीन 10 वर्षे कमी होतील असे वाटत नाही.ड्रॅगन फ्रुट 70 रुपये ते 200 रुपये किलो दराने विकले जाते.याची मागणी जास्त आहे.पण उत्पादन कमी आहे. माझे 25 एकरात ड्रॅगन फ्रुट असून त्यातील 12 एकर आणखीन पिकावर यायचे आहे.तर 12 ते 15 एकर पिकावर आले आहे.वर्षाला माझे ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन 150 ते 275 टनाच्या आसपास निघते.100 रुपये दराने ड्रॅगन फ्रुट मार्केटमध्ये विकले गेले.तर वर्षाला दीड ते पावणे दोन कोटी रुपयांचे उत्पादन निघते.शेतात नर्सरी उभी केली असून त्यात ड्रॅगन फ्रुटची रोपे तयार केली जातात.या रोपांना देशातील विविध राज्यातून मागणी आहे.मागणीनुसार विविध राज्यात रोपे पुरवली जात आहेत.ड्रॅगन फ्रुटच्या शेतीला पाणी देण्यासाठी शेततळे उभारले आहे.शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रुट आर्थिक लाभ मिळवून देणारे पीक असल्याने शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रुटच्या शेतीकडे वळावे. असे शेतकरी अनिल देशमुख यांना वाटते.


Updated : 9 Feb 2022 6:13 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top