Home > मॅक्स रिपोर्ट > कामावर न जाताच ९ ग्रामसेवकांनी घेतला 51 लाख रुपये पगार हरिदास तावरे

कामावर न जाताच ९ ग्रामसेवकांनी घेतला 51 लाख रुपये पगार हरिदास तावरे

कामावर न जाताच ९ ग्रामसेवकांनी घेतला 51 लाख रुपये पगार  हरिदास तावरे
X

बीड जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी काम न करताच वेतन उचलण्याचा प्रताप केला आहे. एक-दोन महाभाग नव्हे तर तब्बल 9 ग्रामसेवकांनी कामावर न जाता पगार घेत सरकारच्या तिजोगीवर ५१ लाखांचा डल्ला मारला आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील काही जणांनी कामावर रुजू न होताच दाम मिळवले. माहिती अधिकार कायद्यातून हा प्रकार समोर आल्यानंतर आता कारवाईला सुरूवात झाली आहे.

एखाद्या गावाच्या विकासातील सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती किंवा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून ग्रामसेवकाला ओळखले जाते. पण या ग्रामसेवकांच्या कामाबाबत वारंवार तक्रारी येत असतात...पण काम न करताच ग्रामसेवकांनी तब्बल ५१ लाख रुपये पगार घेतल्याचा प्रकार बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये घडला आहे. बदली झालेल्या गावाच्या ठिकाणी रुजू न होताही त्यांचा पगार काढला गेल्याचा आरोप झाला आहे.




राहुल चाळक आणि किरण नन्नवरे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत यासंदर्भातली माहिती मागवली होती. दहा ग्रामसेवकांची माहिती मागवण्यात आली. पण ही माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली आणि तब्बल चार महिन्यानंतर ही माहिती देण्यात आल्याचा आरोप या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केला आहे. या नऊ महाभागांनी काम न करताच सरकारचे 51 लाख रुपये घेतल्याचा आरोप झाला आहे. तर किरण ननावरे या माहिती अधिकार कार्यकर्त्याने असाच प्रकार इतरही ठिकाणी घडला असण्याची शक्यता व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे.



या माहितीनंतर प्रशासन जागं झालं आणि कारवाईचा बडगा उगारला आहे. या ग्रामसेवकांच्या पगारातून त्यांनी उचललेली रक्कम कापण्यात येणार आहे. मात्र त्यांनी प्रशासनाची दिशाभूल केली आहे, त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी होत आहे. केवळ एवढीच कारवाई का असा सवाल जेव्हा आमच्या प्रतिनिधीने अतिरिक्त गटविकास अधिकाऱ्यांना विचारला तेव्हा, त्यांनी वरीष्ठांकडे बोट दाखवले. हे प्रकरण गंभीर असून याची व्याप्ती मोठी असू शकते, असेही या माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी होते आहे.

Updated : 3 Sept 2021 6:12 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top