Home > मॅक्स रिपोर्ट > Max Maharashtra Impact : ३३ कुटुंबाना मिळाली सरकारी ओळख

Max Maharashtra Impact : ३३ कुटुंबाना मिळाली सरकारी ओळख

Max Maharashtra Impact : ३३ कुटुंबाना मिळाली सरकारी ओळख
X

पालघर : एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे जव्हार तालुक्यातील 33 कातकरी कुटुंबांकडे शासकीय ओळखपत्रच नसल्याची धक्कादायक बाब मॅक्स महाराष्ट्राने उजेडात आणली होती. मॅक्स महाराष्ट्रने दिलेल्या वृत्तानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे आणि या कुटुंबांना आता शासकीय कागदपत्रं मिळाली आहेत.





जव्हारपासून 16 किमी अंतरावर असलेल्या झाप ग्रामपंचायतमधील आदिवासी बहुल लोकवस्ती असलेल्या धोंडपाडयात 150 घरांची लोकवस्ती आहे. या पाड्यावरील लोकसंख्या 637 आहे. तर कातकरी समाजाची 55 घरे असून 230 लोकसंख्या आहे. इथे राहणारे दशरथ तुळशीराम जाधव वय (26 वर्ष) याच्या कुटूंबात आई, पत्नी, एक बहीण आणि 3 मुली असा परिवार आहे. पण या कुटुंबाकडे स्वतःची शेती नाही, आठ महिने स्थलांतरित होऊनच हे कुटूंब उदरनिर्वाह करत असल्याचे त्यांनी सांगितले. या कुटुंबाकडे मतदारकार्ड, रेशनकार्ड, जॉबकार्ड, जातीचा दाखलाच काय तर कोणतीच शासकीय कागदपत्रे नव्हती. यामुळे कोणत्याच योजना या कुटुंबापर्यंत पोहोचत नसल्याचे त्यांनी सांगितले.





मॅक्स महाराष्ट्रच्या वृत्तानंतर प्रशासनाने लावला कॅम्प

बरं हे एकच कुटुंब असे आहे असे नाही तर अशी 33 कुटूंब तिथे आहेत ज्यांच्याकडे अद्यापही कोणतीच शासकीय कागदपत्रे नव्हती. त्यामुळे हे लोक बेघरच आहेत. परंतु हे भयाण वास्तव मॅक्समहाराष्ट्राने समोर आणल्यानंतर या धोंडपाड्यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन 3 दिवसांचा कॅम्प आयोजित करण्यात आला. यानंतर या सर्व 33 कुटुंबांचे जातीचे दाखले, उत्पनाचा दाखला, रेशनकार्ड, जॉबकार्ड,आधारकार्ड अशी सर्वच कागदपत्रे यावेळी काढण्यात आली. यानंतर शनिवारी 10 तारखेला ही कागदपत्रे या कुटूंबियांकडे सुपूर्द देखील करण्यात आली असून या कुटूंबियांनी मॅक्समहाराष्ट्राचे आभार मानले आहेत. पण या बेघर कुटूंबाना इतर सुविधा व घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही तो पर्यत मॅक्समहाराष्ट्र शासन दरबारी याचा पाठपुरावा करत रहाणार आहे.

Updated : 10 Sept 2022 4:11 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top