..तर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही : पंच कमिटीकडून वाळीत टाकल्यानंतर कुटुंबियाच्या वेदना
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील नवघर कोळीवाडा येथे तीन कुटुंबीयांना गाव पंच कमिटीकडून वाळीत टाकण्याचा धक्कादायक प्रकार , पीडित कुटुंबियांची न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे, प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा ग्राउंड रिपोर्ट...
X
महाराष्ट्रात सामाजिक बहिष्कार व वाळीत प्रकरणात कोकण अग्रस्थानी राहिला आहे. सामाजिक बहिष्कारासह गाव कमिटीचे जाचक नियम, अटी शर्थी व दंडेलशाहीने रायगड पोखरत चालला आहे. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील नवघर कोळीवाडा येथे तीन कुटुंबीयांना गाव पंच कमिटीकडून वाळीत टाकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
६ महिन्यापासून आपल्या कुटुंबीयांना गाव पंच कमिटीकडून वाळीत टाकल्याचा आरोप देवेंद्र मारुती कोळी आणि त्याच्या कुटुंबीयांनी केला असून या पंच कमिटीची सखोल चौकशी होऊन प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावाअशी मागणी केलीय. गावातील कुणी आमच्याशी संपर्क केला तर गाव कमिटी कडून दंड आकारला जातोय, कुणीही आमच्याशी बोलत नाहीत, घरी येत नाहीत , शिवाय सुख दुःखात सहभागी होत नाहीत, असा आरोप या कोळी कुटूंबाने केलाय. या मागणीकडे लक्ष वेधण्याकरिता १२ नोव्हेंबर रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी ठिय्या आंदोलन करणार आहेत.
या गंभीर प्रकाराबद्दल MaxMaharashtra प्रत्यक्ष गावात जाऊन गाव कमिटीचे म्हणणे जाणून घेतले तर गाव कमिटीच्या वतीने राजेंद्र कोळी यांनी आपले म्हणणे मांडले, आम्ही या कुटुंबाला वाळीत टाकले नाही, स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की आम्ही अनेक वर्षे त्यांना सांभाळून घेतले. आम्ही त्या कुटुंबाला वाळीत टाकले नाही, तर रेशन दुकानाच्या मुद्द्यावर हा बहिष्कार आहे. रेशनिंग दुकानात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
यासंदर्भात पेण उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितलं की याप्रकरणी प्राप्त तक्रारीनुसार नवघर कोळीवाडा , ग्रामपंचायत पाटणोली येथील तक्रारदार कुटुंब व गाव कमिटी यांच्या समवेत सोमवारी बैठक लावली जाईल, गावात शांतता, सलोखा व एकोपा नांदावा यासाठी प्रशासन नेहमी प्रयत्न करीत असते, या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी आम्ही यापूर्वी दोन वेळा बैठक आयोजित केली होती, आता पुन्हा तक्रारदार व गाव कमिटी यांची एक संयुक्त बैठक लावून सामंजस्याने हे प्रकरण निकाली काढले जाईल, असे सांगितले.