Home > मॅक्स रिपोर्ट > दलित तरुणीचा बलात्कार करुन खून, ठाकरे सरकार विरोधात समाज आक्रमक

दलित तरुणीचा बलात्कार करुन खून, ठाकरे सरकार विरोधात समाज आक्रमक

जळगाव जिल्ह्यामध्ये दलितांवरील अत्याचाराची महिनाभरात दुसरी घटना, तरुणीवर अत्याचार करुन तिला ठार मारले. सामाजिक संघटना सरकारविरोधात आक्रमक, ठाकरे सरकारची कायदा सुव्यवस्था ढासळली... दलित अत्याचारांमुळे जिल्ह्याचं सामाजिक स्वास्थ बिघडतंय का? काय स्थानिक संपादकांचं मत? वाचा मॅक्समहाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट

दलित तरुणीचा बलात्कार करुन खून, ठाकरे सरकार विरोधात समाज आक्रमक
X

जळगाव जिल्ह्यामध्ये दलितांवरील अत्याचाराची महिनाभरात दुसरी घटना, तरुणीवर अत्याचार करुन तिला ठार मारले. सामाजिक संघटना सरकारविरोधात आक्रमक, ठाकरे सरकारची कायदा सुव्यवस्था ढासळली... दलित अत्याचारांमुळे जिल्ह्याचं सामाजिक स्वास्थ बिघडतंय का? काय स्थानिक संपादकांचं मत? वाचा मॅक्समहाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट

जळगाव मध्ये दलित तरुणीवर सामूहिक अत्याचार करून विष देऊन खून केल्याची खळबळजनक घटना जळगावमध्ये घडली आहे. गेल्या महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. पारोळा तालुक्यातील एका वीस वर्षाच्या तरूणीवर गुंगीचे औषध देऊन चौघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार करुन तिला ठार मारण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

या संदर्भात पारोळा पोलीस स्टेशनला मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र, पोलिसांनी या संदर्भात पूर्ण माहिती हाती आल्याशिवाय बोलण्यास नकार दिला आहे.

मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशी द्यावी अशी मागणी कुटुंबाने तसंच सामाजिक संघटनांनी केली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यामध्ये दलित अत्याचार वाढले असून यामुळे जिल्ह्याचं सामाजिक स्वास्थ बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जळगाव जिल्ह्यातील दलित अत्याचाराच्या घटनांमुळे आता जिल्ह्यामध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ठाकरे सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असून रावेर आणि पारोळा येथील घटनांनी जिल्ह्याच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे.

या संदर्भात दैनिक देशोन्नतीचे जळगाव आवृत्तीचे संपादक मनोज बारी यांच्याशी बातचित केली असता...

अतिशय संयमी, कष्टाळू आणि अभ्यासू म्हणून जळगाव जिल्ह्याची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. मात्र, रावेर व पारोळा येथील घटनांनी जिल्ह्याच्या प्रतिमेला काळीमा फासला आहे. यापूर्वी अशा प्रकारच्या घटना जळगाव जिल्ह्यात घडलेल्या नाहीत. राजकीय आरोप-प्रत्यारोप असले तरी निवडणुकांनंतर लोकप्रतिनिधी देखील सर्वांशी सलोख्याने वागत असल्याची परिस्थिती आहे.

त्यामुळे अशा घटना रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनास सोबतच लोकप्रतिनिधी समोर आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा घटना घडूच नये. यासाठी सर्वांनी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. या घटनांमधील आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी सर्वांनी पाऊल उचलले तर जळगाव जिल्ह्यात अशी घटना पुन्हा घडणार नाही, असे नमूद करावेसे वाटते.

असं मत मनोज बारी यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना व्यक्त केलं आहे.

मनोज बारी यांच्याशी बातचित केल्यानंतर आम्ही यासंदर्भात दैनिक जनशक्तीचे निवासी संपादक डॉ.युवराज परदेशी यांचं मत जाणून घेतलं...

जळगाव जिल्ह्याचा गुन्हेगारीशी संबंध तसा जूनाच आहे. ८० व ९०च्या दशकात अनेक टोळी युध्दांचा अनुभव जळगावने घेतला आहे. अगदी सीमीसारख्या दहशतवादी संघटनांचा संबंधही थेट जळगावशी आला आहे. मात्र, त्यानंतर जळगाव जिल्हा शांत म्हणून ओळखला जावू लागला. तब्बल २५ ते ३० वर्षांनंतर आता पुन्हा एकदा जिल्ह्यात गुन्हेगारीने डोकं वर काढले आहे.

गेल्या आठवडाभरात जळगाव शहरात भर रस्त्यावर दोन खून झाले. त्याच्या काही दिवस आधी रावेर सामुहिक बलात्कार व हत्याकांडाने हादरले. ही घटना ताजी असताना आता पारोळा येथे एका दलीत मुलीवर सामुहिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे. या घटनांमुळे पोलिसांचा वचक संपला असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांचा वरदहस्त असल्याशिवाय अवैधधंदे सुरु होवू शकत नाहीत, हे उघड सत्य आहे. परंतू जळगाव जिल्हात अवैध धंद्यांसाठी सुपीक जमीन झाली असल्याने त्याची मोठी किंमत मोजावी लागत आहे.

अशी प्रतिक्रिया युवराज परदेशी यांनी दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर आम्ही दैनिक पुण्यनगरी खान्देश आवृत्तीचे संपादक विकास भदाणे यांच्याशी बातचित केली, ते सांगतात...

गेल्या काही वर्षांत जळगाव जिल्ह्यात दलित आदिवासी तरुणींवर अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत आल्या आहेत. अलीकडेच घडलेल्या रावेर तालुक्यातील बोरखेडा घटनेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्यासह एकाच कुटुंबातील चार अल्पवयीन भावंडांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेतील आरोपींना जेमतेम पोलिसांनी पकडले आहे. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे.

त्याचबरोबर मंगळवारी पुनः पारोळा येथे अनुसूचित जातीच्या तरुणीवर अत्याचार करून तिला विष पाजल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी चर्मकार संघटना आक्रमक झाल्याने खुनासह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. मुळात वारंवार घडणाऱ्या या घटनांतून सामाजिक विकृती समोर येत आहे. त्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज आहे. अत्याचार करणारे किंवा मारेकऱ्यांना कठोर शासन करण्यासाठी कायद्याची आणखी कडक अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचं मत विकास भदाने यांनी व्यक्त केलं आहे.

एकंदरिंत जळगाव जिल्ह्याचे वृत्ताकन करणाऱ्या विविध वृत्तपत्राच्या संपादकांच्या मते जळगाव जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था बिघडली असून यामुळे जिल्ह्याचं सामाजिक स्वास्थ धोक्यात आल्याचं मत विविध वृत्तपत्रांच्या संपादकांनी व्यक्त केलं आहे.

मात्र, या घटनेच्या निमित्ताने एक मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. तो म्हणजे दलित अत्याचार झाल्यानंतर याबाबत म्हणावी तशी चर्चा होताना दिसत नाही. किंबहूना माध्यमांवर देखील अनेक वेळा अशा बातम्या उशिराने दाखवल्या जातात. त्यामुळे अनेक प्रकरण माध्यमांवर देखील येत नाही. तर काही प्रकरण गावातील गावातच मिटवली जातात.

खरं तर बहुतांश दलित समाज हा आर्थिकदृष्ट्या गावातील जमिनदारांवर रोजी रोटीसाठी अवलंबून असतो. अशा परिस्थितीत हातावर पोट असलेला हा समाज अन्याय झाला तरी कोर्टाची पायरी चढण्यास घाबरतो. कारण न्यायासाठी कोर्टात वकिलाला देण्यासाठी लागणारा खर्च सर्वसामान्य लोकांना परवडत नाही.

मीडिया एखादाचं प्रकरण उचलून धरते. आणि तेवढेच प्रकरण जनतेसमोर येते. त्यामुळे दलित अत्याचाराची प्रकरण मोठ्या प्रमाणात समोर येत नाही. त्यातच जळगाव जिल्हा तसा सामाजिक सलोखा राखणारा जिल्हा आहे. मात्र, अलिकडच्या काळात जिल्ह्यात दलित अत्याचाराच्या घटना वाढल्यानं सामाजिक वातावरण धोक्यात आलं आहे. अशा घटनांनी सामाजिक दरी निर्माण होते. जातीय तणाव वाढतो. म्हणून पोलिसांनी समाजामध्ये कायद्याचा धाक निर्माण करणं गरजेचं असल्याचं मत स्थानिक संपादक, पत्रकार यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केलं आहे.

जळगाव जिल्ह्यामध्ये दलितांवरील अत्याचाराची महिनाभरात ही दुसरी घटना आहे. तरुणीवर अत्याचार करुन तिला ठार मारल्यानंतर सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. मात्र, या संघटना आक्रमक झाल्यानंतर सदर महिलेच्या कुटुंबाला आता तरी न्याय मिळेल का? दलित अत्याचारांमुळे जिल्ह्याचं सामाजिक स्वास्थ बिघडत असताना सामाजिक संघटना, पोलिस यंत्रणांना जिल्ह्याचं सामाजिक स्वास्थ जपण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

Updated : 1 Dec 2020 3:38 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top