Home > मॅक्स रिपोर्ट > #UkraineRussia : युक्रेनमध्ये महाराष्ट्राचे १२०० विद्यार्थी अडकले

#UkraineRussia : युक्रेनमध्ये महाराष्ट्राचे १२०० विद्यार्थी अडकले

#UkraineRussia : युक्रेनमध्ये महाराष्ट्राचे १२०० विद्यार्थी अडकले
X

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युक्रेनमध्ये विमानतळ बंद करण्यात आली आहेत. लोक आहे तिथेच अडकून पडले आहेत. युक्रेनमध्ये शिक्षणानिमित्त गेलेले सुमारे २० हजार विद्यार्थी सध्या अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील बाराशे विद्यार्थी अडकल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांची सुटका करण्याचे आवाहन केले आहे. "युद्धग्रस्त युक्रेनमध्ये महाराष्ट्रातील १२०० विद्यार्थी अडकून कठीण परिस्थितीला तोंड देत आहेत. पंतप्रधानांना पत्र लिहून त्यांची सुरक्षा ताबडतोब निश्चित करून त्यांना घरी परत आणण्यासाठी तीव्र प्रयत्न करण्याची विनंती केली." असे ट्विट नाना पटोले यांनी केले आहे.

दरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली परिस्थिती मांडली आहे. या विद्यार्थ्यांना भारतात परतायचे आहे, पण भारतीय दुतावासातर्फे कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार या विद्यार्थ्यांनी केली आहे. नवी मुंबईतील नेरुळ येथील अभिजीत थोरात हा एमबीबीएसचा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडला आहे. काही दिवस पुरेल एवढा जीवनावश्यक वस्तूंचा साठा आपल्याकडे असल्याचे त्याने सांगितले आहे. सरकारने लवकरात लवकर तेथून सुटका करावी अशी मागणी हा विद्यार्थी करत आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील १२०० विद्यार्थ्यांपैकी अमरावती शहरातील आठ विद्यार्थी असल्याची माहिती अमरावतीच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या, तसेच केंद्र शासनाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे. तर अशा युद्धजन्य स्थितीत भारत सरकारने लवकरात लवकर आमच्या मुलांना सुखरूप मायदेशी आणावं अशी मागणी युक्रेनमध्ये अडलेल्या विद्यार्थी साहिर तेलंग यांचे वडिल प्रेसनजित तेलंग यांनी केली आहे.

नांदेड जिल्ह्यातील 20 विद्यार्थी युक्रेनमध्ये असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. हे सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.

Updated : 25 Feb 2022 5:22 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top